नागपुरात असतांना सिताबर्डी आणि विविध मोदी गल्लीची सैर म्हणजे फारच मोठी पर्वणी होती, अनेक तास निघून जायचे. अनेक तास आनंदाने उपभोगले जायचे हे हि तितकंच खरं. बहुतेक मैत्रिणीसोबत जाण होत असे आणि व्यवस्थित यादी करून जात असू आम्ही, अर्थात व्हेरिएटी चौकात उतरलं कि रस्त्याने चालता चालता अनेक अजून छोट्या छोट्या वस्तूंची भर पडायचीच यादीत नसलेल्या. आणि काही वस्तू ह्या यादीत नसायच्याच पण आवर्जून घेतल्या जायच्या त्यात नाडा हा होताच. नाडा हि वस्तू बहुउपयोगी होती, घरात सतत लागत असे. फक्त पायजम्यात नाही बर का, हे बांधायला ते बांधायला लागत असे. त्यामुळे एखाद बंडल आणलं जायचंच न कळत. स्त्री पुरुषांच्या पारंपारिक वेशभूषेत आणि अनेक जणांच्या रोजच्या वापरातला हा नाडा. अर्थात आता तो अजिबातच निरुपयोगी झालाय ते वेगळं. माझा लेक वर्षातून एकदा कुर्ता पायजमा घालत होता, आता त्याने कुर्ता जीन्स घालणं सुरु केलं आहे. आणि बाकी कुठेच कधीच नाडा चे अस्तित्व नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
सध्या माझा दररोज चा पोशाख म्हणजे आरामदायी पायजमा आणि टी शर्ट, बास. ह्या आरामदायी पायजम्यात इलॅस्टिक शिवाय त्याच रंगाचा गुड-लुकिंग नाडा देखील दिला आहे, गरज पडल्यास वापरायला. गेले काही दिवस तो लांबलचक आणि थोडा जाडसर नाडा ओढला गेला होता आणि सारखा पायात येत होता, इरिटेट करत होता. आज ठरवलंच मी कि सोक्षमोक्ष लावायचाच. अजून ओढून बघितलं तर बाहेर येईना कारण त्याच्या टोकाला गाठ बांधली होती. आता आली का पंचाईत, मग म्हटलं जरा शांततेत त्याला पुन्हा आत ढकलुया. केली कि सुरवात. नाडा घालायची पण पिन न वापरता. दिव्य होत, खूप वेळ लागला पण पेशन्स ठेवल्यामुळे सरतेशेवटी विजय मिळालाच. मज्जा आली, मला, नाड्याला असा नवीन प्रवास करण्यासाठी, आणि अर्थातच पाजम्याला देखील.
न कळत अनेकदा आणि अनेकदिवस रोजचं मार्गक्रमण करतांना आपण असेच विविध, छोटे-मोठे, "कधीही न केलेले" असे प्रयोग करत असतो, नाही का?, कधी उपयोगी उपकरण वापरून कधी न वापरता, कधी पुढचा विचार करून तर कधी मागील पानावरचा बोध घेऊन, कधी चिडून तर बरेचदा शांततेने, कधी सोडून देऊन तर कधी पकडून धरून, ई. गोळाबेरीज म्हणजे शिकवण नवनवीन रंगबेरंगी शिकवण आणि अधिक स्थिरता शांतता आनंद परमानंद.
बरच झाला हा नाडा पायात लोळत होता, मला नवीन छोटीशी गोष्ट आज शिकायला मिळाली, अनेक वर्षानंतर मी नाडा घातला असेल बहुतेक, जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच आणि ह्या चार ओळी देखील लिहिता आल्या. अहाहा. भन्नाटच. थँक्स नाडा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा