मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

बाबा उवाच ...

आधी बरेच दा लिहिल्याप्रमाणे माझे बाबा म्हणजे एक विश्वविद्यालय च होते माझ्या साठी. सतत छोट्या छोट्या गोष्टीतुन खूप काही शिकवून जायचे. आणि हो, उगाचच पाल्हाळ प्रश्न कधीच विचारात बसायचे नाहीत.

एखादवेळी मी डोकं धरून बसलेले दिसले, किंवा एकंदरीत शांत दिसले कि यायचे आणि फक्त पाठीवर थोपटून "हम्म..." एवढंच. बास मग काय तो धागा धरून मी पट्टाकिनी बोलून जायचे, "बाबा माझं डोकं दुखतंय हो$$$$$$$$$$$$$". "आहे तर".  देवा, मग त्यांना पण धपाटा द्यायचे मी आणि "काय हो बाबा, माझं डोकं दुखतंय आणि तुम्ही माझी मजा करताय". अश्या पद्धतीचा आमचा संवाद चालायचा आणि कधी ते डोकं दुखायचं थांबायचं कळतच नसे.

त्यानंतर कधी थोडीशी जास्त वेळ झोपून राहिले कि पुन्हा यायचे आणि त्यांनी फक्त प्रेमाने बघितलं च कि मी सुरु "बाबा$$$$ मला आज ताप आल्यासारखा वाटतोय". "तापचं ना, संताप नाही ना? मग ठीक आहे. कारण ताप गोळी घेतला कि उतरतो, पण संतापला इलाज नाही अजून सापडला". एकदम फ्रेश वाटायचं.

तीच लिगसी आता दुप्पट स्वरूपात आहे माझ्या कडे. माझे पाय किंवा गुढगा दुखायला लागला कि अगदी माझ्या बाबांचा भास होतो मला, दोघे सुरु करतात. "अगं मम्मा, आजोबा म्हणायचे कि नाही डोकं दुखतंय म्हणजे तो त्याची असल्याची जाणीव करून देतोय तुला. ताप येणं म्हणजे तुमचं शरीर लढाई करतंय कोणाशी तरी, चांगली गोष्ट आहे हि. तस्सेच पाय / गुढगा सांगतोय तुला कि मी आहे, थोडीशी अजून काळजी घे, थोडसं थांब, आणि मग पुन्हा सुरु कर. हो कि नाही, तो गुढगा त्याची जाणीव करून देतोय बास. सो चिल".

आता मला सांगा, इतके गोड शब्द ऐकल्यावर गुढगा पण फोन करून सॉरी म्हणाला मला काल आणि नेहेमीच म्हणतो. आणि बाबा काय किंवा मुलं काय सध्या माझ्या समोर प्रत्यक्ष नाहीत पण त्यांचे प्रेमळ शब्द देखील पुरेसे आहेत. काल पुन्हा गुढग्याने डोकं वर काढलं, रात्रभर दुखाला पण हे सगळे प्रसंग आठवले, औषध घेतलं, व्यायाम केला, हे लिहिलं आणि आता पुन्हा काम सुरु, बॅक टू नॉर्मल. चला मंडळी कामं खुणावतात आहे, पळते आता, भेटू पुढील अनुकथेत लवकरच.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...