शनिवार, २४ जुलै, २०२१

पिठलं आणि बरंच काही...

विविध वयाच्या टप्प्यात मी हळूहळू वेगवेगळे पदार्थ खायला शिकले. सुरवातीला गुळ-तुप पोळी, साखर-तुप पोळी, साखरांबा / मेथांबा पोळी ई. पासून सुरु झालेली ओळख मग न्याहारीच्या पदार्थांवर आली. ह्या पदार्थांपैकी कुठलाही पदार्थ चालायचा तेव्हा कुठंही गेलं तरी, कारण आई च्या भजनाचा कार्यक्रम एकदा सुरु झाला आणि रंगला कि वेळ होत असे. मी लहान त्यामुळे भूक लागायची आणि जेथे कार्यक्रम असे त्यांच्या घरचे आणि मी माझी साधी भूक सांभाळून घेत असू. तेच श्री. गुरुचरित्र साखळी परायणाच्या दिवशी देखील. असो.

आमची बहुतेक ठरलेली घरं होती हे सगळे उपक्रम करण्यासाठी. त्यात एक कुटुंब होत ज्यांच्याकडे आजी आजोबा त्यांचे चिरंजीव, सून आणि दोन नातवंड होती. आजी आजोबांना ह्या सगळ्या धार्मिक गोष्टींची आवड फार, पण चिरंजीव अतिशय नास्तिक आणि तरुण पिढीतले. हॉल मधे कार्यक्रम सुरु झाला कि आम्ही मुलं एकत्र अंगणात, गच्चीवर किंवा मुलांच्या खोलीत खेळायचो. मोठी माणसं कार्यक्रमात गुंग आणि आमच्या मुलांसाठी आधी कोरडा खाऊ मिळायचा, पण त्या मुलांचा बाबा फारच शिस्तीचा, रागीट आणि धाकात ठेवणारा पण. आम्ही मुलांनी जेवणाची वेळ झाली कि गरम पोळी खावी असा त्याचा आग्रह. बहुतेक त्यांच्या कडे पिठलं पोळी असायची. मला पिठल्यावर भरपू$$$$$र तूप आवडायचं आणि त्यांच्या मुलांना तेल. काय जेवायचो आम्ही सगळे अहाहा. मज्जा काही औरच होती ती.

नरसोबावाडीला एकदा असेच खूप उशिरा रात्री आम्ही सगळे पोचलो, तेव्हा साध्या फोनचा पण जमाना नव्हता, त्यामुळे पोचल्यावर गुरुजींच्या बायकोने सांगितले, देवाचं दर्शन घेऊन या तो वर मी थोडसं खायला करते, स्वयंपाकाचं बघते. आम्ही दर्शन घेऊन आलो कि त्यांनी ताट वाढली पिठलं भात. बास, पण तस्सा पिठलं भात मी आज तागायत कुठेही खाल्ला नाही, झट कि पट, न कांदा, ना टोमॅटो, फक्त फोडणी, चव मात्र ह्या जागावेगळी उत्कृष्टच. अहाहा.

माझी आई डाळीचं पीठ कालवून आणि न कालवता दोन्ही पद्धतीने पिठलं करायची. ते न कालवलेलं पिठलं तर अजूनच भन्नाट लागायचं, मधे मधे येणाऱ्या गुठळ्या, असं वाटायचं एखादी वड्यांची उसळ / भाजी खातोय, अहाहा...

त्यानंतर पिठल्याच्या वड्यांची ओळख झाली आणि जे गट्टी जमली, ते कायमचीच.  

मग पुढील प्रवासात सुरळीच्या वड्या समोर आल्या आणि मी प्रेमातच पडले त्या पदार्थाच्या...

माझ्या नागपूरचा जग प्रसिद्ध गोळा भात पण डाळीच्या पिठाचा वापर करून केलेला पदार्थ...

एकंदरीत पिठलं आणि डाळीच्या पीठ असलेले विविध पदार्थ जशी जशी ओळख होत गेले तसे तसे फारच आवडत गेले आणि अजूनही आवडतात मनापासून. आज पिठलं भाकरी झुणका असा अस्सल बेत होता, आणि तो मनापासून उपभोगतांना हा भजनांच्या कार्यक्रमापासून सुरु झालेला लहानपणीचा प्रवास आणि खादाडी डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखी उभी ठाकली.   किती साधे दिवस होते ते, मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी सुद्धा, "आन दो" अशी खाण्याची तय्यारी होती, काहीही साधं घरच नेहेमीच चालत असे, नखरे माहित नाहीच. शिवाय व्यवस्थित खाणं, थोडं थोडकं माहितच नाही. नितांत सुंदर दिवसांची आठवण आणि सफर घडली आज, पुन्हा एकदा. सहीच. 

#Pithal #Maharashtrian-Food #Simple-food #foody #Gram-flour-dish #Popular-dish #Easy-to-make #Full-of-proteins #Common-food-item #Gram-flour-dishes #Gola-bhat #Nagpur-special #Simple-life 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...