सोमवार, २० फेब्रुवारी, २०२३

बाळंतपण

माझी एक सहपाठी आता मोठ्या सुट्टीवर जात आहे. ती पुन्हा एकदा आई होणार आहे. त्यामुळे ६ महिन्याची हक्काची रजा तर आहेच पण त्या शिवाय अजून सुट्टी घेता येण्यासारखी आहे.  अनेक वर्ष एकत्र काम केल्यामुळे, तिच्याशी सातत्याने संपर्क आला आणि मस्त मैत्री झाली आमची. म्हणून असेल कदाचित मला तिचा विचार मनात आला सहज.  पुन्हा एकदा फक्त ह्या मैत्रीणीबद्दल नाही तर बाकी समस्त सख्यांबद्दल देखील सहज आठवलं, किंवा जाणवलं म्हणायला हरकत नाही. जरी त्या मुलीचं आई म्हणून प्रमोशन / पदोनुत्ती होणार असली तरी बरेच दिवस / महिने सरतात ह्या सगळ्या प्रक्रियेत. एवढ्या मोठ्या ६-८ महिन्याच्या कालावधीनंतर काम पुन्हा नव्या जोमाने सगळ्याजणी सुरु करतात आणि हो काही दिवस लागतात पण त्यानंतर रुळतात सहज, अगदी सहज. म्हणजे नावीन्याने आई म्हणून देखील आणि कामावर पण. ६-८ महिने हा कालावधी मोठा आहे, त्यात काही अंशी तरी कामाचे स्वरूप बदलतेंच. 

अगदी तस्सेच आमचे सख्खे शेजारी आहेत.  त्या चौकोनी कुटुंबात काका, काकू, ताई, दादा, वाहिनी होती आता एक गोंडस पिल्लुची भर पडली आहे नुकतीच. त्यामुळे आता आत्यंतिक कोड कौतुकाने अख्ख कुटुंब रंगलंय रंगात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीच. नवीन आई, बाबा, आजी, आजोबा झालेत, त्यांना नक्कीच थोडा वेळ लागणार रुळायला ह्या नवीन मेम्बरच्या नवीन रुटीन मधे, नाही का? पण सगळे अत्यंत उत्साहाने, मनापासून खूप काही करतांना नजरेस पडत आहेत.  आजी असो, आजोबा असो नाहीतर जन्मदात्री आई, ह्या नात्याचा किंवा भूमिकेचा नवीन जन्मच नाही का? हि भूमिका म्हणजे जन्माला आलेलं नवीन गोंडस आव्हान. 

कदाचित अगदी तस्से सेवानिवृत्ती नावाचे आव्हान देखील एक नावीन्यपणाला, नवतेजाला, नवदिशेला, भिन्न उद्देशाला किंवा अजून काही नवीन गोष्टींना जन्म देईल / देत असेलच ना? सेवानिवृत्ती नावाची स्थिती देखील आपल्यासोबत काही तरी नवीन जन्माला घेऊनच येत असेल. त्या बाळाचा संगोपनाचा भार, जबाबदारी संपूर्णतः सेवानिवृत्ती घेणाऱ्याची. अर्थात ज्याने हे नवीन अर्भक जन्माला घातलं आहे तो त्याची संपूर्ण सोय केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीच. त्यामुळे कुठून, कधी, कशी, कुठल्या स्वरूपात, केव्हा दिशा मिळेल, मदत दिली जाईल, सद्बुद्धी अर्पण केली जाईल हे सांगता येत नाही. आपण, जातोय त्या अवस्था, दिशा, मदतनीस, बाळं सगळं म्हणजे सगळं त्याचंच, मग काय, एक दिवस घ्या हातात, आणि द्या झोकून, व्हा पुढे, तो दिशादर्शक आहे कि. कालचा दिवस उत्कृष्ट संपन्न झाला आहे, उद्या काय होणार हे तो बघेल, त्यामुळे आज भन्नाट एन्जॉय करा, सेवेत नाही तर निवृत्त झाल्यावर देखील.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...