मंगळवार, ६ जुलै, २०२१

सरळ

हा माझा फार लाडका शब्द आहे, फारच साधा, सोप्पा, ना उकार, ना वेलांटी, ना काना, ना मात्रा पण तरीही फार गुढ असा, माझ्या साठी. कसं काय म्हणताय? थांबा सांगते, ऐका. आणि हो इतक्यातच मला ह्या छुटुकल्या शब्दाचा नवा अनुभव आला, वेगळा असा, म्हटलं चला लिहावं.

अगदी काही बोटावर मोजण्या इतके लोक जर सोडले तर मला सांगा कोण सरळ आहे हो? कोण सरळ बोलतं? सरळ चालतं? सरळ एका ओळीत लिहीत? सरळ बघतं (सारखी मान ती खालीच आजकाल, नाही का?), सरळ कोण विचार करतं? सरळ कोण झोपत (हेकडं-वाकडं, ज्याला जसं आवडतं भावतं तस्स) ई. असे असंख्य उदाहरणं इथे मांडता येतील सरळ सरळ हो.

असो.

आताशा तर वाकडचं सरळ वाटायला लागलंय सगळ्यांना, कारण तेच प्रकर्षाने वापरलं जात, उपयोगात येत बहुतांशी. रादर लोकांना अजिबात सरळ स्पष्ट आडपडदा बोलणारा / री आवडत नाहीच.

मग जर सगळ्या जगाला हे वास्तव्य माहित आहे तरीही सरळ चा आग्रह का?

हो, गेले १२ दिवस मला जबरदस्ती एक संपूर्ण पाय अगदी काट्याप्रमाणे सरळ ठेवायला सांगितला आहे, किंबहुना भला मोठा गुढघ्याचा ब्रेस आणून त्यात टाकून ठेवलाय आणि पुढील काही दिवस पण तस्साच ठेवायला सांगितला आहे. देवा.

दिसायला सोप्प दिसत पण अवघड आहे माझ्यासारखीला. सतत पायाला भिगरी असणारी मी, एका जागी बसणं म्हणजे शिक्षाच, पण असो, सध्या गरजेचं आहे, त्यामुळे मुकाट शांतपणे हे दिवस पण आनंदात उपभोगणं सुरु आहे. सगळ्यात अवघड काय असेल तर सगळ्यांना मागणं हे द्या ते वाढा, बापरे, अशक्य कोटीची गोष्ट आहे माझ्या साठी. अर्थात त्यांना पण कुठे सवय आहे ह्या सगळ्याची.

अनेकदा मी मनात म्हणायचे, "मला आठवडा भर झोपून राहायचं आहे, काही करायचं नाही..." ई. नक्को नक्को देवा, अजिबात नाही, मी हिंडती-फिरती च फार उत्तम. "आराम हराम है" हेच बरोबर.

नैसर्गिक हालचाल चालू राहणं अतिशय महत्वाचं, पाय दुमडणं, वाकवणं, मांडी घालणं, उपड बसणं ई. हे सगळं लवकरचं मी करणार हे नक्की. ह्या सगळ्या दिवसात "सरळ" स्पष्ट समजला मला अर्थ पुन्हा एकदा, ह्या शब्दाचा. 

#straight #in-a-line #active #actions-are-important #knee-brace #difficult-situation #having-fun #new-normal #natural-movements #knee-activities #importance-of-knee

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...