बुधवार, १७ मे, २०२३

नाकापेक्षा मोती जड - २

माझ्या सगळ्या शिक्षकांना / गुरुजनांना मला धावत पळत जाऊन भेटावसं वाटतंय, मुख्यत्वे मराठीच्या. मागे लिहिल्या प्रमाणे आम्हाला "वाक्यात उपयोग करा" असा एक आव्हानात्मक प्रश्न असायचा. म्हणी देत असतं आणि त्यांचा वाक्यात प्रयोग करायचा, किंबहुना त्यांचा वापर करायचा. तेव्हा प्रचंड अवघड होतं ते, कारण एखादा अर्थ माहिती असायचा, जो गुरुजनांनी सांगितला आहे किंवा कानावर पडला आहे, बास, त्यापुढे काहीही नाहीच. 

गुरुजनांनी पुस्तकाबाहेर जाऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातले किस्से सांगून आम्हाला अधिक सक्षम करायला हवं होतं. त्यांच्याकडे ढिगाने अनुभव असणार. मग जर त्या गोष्टी सांगितल्या असत्या, कथन केल्या असत्या तर पाठांतर कमी करावं लागलं असतं आणि मस्त प्रयोग / वाक्य झाले असते तय्यार. खैर. आजचा माझा अनुभव ऐकवते. 

मी सकाळचे कोवळे ऊन खायला आणि हवेतला गारवा अनुभवायला सोसायटित खाली जाऊन चक्कर मारून बसले, बराच वेळ, सुट्टीचा सदुपयोग अजून काय. आणि हि मागल्या २-३ दिवसांपासूनची रोजनिशी बरं का. असंख्य गाड्या डोळ्यासमोरून आल्या गेल्या. माझ्या चार डोळ्यांनी काही तरी खास टिपलंच तेवढ्यात. आताशा सगळ्या रणरागिणी कामाला येणाऱ्या मावश्या देखील भल्या मोठ्या गाड्यांवर विराजमान, कानात गाणी आणि मस्ती मस्त. त्या नंतर चा भाला मोठा ताफा म्हणजे स्विगी, बिग बास्केट आणि इतर कंपन्यांचे प्रतिनिधी. ह्या शिवाय अजून बरेच वाहनचालक. सगळ्यांमध्ये एक साम्यता आढळली. अवजड गाड्या आणि त्यावर विराजमान झालेले छोटेसे, बारके, वजनाने अगदी कमी असेच सगळे. का? आपल्या शरीरयष्टी नुसार पण गाड्या मिळतात हो, छोट्या आकाराच्या, कमी वजनाच्या, मग इतक्या न सांभाळता येणाऱ्या का घ्यायच्या? पाठीचं काय होईल काही वर्षांनी? थोडा तरी विचार, सद्सद विवेक नको का? माझाच रक्तदाब वाढला न कळत. एका प्रसिद्ध चित्रपटात घोड्यावर गधा काढलेला दाखवला आहे, तसं काहीस भासलं मला, अतिशयोक्ती नाही पण "हत्तीवर उंदीर जसा", "नाका पेक्षा नक्कीच मोती जड", काही दुमत नाहीच. 

बघा आता, अगदी सहज डोळ्यासमोर आलेले असे प्रसंग सांगत शिकवलं तर कित्ती भन्नाट लक्षात राहील नाही. बघता बघता माझे एक वाक्य नाही तर अख्खा ब्लॉग लिहून झाला.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...