एकदा एक निबंध / कथा लेखन स्पर्धा होती. अर्थात मराठीत असल्यामुळे असेल कदाचित मी पट्टाकिनी भाग घेतलाच. अश्या उड्या मारायला मला नेहेमीच आवडतात. काही ठळक शब्द दिले गेले होते आणि त्या भोवती आम्हाला शब्द गुंफायला सांगितले होते. बास मग काय झाले सुरु, संपवला लेख आणि दिला पाठवून. स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आणि मला स्टेजवर आमंत्रित केलं गेलं, ह्या माझ्या लिखाणाबद्दल सांगायला. त्या लेखाचं शीर्षक होत "सेवा". थोडक्यात म्हणजे गोरगरिबांची वेगळा वेळ काढून, त्यांच्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात सेवा करणं मला जमत नाही, त्यामुळे घरीच येणाऱ्या माझ्या मावशींना सातत्याने मी कशी मदत करते, त्यांच्या कामाचा भार कसा कमी करते ई. बद्दल माझी मतं मांडली होती. पण ती परीक्षकांना भावली आणि मला बक्षीस पात्र समजण्यात आले होते. मग तो लेख एका मासिकात पण आला होता.
आज इतक्या वर्षांनी मला हे का आठवलं म्हणताय? सांगते.
काल पासून जरा माझी पाठ कुरबुरते आहे, मान धरून आल्यासारखं वाटत होत आणि नवीन ठिकाणी काय करावं सुचत नव्हतं. पण मग एक मावशी तय्यार झाल्या मालिश साठी, पण वेळेवर त्यांना देखील जमलं नाही यायला. असो.
आज ऑफिस मधे भरपूर काम होत आणि बसणं थोडं अवघड होत होतं. माझ्या बरोबर एक चुणचुणीत मुलगी दिली आहे सगळी मदत करण्या करता. तिला मी चुणचुणीत का म्हटलं आलं का लक्षात? अहो तिने मला बघितल्या बरोबर म्हटलं, मॅडम मी तुम्हाला आत्ताच छान गरमागरम चहा आणून देते म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. त्या नंतर बसल्या जागी इतकं भन्नाट ऍक्युप्रेशर केल्यासारखं मस्त फटाफट दाबून दिल कि माझे डोळेच बंद व्हायला लागले अक्षरश:
ह्यालाच म्हणतात सेवा, मी करू का? देऊ का? आणू का? असले प्रश्नच पडत नाहीत तिला. वा काय व्यक्तिमत्व आहे. एक पाऊल पुढेच जगाच्या. मला खात्री नव्हती कि असे लोक अजून असतील म्हणून पण मी चुकले.
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा ।
बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै ।
नारायणयेति समर्पयामि ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा