आताशा कोजागिरी वर्षातून दोनदा येते का? आणि असेल तर ती आज आहे का? माझी संपूर्ण सोसायटी एक अप्रतिम सुगंधाने सजली, नटली आहे असा मला अनुभव येतो आहे. चार काय आठ दिशेतून घमघमाट सुटलाय नुसता ताज दूध उकळण्याचा किंवा आटवण्याचा. अहाहा च. "काय वर्णू तव गूण ..." अगदी असं झालंय मला.
हे का झालंय हे देखील सांगते. ह्या मागल्या न्यू नॉर्मल दिवसांमधे आम्ही अमूलचे टेट्रा पॅक दूध आणायला सुरवात केली. त्यावेळची परिस्थिती बघता तेच आम्हाला योग्य वाटलं आणि त्यानंतर तेच सुरु राहिलं. दररोजचे दूध घेणं, ते उकळणं, मग अधेमधे दूधवाला न येणं, कधीतरी ते फाटणं असे सगळे अनुभव येणं
पण थांबलं. त्यामुळे असेल कदाचित ह्या साध्या दुधाच्या सुगंधाने आज प्रसन्न व्हायला झालं मला, नकळत, अचानक. आणि अचानक झाल्यामुळे अजूनच नाविन्य जाणवलं, किंवा काहीतरी दृष्टिआड झाल्याची जाणीव झाली.
हा हवाहवासा दुधाचा सुगंध कुठल्याही पठडीत बसवता येत नाही, जसे कि फुलांचा सुगंध, मातीचा, स्वयंपाकाचा, कृतूमानाप्रमाणे येणारा मोहोराचा ई. हा एकटाच आहे त्याच्या ग्रुप मधे. त्यामुळे अजूनच भावाला मला आज.
सगळ्या घरी जेथे जेथे आत्ता दहाच्या सुमारास दूध तापवण्याचा सोहोळा पार पडला त्या समस्त मंडळींना शतशः धन्यवाद. माझा दिवस अप्रतिम केल्या बद्दल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा