गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

पाठिराखा

हा शब्द आणि त्याचा शब्दप्रयोग मी अगदी शाळेत असतांना शिकले होते. तेव्हा आमच्या मराठीच्या शिक्षिकेने सांगितलेला अर्थ म्हणजे देव. तो जो आपली सर्वांची सातत्याने रक्षण करतो. प्रेत्येकाचा लेखा जोखा त्याच्या कडे असतो आणि तो बारकाईने लक्ष ठेवतो, पाठराखण करतो. आणि हे त्रिवार सत्य आहेच. ह्याचा अनुभव मला इतकी वर्ष सलग आला आहे. पण ह्या पल्याड जाऊन अजून एक पण ह्या शब्दाचा अर्थ असू शकतो किंबहुना ह्या नवीन जमान्यात तो जन्माला येऊ शकतो हे मला ठाऊक नव्हतं. पण मला तो उमगला. "त्याची" तुलना तर कोणाशीच होऊ शकत नाही. त्याच्या ऐवजी पण कोणी नाहीच. फक्त ह्या मराठी शब्दाचा अजून एक जाणवलेला अर्थ / उपयोग आहे. एवढंच. 


पुणे हे दुचाकीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं हे म्हणणं सपशेल चुकीचं ठरेल. पुणे हे दुचाकींचे शहर आहे. आताशा काय गेली ५-१० वर्षे जेथे बघावं तेथे सगळे दुचाकी स्वार. पहाट म्हणू नका, दिवस, दुपार, संध्याकाळ आणि हो शनिवार रविवार तर उधाण येतं ह्या सर्वांना. अगदी लहान वयातील, ते मध्यम आणि जेष्ठ देखील. काही दशकांपूर्वी चाकरमाने मजल दरमजल करत कसे तरी कचेरी गाठायचे ह्या दुचाकींवर. आणि आता हजार ते लाख ह्या अश्या किमती आहेत. असो. तर अश्या ह्या भव्य दिव्य, "विनाकारण राजकारण" सायकली चालवायच्या म्हणजे त्याच्या किमतीला शोभेल असे गणवेश, खास कपडे, भारी कपडे आलेच. अर्थात हे असे कपडे अत्यावश्यक हो. बरीच कारणे आहेत त्या मागची. एक म्हणजे कल, शैली अक्का स्टाईल ई. अहो म्हणजे ते तसे कपडे घातलेच पाहिजेत. असो. त्या सदऱ्याला एक खिशा असतो, मोठ्ठा, आडवा आणि त्या खिश्याच तोंड उघडं नसतं. इलास्टिक / स्थितिस्थापक लावलं असतं. तो खिशा खास विचारपूर्वक तय्यार केलेला असतो.  म्हणजे मग त्यात माणसाचा सर्वात महत्वाचा एक अवयव ठेवण्यात येतो. मोबाईल ला व्यवस्थित पहुडता यावं म्हणून राखीव जागा असते ते.  तो आहे ह्याची सतत जाणीव व्हावी म्हणून तो अगदी पाठीला चिकटून स्थापित केला जातो. दुचाकी चालवतांना होणारे अपार कष्ट जे सुदृढता राखण्यास मदत करतात  ते क्षणोक्षणी टिपण्याचे काम हा अवयव करत असतो. त्या दिवशी ठरवलेलं किंवा कुणी निष्णात माणसाने सांगितल्या प्रमाणे लक्ष गाठलं रे गाठलं, दुचाकी वरून उतरल्या उतरल्या आधी दर्शन ह्या अवयवाचे. कदाचित त्याला घाई झाली असते हो शाबासकी द्यायची आणि दुचाकी स्वाराला ती घ्यायची.  आणि मग तेथेच सर्वत्र पसरावयाचं कि आजची घौड दौड. 


तर असा हा पाठिराखा. सदोदित सोबत असणारा असा. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे नोंद ठेवणारा. स्वतःला माहिती नाही इतकी जास्त माहिती नमूद केलेला, करत राहणारा, आतली बाहेरची सगळी कडची. आहे कि नाही गम्मत आणि नवीन अर्थ शब्दाचा. पाय व्यग्र दुचाकी चालवण्यात, हात ती रस्त्यावर नीट उभी ठेवण्यात व्यस्त, घामासाठी आणि स्टाईल म्हणून बाकी ठिकाणी ठेवता येणं अशक्य म्हणून मग ती पाठीची जागा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...