वडे ह्या नावाचा मला किंचितसा विसर पडला होता. आज बरे झाले त्याची आठवण झाली कारण बरीच वर्ष आमच्याकडे दोन पद्धतीने / प्रकाराने केलेल्या टिक्क्याचं जास्त प्रमाणात होत होत्या. त्याची कारणं मला आज कोणाशीतरी संवाद साधतांना प्रकर्षांने लक्षात आली, जी किंचितशी विस्मृतीती गेली होती. मी एक पूर्णवेळ कचेरीत जाऊन काम करणारी गृहिणी असल्यामुळे, मुलांना शाळेच्या डब्ब्यात विविधता देता यावी ह्यामुळे आणि वेळेचा सदुपयोग ह्या विविध अंगांनी सर्वतोपरी विचार करून माझी कृती होत गेली अनेक वर्षे. आता मुलं डब्बे नेत नाहीत त्यामुळे जरासं सगळं मागे टाकलं गेलं होतं. साबुदाणा, भगर, बटाटा (उपवास आणि बिगर उपवास) दोन्ही प्रकारच्या पण टिक्क्याच जास्त प्रमाणात केल्या गेल्या कारण त्या एकदा तव्यावर टाकल्या, किंचित तेलाचे थेंब सोडले आजूबाजूला कि मी माझी सकाळची, घाईची कामं करायला मोकळी. शिवाय थंड झाली टिक्की तरी झकास लागते, न्यायला सोप्पी, जास्त तेल लागत नाही, तळत उभं राहावं लागत नाही, पौष्टिक, चिवट होत नाही, चुकून गडबड झाली तर तेलात वडे उघडण्याची / उडण्याची भीती असते, ते नाही, आदल्या दिवशी रात्री मावशींच्या मदतीने टिक्क्या करून ठेवलं कि सकाळी पट्टदिशी करता येतात, अनेकदा मी मुलांना ह्या अश्या बिगरउपवास टिक्क्या घरगुती बर्गर च्या स्वरूपात ब्रेड मधे घालून पण खपवल्या आहेत. सर्वार्थानेच सोप्पे, नाही का?.
दुसऱ्या पद्धतीने होणाऱ्या टिक्क्या म्हणजे जर उपवासाच्या दिवशी खिचडी, भगर, किस उरलाच तर संध्याकाळी गम्मत म्हणून गरमागरम टिक्क्या होतं होत्या. अर्थात इतर दिवशी अगदी कांदे पोहे जरी उरलेच तर त्याच्या टिक्क्या पण लै भारी चविष्ट चवदार लागतातच ह्यात शंकाच नाही. आपण रगडा प्याटिस घरी करतांना देखील मुख्य बटाटा पण इतर भाज्या घालून, किंवा सहज इतर दिवशी देखील गम्मत म्हणून अश्या विविध टिक्क्या करतोच कि.
सध्याच्या दिवसात फक्त माझ्या सारखीला उपयोगी पडावं म्हणून वैविध्य पीठं उपलब्ध आहेत बाजारात. त्यातलं एक माझ्या आवडीचं पीठ म्हणजे उपवास भाजणी. ह्या भाजणीत सर्व माल घातला कि टिक्क्या तय्यार. भाजणीचं हुकमी तय्यार नसली तरी अगदी साबुदाणा, भगर ई. ची रवाळ पीठं घेऊन त्यात बटाटा किसून / उकडून, आवडतं असल्यास काकडी, दाण्याचं कूट ई. घातलं कि भिजवावं / शिजवावं वगैरे लागत नाहीच. कोण म्हणतंय कि घरी इन्स्टंट पदार्थ होऊ शकत नाहीत ते?. टिक्क्यांशिवाय अप्पे हा पण तरणोपाय आहे, किंवा पिटुकले थालिपीठं पण. वा वा. म्हणजे बघा ना, माझ्या कष्टांची, तेलाची, वेळेची, माझ्या ऊर्जेची बचत, त्यामुळे खायची रेलचेल आणि उत्साह वृद्धिंगत होतो तो वेगळाच, आहे कि नाही चविष्ट टिक्की सर्वतोपरी पौष्टिक?
काही का होईना एवढ्यात झालेल्या भूतकाळात मस्त फेरफटका मारता आला मला आणि माझ्या हातून काय काय घडवून घेतलं "त्याने" हे पुन्हा एकदा एखादा चित्रपट बघावा असे डोळ्यासमोर झर्रकन उभे ठाकले.
आजचा संवाद खूप काही देऊन गेला मला.
"असे संवाद घडती आणि स्मृती देऊनी जाती".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा