मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

तेल-विरहीत

थालीपीठ म्हणजे एक सुबक-सुंदर गोलसर आईची बोटं उमटलेले सरबरीत आणि ओबडधोबड पण जगावेगळं चविष्ट असं काहीतरी भन्नाट. ह्या पदार्थाला शब्दात बांधणं म्हणजे गुन्हाच. गोलसर आणि इकडे तिकडे छोटे छोटे भोकं केलेले, मुद्दाम. त्यामुळे दिसायला सुशोभित आणि शिजायला पट्टकन. कारण त्या सर्व भोकांमधे थोड्याफार प्रमाणात तेल सोडलं असतं, अवतीभोवती तर असतंच पण मधे देखील. प्रत्येक घास खुसखुशीत लागावा, चव जिभेवर रेंगाळावी आणि पौस्टिक असल्यामुळे असं खाण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून असेल कदाचित हे तेल प्रकरण. असो.

आमचे एक स्नेही एका दूर देशात वास्तव्याला आहेत. शनिवार रविवार आणि सणासुदीला प्रचंड स्वयंपाकाची आवड म्हणून आणि सेवा म्हणून ते तिथल्या स्थानिक देवस्थानात स्वयंपाक करतात भल्यामोठ्या प्रमाणात. आणि त्यांच्या हाताला भलतीच चव आहे, उत्कृष्टच होतो पदार्थ. एकदा भेट झाली तेव्हा आणि त्यांच्या विविध मुलाखतींमधे देखील ते म्हणतात कि विश्वास ठेवा अथवा नाही, माझ्या पुरतं हे मर्यादित आहे कि माझ्या स्वयंपाकाला चव येते ती "त्याच्या" मुळे आणि भरपूर एक मसाला मनसोक्त वापरल्यामुळे, तेल.

तेलाची कदाचित हि खासियत आहे कि चव येतेच पदार्थाला.

काही वर्षांपासून काही लेख छापून आले काय आणि सगळेच वेडे झालेत. कुठेही कान द्या, हेच ऐकायला मिळेल, हे खाऊ नका आणि ते खाऊ नका. ह्या पठडीतले दोन भयंकर प्रकार माझ्या दृष्टीपथात आले इतक्यातच, एक म्हणजे बिनतेलाचं थालीपीठ, दुसरं तेल वेगळं काढलेले थालीपीठ. बाप रे,मी उडालेच. इतकं सगळं करण्यापेक्षा, सोंग आणण्यापेक्षा, खा हो व्यवस्थित. अती नको आपण मन मारून पण नको. खा आणि पचवा, कामं करा, घरातली स्वच्छता करा, खाल्लेलं जिरेल असं काहीतरी नियमित करा आणि ज्या पदार्थांमधे लागतं त्यात हात आवरून घाला हो, तेल. नाहीतर सांधे त्यांचं काम करणार कसे, वंगण मिळायला नको, तेल तूप वाल्यांचा धंदा चालायला नको, तुमचं घर चकचकीत दिसायला नको. मग हे सगळं साग्रसंगीत हवं आहे ना तर तेल तूप वापरा पण सांभाळून. बास. सोप्प आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...