माझ्या लहानपणी गवळी दूध देऊन जायचा, रतीब लावलेला असायचा. बहुतांशी तरी पिढ्यानं पिढ्या चालत आलेला असा. त्या नंतर आल्या काचेच्या बाटल्या. पण त्यामुळे दररोज बहुतांशी दोनदा दूध तापवावं लागायचं. फ्रिज पण नव्हते. त्यामुळे इतकं दूध घेतलं जायचं कि थोडंसं दुसऱ्या दिवशी उरेल. मग त्याचं दही लाव, तर पट्टाकिनी बासुंदी कर तर कलाकंद ई. मज्जा यायची. पण जर दूध कमी पडलं किंवा फाटलं आणि कालच्या दुधाचा चहा करावा लागला तर त्यावर तुपाचे तवंग नाही पण तसे बारीक सारीक अवशेष उमटायचे आणि चवीत फरक पडायचा तो वेगळाच. म्हणजे नक्की कळायचं कि हा कालच्या दुधाचा चहा आहे. अर्थात खूप कमी आम्हा लहान मुलांना चहा प्यायला मिळायचा पण त्यात असं काही झालं कि समजायचं नक्की. आज खूप म्हणजे खूप वर्षांनी पुन्हा एकदा तशी लज्जत चाखायला मिळाली. गेली अनेक दशकं फुटलेलं दूध कानावर पडलं नाही, आता दोनदा काय एकदा सुद्धा दूध तापवावं लागत नाही, त्यामुळे असा चहा दुर्मिळ झाला होता. आज काय चमत्कार झाला आणि माझ्या तो पुढ्यात ठाकला, चाखायला मिळाला कोणास ठाऊक, पण प्रचंड मज्जा आली हे नक्की. माझ्या आईच्या घरची एक चक्कर मारता आली मला, तिचं ते ठराविक चहाचं भांड उभं ठाकलं नजरेसमोर, ते गाळण, सांडशी आणि गरमागरम ताज्या गप्पा, अहाहा च. ज्यांनी आज आमच्या कचेरीत चहा तय्यार केला होता पेशल त्याला मनापासून धन्यवाद. आभार आणि अधे मधे अशी उजळणी व्हावी अशी इच्छा. अचानक असं काही घडलं कि भन्नाट वाटतं नाही.
मसाला चहा, विलायची युक्त असा, गवती चहा, आले घातलेला फक्कड असा, ई. पुढे ह्या तूप मिश्रित चहा ची खासियत निराळीच. जगावेगळी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा