गेले दोन दिवस सुरु आहे हा अनोखा संवाद आणि मंडळी ऐकता ऐकत नाही आहेत, आता काय म्हणावं? कसं समजवावं? अगदीच कळत नाही आहे. पण असो, असा हि संवाद असतो हे एक तर समजलं आणि हा असा संवाद किती गरजेचा आहे हे उमगलं देखील. तर मी समजावलं माझ्या पायांच्या नसांना कि रुसू नका, फुगून बसू नका, नाराज झाल्यावर कोणी म्हणजे कोणी येत नाही हो तुम्हाला आंजारायला-गोंजारायला. किंबहुना त्याही पेक्षा रुसण्याचा तुम्हाला देखील त्रास होत असेल ना?, फक्त मला नाही, तुम्हीच नाही तर आजुबाजुच्या नसा, किंवा अजून मित्रमैत्रिणींना देखील सहन करावं लागत असणारच?. मग कशाला रुसता?, मनवायला कोणाला फुरसत आहे इथे?. त्यापेक्षा शांत राहा नेहेमीच. आता तरी झाली असेल ना माझी सवय?, माझ्या रोजनिशीची सवय?, मी कसे, कितपत शारीरिक आणि मानसिक काम करते ई. मग का हे नवीन वागणं? सोडा आता, कंटाळा नाही येत का सतत फुगून बसायला?, त्याला देखील मर्यादा हव्यात ना? इतकं समजावलं मनापासून तेव्हा कुठे चार शब्द फुटले एकदाचे आणि संवाद सुरु झाला.
नसांचे म्हणणे असे कि आम्ही फुगलो नाही तर तू थांबत नाहीस आणि ते जाऊ दे, पण आमचं अस्तित्व मग कसं ध्यानात येणार तुझ्या? आम्ही लपून बसलेले व्यक्तिमत्व, नजरेस पडत नाही कोणाच्याच त्यामुळे त्याची दररोज काळजी घेतली जात नाही, हात फिरवला जात नाही, कुठलही वंगण नाही कि गप्पा नाहीत, कारण का? तर आम्ही दडून बसलोत म्हणून? त्यामुळे मग डोकं वर काढतो गं, म्हणजे तुला आणि आम्हाला देखील थोडी विश्रांती आणि अप्रतिम खाद्य मिळतं, आतून-बाहेरून मस्त न्हाहून निघाल्यासारखं होतं. ह्या शिवाय अजून कुठलाच मार्ग नजरेस पडला नाही, त्यामुळे....
आणि बरं का मंडळी ह्या अश्या गप्पा रात्रभर मारल्या पठ्याने, निर्लज्ज कुठला, दुखरा माझा पाय हो.
मी थोडसं कुरवाळलं तर किंचित तीव्रता कमी झाली त्याच्या नाराजीची. त्यानंतर सकाळी / पहाटे जेव्हा स्वयंपाकाच्या मावशी आल्या, त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी न सांगता अप्रतिम तूप लावून पराठे करून खाऊ घातले, कडत्त पाण्याने शेकलं तेव्हा कुठे रुसवा सोडला ह्या वेड्याने.
सगळे वेडे माझ्याच प्रेमात का? हे एक अनुतर्रित समीकरण आहे हे मात्र निश्चित. असो, मागे एकदा लिहिल्या प्रमाणे दर रात्री झोपयाचंच असं कुठे नमूद करून ठेवलंय?, जागून काढावी कि कधी तरी आणि वेगळा अनुभव पण घ्यावा. आज-उद्या अजून एका विषयावर लिहीन म्हणते तो म्हणजे हे जे असे दुखणे-खुपणे असते ना ते का उद्भवते? ह्याचा कधी विचार केला आहेत का तुम्ही? त्यामुळे का होईना माणसं माणसांसोबत काही क्षण घालवतात, बसतात, ऊर्जा देवाण-घेवाण करतात, संवाद साधतात, मधुर बोलण्याचा प्रयत्न करतात, स्पर्श अनुभवतात ई. ज्यामुळे मग हवेच्या माध्यमातून सर्वदूर प्रेम पसरतं. अर्थात प्रेमाचे अनेक प्रकार देखील असतात, ह्या नसांचं एक फारच दृढ प्रेम, ते दाखवण्याची पद्धत त्याहून निराळी आणि आप्तस्वकियांकडून मिळतं ते क्षणिक पण महत्वाचं प्रेम. असो "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" आणि ते पसरत राहावं नेहेमी हे महत्वाचं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा