बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

स्वभाव

आज सकाळी माझं आणि माझ्या मावशीचं झालेलं संभाषण मला एक लिहायला कारण देऊन गेलं. त्यांनी डाळीचा कुकर लावला, नेहेमी प्रमाणे शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला, उघडून बघतात तर काय डाळ शिजली नव्हतीच. झालं आधीच आमच्या मावशींना सतत म्हणजे सतत स्वतःशी बडबडण्याची सवय आहे त्यात आता हे कारण मिळालं. त्यांचं पुढचं काम हे समीकरण असतं. मग काय बिच्चारी डाळ, तो गलितगात्र कुकर, गॅस, पाणी, आणि सगळ्या म्हणजे सगळ्यांना लाखोली मिळणार होती, पण माझी तेव्हा नेमकी स्वयंपाक घरात उपस्थिती होती, ती त्यांना जाणवली आणि त्या कश्या तरी नाईलाजाने गप्प राहिल्या. मग त्यावर मी त्यांना म्हटलं, डाळीचा पण एक स्वभाव असतो. तुम्हाला आता ठाऊक आहे कि हि डाळ शिजत नाही, मग तुम्ही काय जास्तीचे प्रयत्न करत आहात? मला तर काहीच दिसत नाही. व्यवस्थित हिंग हळद घाला, थोडसं तेल मीठ घाला, गरम पाणी घाला थंड च्या ऐवजी, गरम पाण्यात तुम्ही आलात कि ५-१० मिनिटे भिजवून ठेवा, त्या डाळीशी धुतांना संवाद साधा आणि तिला सांगा नीट शीज म्हणून, एवढं आलटून पालटून करा आणि बघा ती कशी शिजत नाही ते. गेले ते दिवस जेव्हा फक्त एक वाण्याकडून वर्षानुवर्षे सामान आणलं जायचं. त्यामुळे त्या वाण्याकडच्या डाळीचा स्वभाव माहित झालेला असायचा. आता तसं नाहीच. वैविध्य प्रकारच्या डाळी येतात. एका पुड्यात एकाच शेतकऱ्याची, एकाच शेतात उगवलेली डाळ असेल असं नाहीच. विविध डाळी वैविध्य ठिकाणांहून एकत्र केलेल्या असण्याची दाट शक्यता आहे, कारण सरते शेवटी हा धंदा आहे. 

ह्या पिटुकल्या संवादावरून मग मला अनेक जणांचे स्वभाव आठवले, सगळे सजीव बरं का, पण काहींना दोन पाय, काही चार पायांचे तर काही बिना पायाचे देखील (हि डाळ, सजीवच नाही का? पेरलं कि नवीन डाळ जन्माला येतेच). दिवसागणिक देखील स्वभाव बदलण्याची उदाहरणे देता येतील सहज. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्थात फक्त माझ्या दृष्टीने हो, हवा तो परिणाम साधण्यासाठी आधी स्वभाव जुळावे लागतात. का माहित नाही, पण आज तागायत जेव्हा जेव्हा मी कुकर लावला तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाळ व्यवस्थित शिजली आहेच. तीच डाळ तोच कुकर तेच स्वयंपाक घर आणि तोच गॅस, पण फरक आहे. गम्मत आहे नाही सगळी स्वभावाची. 

आत्ता पर्यंत असंख्य आधुनिक गुरूंना ऐकलं आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात. ते त्यांच्या अगाध ज्ञानाने, प्रचंड अनुभवानुसार फक्त दोन पायांच्या च स्वभावाबद्दल सूतवाच्य करतात, बाकी सजीव जे आपल्या अवतीभोवती असतात त्यांचं काय? ते पण बोला कि मंडळी कधी. सगळं सुकर होईल.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...