श्री. विष्णु सहस्त्रनाम ह्या स्तोत्रातील एकसष्ठाव्या क्रमांकाचा श्लोक आहे, त्यात सुधन्वा हे नाव नमूद केले आहे. माझ्या कडून दररोज नित्यनेमाने हे स्तोत्र म्हणून घेतलं जातं आणि दर एकादशीला देखील सामुहिक पठण होतं. तेव्हाच फक्त हे नाव मुखात येतं किंवा घेतलं गेलं म्हणा. पण एवढ्यातच एका सोशल मिडिया वर मी हे नाव बघितलं, कसं कुणास ठाऊक पण माझी नजर गेली आणि ते दृष्टीस पडलं. इतकं आश्चर्य वाटलं कारण मी कुठल्याही मुलाचं नाव आज पर्यंत नव्हतं ऐकलं कारण अवघड असे आहे आणि त्याचा अर्थ पण कठिण आहे, खास करून लहानपणी उच्चारायला. त्यात बाहेर देशात गेलं तर अजूनच कठिण. आपल्याकडे देवांची नावं मुलांना ठेवायची पद्धत फार जुनी आहे पण हे माझ्यासाठी नावीन्यपूर्ण होतं आणि ते मी त्यांना ताबडतोब कळवलं देखील.
जेव्हा त्यांचा dp बघितला उत्सुकता म्हणून, कारण सोशल मिडिया वर आहेत, लिहीत आहेत, आणि मोठ्या पदावर काम करत आहेत म्हणजे साधारण ५०+ च्या आसपास असणार असा माझा अंदाज खरा ठरला. मला फारच आवडलं हे नाव त्यामुळे मग मी अनुकथा लिहिण्याआधी गूगल विद्यापीठाला नक्की विचारपूस करते तर काय अहो आश्चर्यम्. मी आपली बघेच आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आहे हो हे नाव, अभियंता आहे, वित्त, मिडिया, लेखक, CA आणि बरेच असे. मी हबकलेच बघून. माझं एक छोटेखानी केलेलं संशोधन असं आहे कि नावावरून आणि त्यामुळे न्यूमरॉलॉजी मुळे पण सांगतां येणं शक्य होतं कि कोणासाठी कुठले क्षेत्र योग्य आहे. पण ह्या नावाने तर माझी विकेटच काढली. सरते शेवटी हे श्री. विष्णूंचे नाव आहे, प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करणारंच आणि ते देखील उत्कृष्टरीत्याच. त्या हून मोठं आश्चर्य म्हणजे ह्या विख्यात व्यक्तीचे संपूर्ण नाव "सुधन्वा कुलकर्णी" असे आहे आणि ह्याच नाव-आडनावाची पण असंख्य मुलं आढळली मला ऑनलाईन. माझ्या चार डोळ्यांनी जेव्हा व्यवस्थित निरखून बघितलं तर सगळी वेगळी मंडळी आहेत. कमाल आहे. एका नावाची इतकी माणसं
आणि ती देखील प्रसिद्ध. तिरंदाज, चौकटी बाहेरचा विचार करणारा, तत्ववेत्ता, विचारवंत, द्रष्टा आणि बरेच अर्थ आहेत ह्या नावाचे. ज्यांनी कोणी हे नाव इतक्या सगळ्या मुलांची ठेवली आहेत त्या सर्वांना दंडवत. नावासारखीच प्रगती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा