श्री विष्णूंची मूर्तिमंत ऊर्जा, देवीचा अवतार, शक्तीचे प्रतीक असे अनेक अर्थ आणि वैशिष्ट्ये असलेली माझी एक खास तरुण मैत्रीण आहे. गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम तर करतो आहेच पण भेटतो देखील एकमेकींना वैविध्य कारणास्तव. माझी तिची ओळख माझ्या महाविद्यालयाच्या संचालकांनी करून दिली, म्हणजे डायरेक्टर सरांनी तिच्या धडाडीची एक गोष्ट कथन केली आणि तशी ओळख झाली. ह्याच मैत्रिणीची लेक अगदी पिल्लू होती त्यावेळी तिने पिल्लू आणि आजीला वसतीगृहात दिवसभर राहायची परवानगी मागितली होती, त्यावरून हे माझ्या नागपूरचं व्यक्तिमत्व भन्नाट आहे, वेगळं रसायन आहे हे लक्षात आलं होतं आणि तीच ऊर्जा, कणभर जास्तच पण कमी नाही, अशी आज तागायत दर्शनीय आहे, हे कौतुक. "नावात काय आहे?" असे दिग्गज म्हणतात, म्हणून गेलेत, पण माझ्या दृष्टीने तर नावातच सगळं काही आहे हे निश्चित आणि ह्या मैत्रिणीच्या नावासारखीच हि आहे ह्यात शंकाच नाही.
हे आमच्या कचेरीत येणारं पिल्लू मोठं झालं, नेहेमीची नोकरी आणि संलग्न कामे अत्यंत उत्साहाने पार पाडली, दुसरं पिल्लू देखील आलं, घरचं - दारचं अत्यंत शिताफीने सांभाळ गेलं, विद्यावाचस्पती पर्यंत हसत खेळत प्रवास झाला, भाऊजींची लाडकी वाहिनी हा सन्मान पटकावला, अनेक धनुष्य ताकदीने पेलले मग ते पहिल्या वर्षीच्या मुलांचे इंडक्शन असो, नाहीतर सांस्कृतिक वार्षिक कार्यक्रम नाही तर शेवटच्या वर्षाच्या मुलांचा निरोप समारंभ, अहाहा च, अगदी निःशब्द करून टाकले प्रत्येक वेळी, स्मितहास्य आणि पोटभर आनंद उपभोगत पेरलेलं नेहेमीच.
सगळ्या स्तरावर अगदी अग्रगण्य, माणसं सांभाळणं, ट्रेंडी राहणं, उत्कृष्ट गाडी चालवणं, भन्नाट चविष्ट पदार्थ, नवीनतम गाण्यांची माहिती असणं, ती ऐकवणं, प्रत्येक विद्यार्थ्यांशी मैत्रीने वागणं / बोलणं, प्रत्येकाकडून स्मार्टली कामे करून घेणं ई. आणि बरेच काही, यादी लांबलचक आहे. तर अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अशी हि आमची वैष्णवी, ऊर्जेचं दुसरं नाव, उत्साहाचा सळसळता झराच जणू, प्रत्येकासाठी फार महत्वाची अशी ऍसेट.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा