रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

माझी खाण्याची आवड

मला भरपूर, वैविध्य प्रकार आणि कधीही खायला / ताव मारायला भयंकर आवडतात. माझ्या नागपूरच्या वास्तव्यात तर अनेक जण मला म्हणायचे "अगं भयंकर हा शब्द कसा काय वापरतेस तू सर्रास, ते देखील खाण्याच्या बाबतीत?"

गेले कित्येक दिवस मी नारळांकडे आणि नारळ माझ्याकडे फक्त बघत होते. खूप काही खुणावत होते पण माझा थोडासा आळस आडवा येत होता. म्हटलं आज नाहीच. आज त्याच काही तरी करायचंच म्हणजे करायचंच. 

मी अनेक वर्षांनी आज प्रयोग केला उकडीच्या करंज्यांचा. मोदकाचा आकार काय आणि कारंजी काय. तशीपण मोदक केले तरी "भाऊ-बहीण" ह्या नात्याने एक कारंजी करावी लागतेच. माझ्या लेकाला मोदकाचं डोकं फारसं नाही आवडत खायला. आणि कारंजी आकार द्यायची नसल्यामुळे झटकीपट होते देखील. म्हणून फटाफट सारण केलं, उकड केली आणि करंज्या केल्या देखील. अन-सीझनल उकडीच्या करंज्या खायला नक्की मज्जा येईलच, तय्यार झाल्यावर. पण आधी मी मनसोक्त ताज खोबर खाल्लं, मग सारण एन्जॉय केलं आणि जश्शी उकड झाली रे झाली मळून ती कोमट असतांनाच अगदी स्वर्ग सुख जशी फस्त केली. काय पदार्थ आहे ना उकड म्हणजे? अहाहा. भन्नाट प्रतिच्या चिन्नोर तांदळाची, त्यात मीठ आणि जरासं तेल आणि तो कोमटपणा, देवा, ह्या जगाच्या पलीकडलेच, माझ्या साठी. कित्ती लिहू आणि कित्ती नाही असं झालयं मला आता. मला काहीही आवडतं हेच खरं. का? ते माहित नाही बिलकुल. पण ह्या उकडीने दिलेला परमानंद पुढील खूप दिवस / आठवडे पुरणार हे नक्की, माझ्या साठी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...