वैविध्य धाटणीतले चित्रपट आज गेली कित्येक दशके तय्यार होत आहेत आणि राहतील देखील. मागील ४० एक वर्ष तरी मी हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट बघितले आणि त्यातून बोध देखील घेतला. कधी कशी अप्रतिम कलाकृती असावी असा, तर कधी कशी असू नये असा. हळूहळू मी मार्गस्थ झाले आणि माझी एक खास आवड निर्माण झाली. तुम्हाला पटणार नाही कदाचित पण सध्या माझ्या समोर मला आवडतील असे, मला खूप काही शिकवून जाणारे चित्रपट समोर येतात विविध माध्यमांमुळे, जाहिरातींमुळे, वर्तमान पत्रामुळे किंवा सोशल मेडीया च्या माध्यमातून. आज देखील असेच झाले. मला एका चित्रपटाचं शिर्षकचं अतिशय भावलं आणि त्याने तेथेच जिंकलं देखील. मुळात मला लघुकथा आवडतात त्यामुळे देखील असेल, ह्या चित्रपटाची लांबी देखील आवडली प्रथमदर्शनी. मग काय, चिकटले सोफ्याला चक्क ५६-५७ मिनिटे सलग मी. अहाहा च. काय भन्नाट कलाकृती हो, मला माझ्या शब्दसंग्रहात / शब्दसंपदेत असलेले शब्द, उपमा अपुऱ्या पडत आहेत ह्या पिटुकल्या चित्रपटाचे वर्णन करायला. असंख्य लोकांना, दर्दी जनांना फार भावाला आहे हा चित्रपट, त्यामुळे खूप प्रशंसा आधीच झाली असणार पण ह्या चित्रपटाचा लेखक किंवा ज्याच्या सुपीक डोक्यात हि आयडियाची कल्पना सुचली आहे तो एक जगावेगळा माणूस असणारच ह्यात शंकाच नाही. मला मनापासून भेटायचं आहे त्याला / तिला, आणि पट्टाकिनी, लवकरात लवकर. किती बोलू आणि किती नाही असं झालंय मला. काही प्रसंग तर आरपार गेलेत, थेट भिडलेत. हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय उतरवणं अशक्यच. खूप सुंदर दिवस असणार आहेत पुढचे ह्याची शाश्वती देणारा आहे हा चित्रपट माझ्या दुर्ष्टीने. असं घडू शकतं हे दर्शवणारा, झोपलेल्या जिवंत माणसाची कदर करणारा, हे विचार प्रवृत्त करणारा, घरच्या कामाची लाज बाळगू नये हे अप्रत्यक्षपणे संदेश देणारा, कुठलाही भेद न ठेवता आपण आधी माणसे आहोत हे सहज सांगून जाणारा, वायफळ प्रश्न न विचारात समोरच्याला समजावून घेऊ शकतो हे सांगणारा, आणि बरेच काही. मी पूर्णपणे प्रेमात पडले आहे ह्या चित्रपटाच्या "नील मृगसी" च्या, नीलच्या आणि लेखकाच्या.
माझ्या सारख्या प्रचंड बडबड करण्याची आवड असणाऱ्या, कुठल्याही विषयावर तासंतास बोलू शकणाऱ्या व्यक्तीला निःशब्द केलं आणि कमालीची कलाकृती घडवल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
"नील मृगसी": https://www.youtube.com/watch?v=F7pnfKFK7BQ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा