आपल्या देशात तरी नववर्ष दोनदा अत्यंत उत्साहाने साजरे केले जाते, एकदा दिनदर्शिकेनुसार आणि दुसऱ्यांदा तिथी नुसार, जसे कि गुढीपाडवा च्या दिवशी. तर मग नववर्ष वर्षातून फक्त दोनदाच साजरे होते का? तर त्याचं उत्तर आता शोधू या. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आणि त्यामुळे तुम्ही बघाल दिसणार आणि अनुभवणार. काही शैक्षणिक संस्थेमधे सुट्यांसाठी (EL, ML, CL etc.) १ जानेवारी ह्या तारखेला नवीन वर्ष सुरु होते. संस्थेमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन किंवा मूल्यांकन करण्यासाठी १ एप्रिल ते ३१ मार्च असे वर्ष धरले जाते, म्हणजे मूल्यांकन नववर्ष १ एप्रिल ला सुरु होते. कर दात्यांचे नववर्ष पण १ एप्रिललाच नाही का सुरु होत. अगदी तसे
- तुम्ही नवीन घरात राहायला गेलात कि एक नववर्ष सुरु होतं त्या वास्तूत
- नवीन लग्न झाल्यावर एक खास आणि वेगळंच नावीन्याने भरपूर असे वर्ष सुरु होते
- नवीन बाळ जन्माला आलं, नवीन गाडी / नोकरी, बढती, ई. सुद्धा नवीन वर्ष चालू होतं
- नवीन बाळ जन्माला आल्यावर त्या बाळा करता पण आणि नवीन आई वडील म्हणून पण नववर्ष
- दसरा दिवाळी, नवीन शेतीचे उत्पन्न, किंवा शेतीतले कोंब / हंगाम = नववर्ष
- हि यादी भली मोठी आहेच, शिवाय तुम्ही बघाल तेव्हा, आवडेल तेव्हा, सुचेल तेव्हा, घडेल तेव्हा तुमचं नवीन वर्ष.
- शाळा असो, विद्यापीठ असो, विद्यार्थ्यांना नववर्ष असतं, आपल्या देशात साधारणतः जून-जुलै मध्ये नवीन वर्ष सुरु होतं.
नवीन वर्षाची परिभाषा बदलण्याची आता वेळ नक्कीच आली आहे, किंबहुना आपण ती पाळतो नकळत पण आता त्याला औपचारिक रूप द्यायला पाहिजे. ह्याने इथे जाऊन नवीन वर्षाची पूर्वसंध्या साजरी केली, तो तिकडे गेला होता, त्याने अशी मजा केली त्याने तशी.... काय खात्री? आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून काहीही कुठलेही फोटोस तय्यार करता येतात. आणि दुसऱ्याने काय केलं हे बघून नाराज होण्यापेक्षा तुम्ही कशाला महत्व दिलंत ते बघा. ३१ डिसेम्बरला नागरीकांच्या सुरक्षितेसाठी जास्तीचा पोलिस फोर्स तैनात केला गेला होता, दरवर्षी हा आकडा वाढतच चालला आहे. ३१ डिसेंबर असून देखील काही वैद्यकिय व्यक्ती हजर होत्या, हॉटेल मधे मोठ्या प्रमाणात वाढपी आणि स्वयंपाकी होते आणि असे अनेक व्यवसाय आहेत ज्या माणसांना देखील ३१ ला मौज मज्जा करावी वाटणं स्वाभाविक आहे पण ते नाही करू शकले, कधीही करू शकत नसतील मग त्यांनी काय करायचं?
आमच्या सोसायटी काही जोडपी आहेत ज्यांच्याकडे लहान बाळं आहेत आणि ते बाळ ती दोघे एकट्याने सांभाळतात. मग त्यांनी काय करायचं?
काही जणांकडे वयोवृद्ध आई-वडील असतील ते पण जाऊ शकणार नाहीत खूप तास पार्टीला, ३१ तारखेला, मग?
त्यामुळे प्रत्येकवेळी, प्रत्येकवर्षी, प्रत्येकाला नाही जमलं ३१ ला बाहेरचं जाऊन हुंदडायला तरी देखील वेगळ्या धाटणीतली पार्टी सहज शक्य आहेच. लावा जोर, ठरवा वेगळं काही तरी आणि करा एन्जॉय. बाहेर गेल्यानेच एन्जॉय होतो असे नाहीच मुळी. निराश होण्यासारखं काहीच नाही ह्यात. निराश वगैरे होण्याचे कारण देखील नाही हे. जागे व्हा, आनंदी राहा, तुमच्या पद्धतीने जगा, दोष देत बसू नका दुसऱ्याला, नशिबाला, काय नाही करता आलं त्याला, त्या ऐवजी जे जमलं आहे आज पर्यंत ते बघा, त्याकडे लक्ष द्या, आपलं जग निर्माण करा, तुलना करण्यात वेळ, ऊर्जा, पैसा वाया घालवून संबंध बिघडण्यापेक्षा नवीन काही तरी सतत करत राहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा