माझ्या बाबांची सरकारी नोकरी आणि त्यामुळे सततच्या बदल्या. ह्या मुळे आम्ही खूप ठिकाणी वास्तव्याला होतो. निवृत्तीच्या आधी बरीच वर्ष म्हणजे अगदी माझ्या शालेय टप्प्याच्या प्रारंभापासून मग नागपुरात राहणं झालं सलग. नागपुरतंच इतकी वर्ष का राहायला मिळालं ह्याच खरं कारण मला आज समजलं, त्या मागचं गमक, त्याची पूर्वतय्यारी, प्लांनिंग म्हणा हवं तर. नागपुरात एक खास पद्धत आहे, पंगतीत किंवा ताट वाढतांना आवर्जून तिखट वाढलं जातं पानात किंवा तिखटाचं तेल. उदाहरणार्थ पालक किंवा मेथीची पातळ भाजी असली कि त्यावर खाते वेळी तिखटाचं तेल घेण्याची पद्धत, किंवा अलिखित नियम म्हणा हवं तर. ह्या मागचं फारच सोप्प कारण किंवा विचार असा कि नागपूर म्हणजे प्रचंड तिखट आणि प्रत्येकाच्या चवीप्रमाणे एक भाजी होणे कठिण. म्हणून सर्वसाधारण चवीची भाजी करायची, किंवा पदार्थ करायचं आणि त्यावर ज्यांना हवं त्यांनी जास्तीच तिखट घ्यायचं, तक्रार करायची नाहीच मुळी कि "किती मिळमिळीत भाजी आहे, तिखटाचा पत्ताच नाही, काही करता येत नाही, किंवा आईने काही शिकवलंच नाही...." ई. नकोच. पानात जर यदाकदाचित वाढायचं राहील तर सर्रास मागून घेतलं जातं तिखट तेथे. मस्त आहेत माणसं.
आता अनेक वर्ष नागपुराबाहेर राहून देखील हि तिखट तेलाची प्रथा माझ्या घरी सुरूच आहे अविरत. पातळ भाजी करायची ठरली किंवा सरते शेवटी गॅस बंद करण्याआधी तिखटाचं तेल केलं जातंच, हाताला, जिभेला ती सवय लागली आहेच कायमची. अहाहा च. आणि त्यात आता मला माझ्या लेकीची पण साथ, मग काय विचारता. एक तिखट पार्टनर माझी, नेहेमीसाठीची.
माझ्या ह्यांना एक तर तिखट नकोच, मसालेदार तर नाहीच नाही आणि टाकलंच तर अगदी चिमूटभर तिखट, प्रत्येक पदार्थात. आणि मी म्हणजे दुसरं टोक, प्रचंड तिखट, ठेचा, वरून तिखट नेहेमीच. काही वर्ष चिडचिड झाली, ह्यांना त्रास झाला, मग दोन वेगळे तिखट असलेले पदार्थ पाळले गेले, वेगळे काढले गेले, कधी कधी मला संपूर्ण विसर पडला कि मी माझ्या विदर्भाची आहे, तिखटावर हात असलेली. अश्या वेगवेगळ्या प्रयोगाअंती आता प्रकाश पडला कि अशी वरून तेलाची, ठेच्याची सवय माझ्या लहानपणीपासून का जडली? माझी जडण घडण नागपुरात का झाली? अगदी नकळत वयापासून? कारण मला, माझ्या हाताला हि वरून घ्यायची सवय असावी, हवं तेवढं, नावापुरतं तिखट, मसाले घालून पदार्थ करता यावे ई. अहाहा च. काय म्हणावं त्याला? कित्ती वर्षापूर्वी त्याची तय्यारी सुरु झाली आणि आपण सगळेच उगाचच म्हणतो "देव कुठे आहे? तो काय करतो?". काय करतो? बघा म्हणावं, काय नाही करत, उगाचच दोष द्यायचा "त्याला" इतकं प्लांनिंग करून, सवयी लावून, विचारपूर्वक कृती करून, सातत्याने कार्यरत राहून केवळ तुमच्या प्रत्येकाकरता. मी तर "त्याच्या" प्रेमात होतेच, पण आज प्रकर्षाने ते प्रेम कित्तीतरी प्रमाणात वाढलं. आणि फक्त हेच नाही, अजून बऱ्याच अश्या गोष्टी आता स्फटिकासामान स्पष्ट व्हायला लागल्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा