आमच्या घराच्या मागे एक भू-भाग / plot आहे. त्यावर आज बोओर तयार करण्यास लागणारी यंत्रणा आली होती. बरीच लोक होती त्या गाडीत आणि त्यांना बराच अवधी लागला सगळं जोडण्याला वगैरे. तेवढयातच बघते तर काय एक पोऱ्या त्यांच्यातलाच चपळतेने कामाला लागला देखील. भल्यामोठ्या पातेल्यात रस्त्यावरच त्याने भात शिजवायला ठेवला, सिलेंडर जोडून. भात उकळे पर्यंत भेंडी, बटाटा आणि टमाटे धुवून गाणं म्हणत म्हणत चिरले, बटाट्याची साल वगैरे काढण्याच्या भानगडीत अजिबातच न पडता. मग भातातले पाणी टाकून दिले आणि दुसऱ्या भांड्यात भली मोठी चिरलेली भाजी फोडणीला टाकली. थोड्यावेळाने त्या सर्व जणांची अंगत-पंगत बसली रस्त्यावरच. आनंदाने खाऊन मग सगळे बोओर च्या कामाला लागले. फार छोटा होता तो मुलगा स्वयंपाक करणारा. एक कुठलीतरी सूरी तत्सम वस्तू होती त्याच्या कडे, मोठी दोन पातेली होती.... पण त्याच काहीच अडलं नाही किंवा कोणीही नखरे न करता सगळं खाल्लं देखील. किती बोध घेण्यासारखी छोटीशी गोष्ट आहे नाही. आहे त्यात विश्वं उभं करता आलं पाहिजे सगळ्यांना. कशाही साठी गाडी अडता कामा नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा