गेली अनेक वर्षे वैविध्य प्रकारचे, आकाराचे आणि लांबी-रुंदी-जाडीच्या दरवाजाच्या कड्या / हॅन्डल बघितले आहेत, वापरले आहेत. काही अगदी पिटुकले असतात, काही नेहेमी दिसणारे किंवा वापरले जाणारे तर काही भले मोठे. घरी वेगळे आणि दारी म्हणजे ऑफिस मध्ये अगदीच निराळे. जुन्या घरी वेगळ्या धातूपासून तय्यार केलेले आणि अर्थातच जुन्या पद्धतीचे आणि नव नवीन संशोधन होत निघालेले नवीन प्रकारच्या घरात लावलेले हॅन्डल देखील. गम्मत म्हणजे घरी खोली प्रमाणे प्रकार, आकार, जाडी उंची बदलते किंवा फॅशन नुसार देखील. गेले ते दिवस जेथे सरसगट सगळतीकडे जथ्था एकच प्रकार. नाही, नाही, आता सर्वत्र वैविध्यता, रंगसंगती. माझ्या ऑफिस मध्ये संपूर्ण दाराच्या आकाराचे / उंचीचे हॅन्डल आहेत. आधीच ते ऑफिस, म्हणजे भव्यदिव्य दार आणि त्याला वर पासून खाली पर्यंत भलं मोठं हॅन्डल एक आतून आणि एक बाहेर देखील. देवा, अबबच. खरंच एवढ्या मोठ्या हॅन्डल ची गरज आहे का? मला तर फारच मोठा प्रश्न पडला आहे. असो.
इतक्या वर्षांनी आज इतक्या प्रकारचे हॅन्डल बघितल्यावर मला हॅन्डल बद्दल एक नवीन गोष्ट ध्यानात आली, वेगळा एक दृष्टिकोन असू शकतो हे जाणवलं. सरते शेवटी हॅन्डल छोटं असो किंवा मोठं ते आधारासाठी च लावलं जातं, नाही का? पकडण्यासाठी, धरण्यासाठी, उघडझाप करण्यासाठी आणि बरेच कारणं आहेत. त्याच्या शिवाय कुठल्याही दाराची, ड्रॉवर ची उघडझाप होणार कशी, आणि उघडझाप जर करता आली नाही तर मग सामान ठेवण्यासाठी / काढण्यासाठी, ते ज्याच्या साठी बनवलं आहे त्याच्यासाठी कसा उपयोग करायचा त्या वस्तूंचा? नाही का? अहो आपण सर्व जण देखील कुठल्याना कुठल्या कारणासाठी आणि उद्देशानेच ह्या धरतीवर विराजमान आहोत. मग आपण सगळे जण एकमेकांचे जसे लागतील तसे हॅन्डल झालो तर? नेहेमी उपलब्ध राहिलो तर? आधार दिला तर? आपलं अस्तित्व कळू दिलं, दाखवलं तर? सार्थक झाल्यासारखं वाटेल नाही.
अगदी सध्याच्या जगात बिना हँडलची दारं देखील आहेत, अदृश्य अशी एक छोटीशी जागा केली जाते आणि त्याला वापरून उघडझाप शक्य होते सहज, शिवाय हॅन्डल चा खर्च नाही, देखभाल करावी लागणार नाही आणि दिसायला पण सर्वोत्तम. नाही का? ढोबळ मानाने सर्वत्र दिसणारेच हॅन्डल असतात पण काही थोड्या प्रमाणात असे पण आहेत. चला तर मग, असाच अदृश्य आधार देऊया सर्वांना, नकळत, शांततेने, प्रार्थनेच्या स्वरूपात, काही देखभाल नको, खर्च तर नकोच नको आणि शिवाय संपूर्ण जगापर्यंत पोचणं शक्य. बरोबर कि नाही?
आताशा फक्त स्पर्शने उडणारे दरवाजे पण आहेत, तसेच मायाळू, अगदी नाजूक रित्या स्पर्श करून आधार देऊ यात, ज्यांना शक्य आहे तेव्हा आणि गरज पडेल तेव्हा. कारण ह्या स्पर्शाची भाषा आणि दिलेला / मिळालेला आधार काही निराळाच असतो.
तुम्हाला आवडेल, रुचेल, पचेल आणि जमेल तस्से हॅन्डल सारखे एकमेकांसाठी / सर्वांसाठी उपलब्ध राहणं अत्यावश्यक आहे हे लक्षात ठेवा, कारण सर्वांनाच त्याची गरज आहेच, आणि नेहेमी पडेल पण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा