रविवार, १६ मे, २०२१

नातं: लिखाण आणि संशोधन ह्यांच

विद्यावाचस्पती अर्थात पीचडी ह्या करता जे संशोधन आणि काम करावं लागत, त्याच आणि लिखाणाचं अतूट नातं आहे. हे बंधन इतकं घट्ट आहे कि ज्याला तोडच नाही. अर्थातच वाचन, विचार, मनन आणि चिंतन ह्या आधीच्या महत्वाच्या पायऱ्या आहेतच, त्या शिवाय गत्यंतर नाहीच. लिखाण करायचं म्हणजे प्रगल्भता हवी आणि ती येण्या करता भरपूर वाचन करावं लागणारच. वाचन हे विविध अंगी असावं आणि जरी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेखांचं वाचन करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच साधारण मागील - वर्ष प्रसिद्ध झालेलं लेखन देखील वाचलं पाहिजे. एखादा अत्यंत जुना लेख असेल पण त्यात आज हि उपयोगी असे साहित्य दिलं असेल तर नक्कीच वाचावा आणि त्याचा संदर्भ घ्यावा.
वाचन, मनन आणि चिंतन झालं कि विचारपुर्वक लेखन हि पायरी सुरु होते. ह्या आधुनिक जमान्यात पीचडी संदर्भात लिखाण सुरु होते ते एक पानी लेखा पासून. विद्यार्थ्याला पीचडी साठी अर्ज करावा लागतो प्रसिद्ध विद्यापीठात आणि त्या करता अर्जासोबतच एक पानी लेख मागितला जातो, त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्णच होत नाही. ह्या लेखात अतिशय नवीनतम विषयात विचारपुर्वक माहिती देणे, आणि संशोधन करणे का आवश्यक आहे हे नमूद करणे फारच आवश्यक असते. ह्या नंतर पीचडी मध्ये प्रवेश निश्चित झाल्यावर विदार्थ्याला काही विषय शिकावे लागतात आणि प्रत्येक विषयाच्या शेवटी अनेकविध उत्तरपत्रिका सोडवाव्या लागतात, म्हणजे पुन्हा विचार करून लिखाण आलंच. ते झालं कि साधारणतः दोन विषय मार्गदर्शक निवडतो आणि त्यावर विचारांचं आदान-प्रदान करून अभ्यासक्रम ठरवला जातो. - महिन्यातच विद्यार्थ्याला ह्या दोन विषयांचा अभ्यास करून, त्यावर लेख लिहून मार्गदर्शकाला आणि विद्यापीठाला पाठवावा लागतो. मग जे वाचलं आहे, लिहिलं आहे त्यावर तज्ञां समोर सादरीकरण करावं लागतं. तज्ञांनी विषयाला, विचारांना आणि दिशेला मंजुरी दिली कि मग पहिला समीक्षा लेख (literature review) लिहावा लागतो. हा इतंभूत आणि तपशीलवार असा लेख असतो, बऱ्याच दृष्टिकोनातून विचार करून, वाचकाला आवडेल असा, रुचेल-पटेल आणि उपयोगी पडेल असा लेख लिहावा लागतो. विद्यार्थ्यांची क्षमता, विचारांची पातळी+खोली+रुंदी, अगाध वाचन . ह्या लेखात दिसून येत. जर जर्नल / दैनिकाच्या संपादकाला तो लेख आवडला तर ठीक, तो काही दिवसात प्रसिद्ध होतो ऑनलाईन म्हणजे मग सगळे वाचू शकतात. पण सगळ्यापर्यंत पोचण्या करता आणि हा लेख प्रसिद्ध झाला आहे हे सांगण्या करता आजकाल वैविध्य ठिकाणी ह्या लेखाबद्दल लिहावं लागतं. हि विविध ठिकाणं म्हणजे सोशल मीडिया ची ठिकाण, जस कि फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स, लिंक्ड-इन आणि असेच बरेच. प्रसिद्ध झालेल्या लेखा बद्दल लिहिणे म्हणजे देखील एक कलाच आहे. अस्स मोहक लिहिता आलं पाहिजे कि हे छोटेखानी वर्णन वाचल्यावर संपूर्ण लेख ताबडतोब वाचावासा वाटला पाहिजे.
आणि जर संपादकाला लेख आवडला नाही तर तो वेगवेगळे बदल सुचवतो आणि ते बदल करून त्याच जर्नलला किंवा दुसऱ्या जर्नलला तो लेख पाठवावा लागतो. सुचवलेले बदल करणे म्हणजेच पुन्हा लिखाण आलेच, आणि ते हि थोड्या वेळातच पाठवावे लागते. दुसऱ्याही संपादकालाहि जर लेख आवडला नाही तर तिसऱ्या जर्नलला पाठवावा लागतो किंबहुना लेख कदाचित पुन्हा नवीन पद्धतीने किंवा अजून माहिती देऊन लिहावा लागतो. म्हणजे अजून वेगळ्या प्रकारचं लेखन आलंच.

पीचडी ह्या प्रवासात अनेक लेख प्रसिद्ध करावे लागतात, किंबहुना ती अटच असते विद्यापीठाची आणि अर्थात विद्यार्थ्याला त्याच काम व्यवस्थित होत आहे ह्याची पावती म्हणजे हे प्रसिद्ध झालेले लेखच. लेख प्रसिद्ध होण्यास अनेक गोष्टी करणीभूत आहेत. चांगलं आणि नाविन्यपूर्ण काम करण्याकरता त्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीची जर सोबत मिळाली आणि त्यात जर तो व्यक्ती अंतर्देशीय ख्यातीचा असेल तर मग विचारायलाच नको. पण अंतर्देशीय प्रसिद्ध व्यक्ती शोधल्यावर विद्यार्थी आणि मार्गदर्शका बरोबर काम करण्या करता त्यांना आपल्या नाविन्यपूर्ण कामाची माहिती लिहून पाठवावी लागते. पहिल्याच प्रसिद्ध व्यक्ती कडून उत्तर येईलच असे नाही, त्यामुळे हि लिखाणाची मालिका चालूच ठेवावी लागते आणि व्यक्ती प्रमाणे कदाचित थोडासा बदल करून लिहावं लागत. अर्थात हे हि छोटस लिखाण -मेल द्व्यारे पाठवलेलं अर्थपूर्ण आणि चित्त वेधक असेल तरच उत्तर लवकर येऊ शकत.
हा पहिला लेख लिहून झाला कि खऱ्या अर्थाने कामाला सुरवात होते, विविध प्रयोग केले जातात, त्याचे आलेले निकाल / परिणाम ह्यांची नोंद करावी लागते. आधीच्या केलेला कामाशी तुलना करावी लागते आणि फरक टिपावा लागतो. हि टिपण्णी फारच उत्कृष्ट पद्धतीने मांडावी लागते पुढील लेखात. उत्कृष्ट पद्धत म्हणजे नवीन प्रकारे केलेलं काम हे आधीच्या केलेल्या कामा सारखंच आहे का अजून वेगळं / चांगलं आहे हे सांगणे. अर्थातच हे सांगणे म्हणजेच लिहिणे आणि तेही तांत्रिक भाषा वापरून. लिखाण ही एक कला आहे आणि त्यात आपल्या डोक्यातील विचार + केलेलं काम + आलेले परिणाम = वेगळ्या पातळीचे तांत्रिक कथन. असे कथन अनेक वेळा करावे लागते जोवर ठरवलेले संशोधन होत नाही तोवर. बहुतांशी सगळेच जर्नल आता एक "कव्हर-लेटर" मागतात पीचडी च्या विद्यार्थ्या कडून, प्रत्यक्ष लेख| सोबतच. ह्या लेटर मध्ये संक्षिप्त शब्दात आपलं कार्य मांडावे लागते, म्हणजे आपल्याच संशोधन बद्दल अजून एक छोटेखानी लेख.

तर असे अनेक तांत्रिक लेख प्रसिद्ध झाले कि त्या-त्या लेख बद्दल वर नमूद केल्याप्रमाणे विविध ठिकाणी त्याबद्दल लिहावं लागत म्हणजे तो लेख वाचनात येईल. ह्या पीचडी च्या प्रवासात - महिन्यांचे महत्वाचे टप्पे असतात. प्रत्येक सहा महिन्याला विदार्थ्याला तज्ञ् मंडळी समोर त्याने केलेलं काम मांडव लागत म्हणजे उपयोगी तांत्रिक पुढील दिशा मिळते. तज्ञ् मंडळींना प्रत्येक सहा महिन्यांनी २०-३० पानांचा संक्षिप्त अहवाल द्यावा लागतो, ज्यावर वैचारिक भाष्य केलं जात आणि चर्चा होते. प्रत्येक सहा महिन्याला अहवाल म्हणजेच अजून एका पद्धतीचं लिखाण. प्रत्येक लेखाची धाटणी वेगळी असते.

पीचडी करतांनाचा महत्वाचा पहिला भाग म्हणजे विविध देशी-विदेशी संस्थाना संशोधन-प्रस्ताव पाठवणे. संशोधन-प्रस्ताव जर मंजूर झाला तर संशोधन करण्या करता अनुदान मिळते. हाती घेतलेल्या संशोधना करता अनुदान मिळणे म्हणजे एक अजून पावती मिळाल्या सारखीच आहे. पण असे प्रस्ताव उभे करण्यासाठी पुन्हा अत्यंत वेगळ्या प्रकारचं लिखाण आलच. आणि पीचडीत एकापेक्षा जास्त प्रस्ताव लिहिले जातात, कारण विविध संस्था वर्षांतून अनेक प्रस्ताव लिहिण्याच्या संधी घेऊन येतात. हे लिखाण आणि त्याचा ओघ संशोधन लेख, संक्षिप्त लेख, -मेल पेक्षा वेगळे असते.

पीचडी करतांना चा महत्वाचा दुसरा भाग म्हणजे एकस्व = पेटंट लिखाण. हे अनिवार्य नसत पण केलं तर "दुधात साखरच". एकस्वच पाउल टाकायचं असेल तर फारच वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो, प्रसिद्ध एकस्व वाचावे लागतात, निश्चित झाल्यावरच मग अतिशयच वेगळ्या धाटणीचं लेखन सुरु होत. हे लेखन वेगळ्याच तांत्रिक भाषेत लिहिलं जात ज्यात मुद्देसुर आणि कायद्यानुसार बाबी मांडाव्या लागतात. अनेक आवृत्ती मधून लिखाण होत आणि बरेच शिकायला मिळते, लिखाणा बद्दल.

सरते शेवटी प्रबंध लिहायची वेळ येते. त्यात अनेक अध्याय असतात. प्रत्येक अध्याय किंवा धडा हा एक वेगळ्याच खिळवून ठेवायच्या कलेने लिहिला जातो / जावा. एकापेक्षा जास्त वेळा तोच धडा लिहिला जातोच. ह्याच महत्वाचं कारण म्हणजे प्रबंध हा केलेल्या संपूर्ण कामाचा विस्तृत आढावा असतो. संशोधनाचं काम करता करता जे अनेक लेख प्रसिद्ध झाले असतात त्याच बद्दल पुन्हा वेगळ्या दृष्टीने लिहायचं आवाहन असत. प्रसिद्ध झालेला लेख जसाच्या तसा पुन्हा प्रबंधामध्ये मांडून चालत नाहीच. वाड्ःमयचौर्य हा एक फार मोठा गुन्हा आहे आणि ते पटण्या सारखाच नाही त्यामुळे आपलेच कार्य, केलेले लिखाण पुन्हा आपणच वेगळ्या पद्धतीने प्रत्येक अध्यायात लिहावे लागतात.

इथे हा प्रवास संपत नाही बरं का मंडळी. ह्या नंतरचा महत्वाचा भाग म्हणजे मेहेनतीने अनेक वर्ष उपयोगात आणून तय्यार केलेलं संशोधन आणि प्रबंध ह्यावर पुस्तक लिहिणे. आता पुस्तक रूपात तेच काम पुन्हा मांडायचं म्हणजे ढाच्यात बदल, त्यामुळे कदाचित संदर्भात थोडेसे बदल आणि खोली-रुंदी सुद्धा बदल. जर पुस्तक हे चटकिनी चाळण्यासारखं (quick reference book) करायचं असल्यास फक्त थोडक्यात संदर्भ द्यावे आणि जर नेहमीच्याच पद्धतीने पुस्तक मांडणे ठरवले तर कदाचित अध्यायात बदल होऊ शकतो, म्हणजेच पुन्हा अजून एक नव्या पद्धतीने लिहिणं आलच.

आणि हे सगळं झाल्यावर तर खरं लिखाण सुरु होत, कारण तुम्हालाच तुमचं मेहेनतीने उभं केलेलं कार्य पुढे न्यायचं असतं, त्याकरता अजून नवीन विचार, पुढील कार्यक्रमणा करण्याकरता विविधअंगी लेखन आलंच. हे कधीही ना संपणार नातं आहे. हीच तर खासियत आहे संशोधनाची.
काही प्रसिद्ध संशोधक पीचडी च्या उदघाटनाला येतात, ते सातत्याने एकाच गोष्ट सांगतात कि संशोधनात इतकी ताकद आहे कि मानवांमधे ३६० अंश बदल घडतो. त्यावर माझं असं ठाम मत आहे कि संशोधनाबरोबरच लिखाणालाही अनन्य साधारण महत्व आहे. संशोधन केलं आणि ते पोचलंच नाही जनते पर्यंत तर काय उपयोग? त्यामुळे लिहिता लिहिता संशोधकाला स्वतःची नव्याने ओळख होत जाते. आणि पीचडी ची खासियत आहे कि हे अविरत चालूच राहत पीचडी पश्चात देखील. प्रत्येक लेख हि एक लघुकथातच असते, ज्यात पात्र असतात आणि एका मोठ्या पटलावर आपल्या क्षेत्रातले विचार ठळक पणे मांडत राहणं म्हणजेच स्वतःची विशेष ओळख होणं होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...