देहभान ह्या सदराखाली एक खास लेख इतक्यातच वाचनात आला. त्यात लेखकाने गंभीर नाही पण एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. त्या लेखाचा विषय / शीर्षक बघितल्यावर उत्सुकतेने मी तो वाचायला घेतला आणि अगदी शेवटच्या ओळीपर्यंत माझी ती उत्सुकता कायम होती, कारण माझी नजर काहीतरी वेगळं शोधत होती. ते महत्वाचं असं मला आता वाचायला मिळेल, पुढील परिच्छेदात मिळेल असं वाटलं. अनेक पेहेलू, वैविध्य घटक मांडले आहेत लेखकाने, अतिशय खोलात जाऊन, विचार करून असे. असो. माझे काही विचार आहेत हा लेख वाचल्यानंतर किंबहुना ह्या विषयाबद्दल ते आता मी थोडक्यात येथे मांडते आहे.
"डाय एम्प्टी (Die Empty)" नावाचं एक जगप्रसिद्ध पुस्तक, वाङ्मय, एक साहित्यातला शिरोमणी असलेलं माझ्या वाचनात आलं, मग आम्ही त्यावर चर्चा देखील केली एकत्र. त्या पुस्तकाचा विषय जरी वेगळा असला तरी तो गाभा कायम टिकवून मी भारतीय कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित लिखाण करावं हा प्रकर्षाने विचार करते आहे. मूळ पुस्तकाचा विषय हा प्रत्येकाच्या डोक्यात येणाऱ्या अप्रतिम, सुंदर, नाविन्यपूर्ण कल्पना आणि त्या बद्दलचा उहापोह हा आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार नवीन कल्पनेला मूर्त रूप द्या, चर्चा करा, स्वतःकडे जपून / लपवून ठेवू नका, मोकळेपणाने / उघडपणे सांगा आणि अमलात आणा. सगळ्या अप्रतिम कल्पना उराशी बाळगून, त्याचं जडत्व / ओझं सांभाळत निघून जाऊ नका. मोकळे व्हा.
तसेच प्रत्येकाला जे दुसऱ्यामधे चांगलं दिसतं, आढळतं ते सांगून मोकळे व्हा. भारतीय लोकांची सवय हि आधी हातभार लांब यादी करायची आणि उणेदुणे काढायची आहे. न विचारता लांबलचक यादीच द्यायची काय काय चुकतं ते. खूप क्वचित चांगले उद्गार मुखातून निघतात, पट्टाकिनी.
माझी सर्वांना मनापासून विनंती आहे कि चांगलं बोला, जे आवडलं आहे ते समोरच्याला सांगा, कृतज्ञता व्यक्त करा, गोड बोला, प्रोत्साहन द्या ई. हे मी काही थोडके शब्द किंवा संज्ञा इथे दिल्या आहेत. आणि हे सर्व प्रथम घरच्या, आपल्या माणसांसाठी निश्चित करा, बाहेरच्यांसाठी तर आपण करतोच. आणि मग बघा प्रत्येक नाती कशी फुलतील, बहरतील आणि टिकतील ते. आपल्या माणसाला गृहीत धरून सारखं घालून पाडून बोललात तर कुठलीही कृती हि मनापासून, आवडीने, उत्साहाने घडणार नाही. घरातलं वातावरण पण मग दूषित होऊ शकतं आणि माझ्या दुर्ष्टीने हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेच. प्रत्येकजण अगदी प्रत्येकजण चार चांगल्या शब्दांचा भुकेला असतोच. मध पेरा जिभेवर आणि बघा तरी स्वतःला कित्ती म्हणजे कित्ती भन्नाट वाटतं ते. "अती तेथे माती", हे लक्षात ठेवून उगाचच, धरबंध नसल्यासारखं गोड पेरू नका, मधुमेह होईल नाहीतर. पण उगाचच मोठे आहात म्हणून, अधिकारी आहात म्हणून, किंवा तुमची सवय म्हणून रागावू नका, चुकीचे शब्द बोलू नका, भरमसाठ अपेक्षा ठवू नका, पुढच्यांचा विचार करा आणि बघा तुम्हाला किती समाधान वाटेल ते. तुमचा दृष्टिकोन बदलाचं मंडळी, स्वतःसाठी तरी. ह्या अश्या पद्धतीने एक्सिट घ्या, "डाय एम्प्टी (Die Empty)". नाण्याला दुसरी बाजू असतेच हे लक्षात असू द्या, "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे", फक्त मी काय ते महान बाकीचे नाही हि धारणा चुकून बाळगत असाल तर संबंध बिघडलेच म्हणून समजा. समोरच्याला प्रेम, आपुलकी, काळजी, हवीशी वाटणे होईल ते फक्त मधामुळे. सातत्य महत्वाचं. कोणीही काहीही एकट्याने करूच शकत नाही, आपल्या जवळचा व्यक्ती हि तितक्याच पातळीवर, कणभर जास्त करत असते, ते दिसत असतं पण बोलून दाखवायला जातं नाही सहसा कोणी, आणि मग कुरबुरी सुरु होऊ शकतात, ज्या मग वेगळ्या वळणावर येऊन थांबतात. तो मार्ग निवडण्यापेक्षा मधाळ रस्ता बरा, नाही का? प्रयोग म्हणून तरी करून बघा, बाकी कश्याची गरज भासणार नाहीच. फुकट आहे उपलब्ध फक्त ते जाणून बुजून नक्की वापरा. जिभेवर साखर पेरण्याकरता समोरच्याचा तसा विचार व्हायला हवा सर्वप्रथम.
(With due respect to the writer and his deep thought process, giant experience etc behind this article) बाकी लेखात मांडलेले मुद्दे हे गौण ठरतील जर अँप्रिशिएट करण्याची सवय बाळगली तर. "पेराल ते उगवेल" त्या पद्धतीने, अँप्रिशिएट करा आणि ऍप्रिसिएशन मिळवा, करत राहा मिळवत राहा, कुठलीही इच्छा पूर्ण करणे सोप्प आहे कि नाही?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा