शनिवार, ५ मार्च, २०२२

त्या पल्याड

बहुतांशी सगळ्याच शैक्षणिक संस्थेत असतं त्या प्रमाणे आमच्याकडे सुद्धा हजेरीच्या दोन भल्या मोठ्या वह्या आहेत = उपस्थिती नोंदवही / अटेंडन्स रजिस्टर. सगळ्यांना म्हणजे सगळयांना त्यात  दररोज आल्या आल्या सह्या कराव्याच लागतात. एक भली मोठी वही शिक्षकांसाठी आहे आणि दुसरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे. ह्याची कारणं अनेक आहेत, दुजाभाव अजिबात नाही तर :

  • गर्दी कमी होते, एक वही ठेवली तर खूप वेळ लागेल सगळ्यांना सही करायला
  • कदाचित ऑफिस मधल्यांना असे दोन वेगळे रेकॉर्डस् दाखवावे लागत असतील
  • नवीन ये-जा सुरूच असते संस्थेत, त्यामुळे त्यांची नाव टाकायला सोप्प
  • सुट्ट्या ची माहिती ठेवलाय सहज
  • आणि इतर बरीच कारणं

प्रत्येकाच्या शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार कामं दिली जातात आणि हुद्दा देखील. कर्मचाऱ्यांना ते काम आवडतं असतं आणि वर्षानुवर्षे ते केल्यामुळे त्यात ते फार निपूण / पारंगत होतात आणि त्यांची बढती होते, अनुभवात वाढ होतेच, एक स्थिरता येते / प्राप्त होते

फारच कमी वेळा आणि खूप कमी लोकांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवणारे बदल होतांना आढळतात. काही मंडळी  काम करता करता पुढचं शिक्षण घेणं, विविध ध्येय गाठणं आणि पुढे मार्गक्रमण करत बाकीच्यांना प्रेरित करणं अविरत चालूच ठेवतात. स्वतःला कुठल्याही कोशात बांधून ठेवत नाहीत अश्या व्यक्ती आणि त्यामुळे अथक प्रयन्तांमुळे ते ह्या वही ऐवजी त्या वहीवर सही करण्यास पात्र ठरतात. अशी बोटावर मोजण्या इतकी उदाहरणं आहेत आणि त्यांच्या कडे बघून खूप अभिमान वाटतो, ऊर्जा मिळते आणि सलाम करावासा वाटतो. हा त्यांनी गाठलेला टप्पा फक्त "हि ते ती" वही इतका सरळ आणि सोप्पा नाही हो. शिक्षकेतर ते शिक्षक म्हणजे विविध नवीन पदव्या मिळवणे, संशोधन करणे, पेपर्स लिहिणे, शिकवणे, विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधणे, विद्यार्थ्यांकडून संशोधन करून घेणे, आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत राहणे स्वतःच्या संशोधनाने आणि बरेच काही. हे सगळं करण्याची इच्छा होणे, ते कृतीत आणणे, वेळेचा ताळमेळ बसवणे, असंख्य बाकीची कामे मार्गी लावणे आणि घर पण संभाळतं हा प्रवास, हे स्थलांतर साध्य आणि सिद्ध करणं म्हणजे फार मोठं आव्हानच. हे सगळं आज आठवायची दोन महत्वाची कारणं आहेत 

१. हे भव्यदिव्य आव्हान सहजी पेललंय माझ्या एका मैत्रिणीने, ते देखील पूर्णवेळेची नोकरी करून, घर आणि मुलं सांभाळून, लॅब असिस्टंट ते शिक्षक हा पल्ला गाठला आहे आणि खात्री आहे अजून बरेच टप्पे पार करतील हसत लवकरच 

२. मी जेव्हा विद्यार्थिनी नंतर त्याच संस्थेच्या  पॉलिटेक्निक कॉलेज मधे शिक्षक म्हणून रुजू झाले तेव्हा माझ्या काही शिक्षकांनी मला एक प्रश्न विचारला, "बेंचच्या ह्या बाजूहून त्या बाजूला जातांना कसं वाटतंय?" आणि आता हाच किंवा असाच प्रश्न मला माझ्या मैत्रिणीला विचारावासा वाटतोय, "ह्या वहीतून त्या वहीत" कसं वाटतंय? मला उत्तर माहिती आहे, संपूर्ण समाधान. 

मला खात्री आहे कि ह्या नवीन दिवसांनी अनेक विविध कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे अनेक जण ह्याचा लाभ घेतील आणि ठोकताळा शिक्षण पद्धतीचं नव्हे तर बाकी इतर मार्गांनी देखील उंची / ध्येय  गाठता येते हे सिद्ध करून दाखवतील समाधानाने त्यांच्या प्रचंड / दुर्दम्य इच्छाशक्तीने, न थांबता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...