शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

अपराधी भावना

मी माझ्या मुलांना अनेकविध नावांनी हाका मारते त्यांच्या मूळ नावाशिवाय, का? कुणासठाऊक. आता त्यांनी पण मला एक नाव ठेवलंय आई ह्या उपाधीशिवाय, "गिल्ट मम्मा". मला सदानकदा अपराधी असल्यासारखं वाटतं, कि मी माझ्या लहान लेकरांना सोडून का नोकरी पत्करली? त्यामुळे मग त्यांना मी हवा तसा वेळ देऊ शकले नाही, खाऊ पियू घालू शकले नाही, त्यांना मी हवी होते तेव्हाच नेमकी मी घराबाहेर होते ई. आणि हे सगळं करून गोळाबेरीज काय मिळवलं मी? असो. काल पुन्हा ह्या विचारांनी माझ्या डोक्याचा अगदी भुगा झाला आणि तेव्हाच मला एक माझ्या ओळखीच्या कुटुंबाची आठवण आली. कारण असं कि त्या कुटुंबात एकंदरीत ५ माणसं, दोन मुली, एक मुलगा आणि काका काकू. सर्वात मोठी ताई, मग दादा आणि शेंडेफळ माझ्या वर्गात होतं. आम्ही एक कोर्स एकत्र केला होता, त्यामुळे काही महिने घालवले एकसाथ. त्या काळात समजलेली हि गोष्ट. ह्या कुटुंबाचं एक छोटेखानी पण टुमदार स्वतंत्र घर होत / आहे. आधी एक मजली होतं पण कुटुंब संख्या वाढली तसं ते दोन मजली करावं असं ठरलं आणि त्यानुसार बांधकाम सुरु झालं देखील. तिघंही मुलं लहान होती, काकू व्यवस्थित घर सांभाळायच्या आणि काका कामावर जायचे. वरच्या मजल्याचे छत / स्लॅब बांधून झाले, विटांचा काम झालं आणि कुठलेही कारण नसतांना अचानक काका गेले. त्याचा काकुंवर एवढा परिणाम झाला कि त्या थोड्याश्या भ्रमिष्ट अवस्थेत त्यांनी घर सोडलं. कुठंही त्यांचा थांग पत्ता लागला नाही. मग मोठ्या ताईने पुढाकार घेऊन खालचा मजला भाड्याने दिला आणि हि भावंडं वर राहायला गेली. एकही दार नाही, खिडकी नाही... तरी देखील मोठी ताई खूप मोठी सर्जन झाली, दादा MBA झाला आणि लहान इंजिनिअर. मग इतक्या वर्षांनी काकू एका देवळात / देवस्थानात सापडल्या. मुलं जाऊन त्यांना घेऊन आली आणि तेव्हापासून सगळं सुरळीत सुरु आहे. कुठलीही तुलना नाहीच पण अश्या किंवा काही काही आयांबद्दल ऐकलं वाचलं कि मग मला थोडासा हुरूप येतो. मला स्वतःला समजावता येतं कि तेव्हा जे मला सुचलं ते मी केलं. चुकलं पण आता ते बदलणं शक्य नाही आणि त्यामुळे त्याचा आता विचार करायचा नाहीच. बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्याकडे बघायचं. आता मुलं मोठी झाली आहेत, मार्गी लागली आहेत त्याचा आनंद उपभोगायचा. खूप खूप हलकं फुलकं वाटतंय मला आज. माझ्या त्या मैत्रिणीने आणि सगळ्यांनी खूप त्यावेळी हाल सोसले पण गेले ते दिवस आता. आज आणि उद्या कडे बघुयात, किंबहुना तेच बघणे अत्यावश्यक आहे. "गिल्ट मम्मा" हा खिताब आज पासून मी सोडून दिला आहे, किंवा असं काही होतं हे विस्मृतीत कायमचं गेलं आहे. २३ वर्षांपूर्वी ऐकलेली गोष्ट आज लक्षात आली आणि मोकळं होता आलं.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...