मी हि म्हण, अर्थात श्री संत तुकाराम महाराजांची प्रसिद्ध ओळ अनेकदा ऐकली आहे. बऱ्याच जणांनी ती वापरतांना देखील बघितली आहे, किंबहुना प्रत्येक मोठ्या व्यक्तीला हे मनापासून वाटत असतंच कि पुन्हा पट्टाकिनी लहान व्हावं. किंवा पालकांना देखील असंच नेहेमी वाटतं कि आपली मुलं लहानचं आहेत, राहावेत, व्हावेत. लहानपण म्हणजे काय बोलायचं, माझे शब्द अपुरे पडतात. ते बिनधास्त दिवस, पूर्णपणे पळापळ, खेळ, यथेच्छ खाणं, लोळणं, मस्ती, मित्र मैत्रिणी, प्रेमळ शिक्षक, शाळेचा डब्बा, आणि हि यादी फार म्हणजे फारच मोठी आहे. कधीही न संपणारी अशी, भलीमोठी. कशाची म्हणजे कशाची चिंता नाहीच. सगळं कसं मोकळं, हलकं, फारच भारी.
माझं बालपण तर मला आठवण अशक्यच, पण माझ्या मुलांचं लहानपण मी जगण्याचा प्रयन्त केला. ते बोबडे बोल, हालत डुलत धडपडत चालण्याचा अथक प्रयन्त, तोल जाणं, खात्री नसणं, हळुवार चाल, दुसऱ्यांनी दिलेले कपडे, दुसऱ्याची मदत घेत शिकणे, जीभ, मान ई. ची गडबड आणि असेच बरेच काही. त्यावेळी मात्र ते बाळबोध वाटत, कौतुक होतं सर्वत्र. ते तोतडे बोल कोणालाच उमगत नसतात पण तरी देखील त्या बाळाला अगदी कुठे ठेऊ आणि कुठे नाही असं होतं त्या घरातल्यांना. तोंड दुखेस्तोवर कौतुकांचा वर्षाव सदोदित. दररोजची एक नवी गोष्ट, नव्या घडामोडी. अगदी विचारायची सोयचं नाही. लहानपण फार कमी काळ टिकतं त्यामुळे असेल कदाचित. मोठी झाली हिच मुले कि मग शिंग फुटतात आणि हाती लागत नाहीत ते वेगळंच. खूप कमी मुलं माणूसघाणी असतात, ठराविक लोकांकडेच जातात, बघून हसतात, बोलतात, विविध कृती करून दाखवतात ई. बहुतांशी सगळेच फार मोकळे असतात. प्रत्येकाशी बोलतात, प्रयन्त करतात, माणसांमधे रमतात, बडबडतात वगैरे.
माझ्या सोसायटीत बरेचसे जेष्ठ वरिष्ठ वास्तव्याला आहेत. काही जण तर व्यवस्थित त्यांची स्वतः रोजनिशी पाळतात, पाळू शकतात. पण काही जण गाडी गाडी करतांना दिसतात, म्हणजे व्हीलचेअर किंवा चाकांची खुर्ची वापरतांना आढळतात. एक काळजीवाहू, निरीक्षण करणारा व्यक्ती असतो त्यांच्या सोबत, मुलगा अथवा मुलगी. आमची सोसायटी भली मोठी असल्यामुळे सकाळी ऊन खाणं, स्वच्छ शुद्ध हवा अनुभवणं, येणं - जाणं बघत आनंदी होणं हे सगळं सहज करता येतं आणि इमारतीच्या मागल्या बाजूला जेथे कमी रहदारी असते तेथे पाय मोकळे देखील करता येतात. बऱ्याचदा सगळेच जेष्ठ चपला न घालता फिरणं, काही पाऊलं चालणं पसंद करतात. कोणी हातात आधाराला काठी घेतात, काही तसेच चालणं पसंद करतात. माझ्या खिडकीतून मला आता भरपूर वेळ असल्यामुळे किंवा मी सकाळी बाहेर चक्कर मारत असतांना दृष्टीपथात पडतं. आणि पुन्हा एकदा श्री संत तुकाराम महाराजांची ती ओळ आठवतेच. "लहानपण देगा देवा". आपण मनात मागतो, तो देतो, निसर्गनियमांनुसार वय वाढतं पण लहानपण पुन्हा अनुभवता येतच, वेगळ्या धाटणीतलं, अर्थातच. तेच डोलणं, तशीच ती मान, चालतांना डगमगणं, चाकांच्या खुर्चीवर बसतांना तोल जाणं, खुर्ची नक्की कुठे आहे हि खात्री पट्टाकिनी न पटणं, ते बोल आणि बरेच काही. आई गं. एक छोटासा बदल मात्र आहे. प्रत्येक कुटुंबातून ह्या बोबड्या बोलांचं, डगमगण्याचं कौतुक होतंच असं नाही. आधी पांगुळगाडा आणि आता काठी चा आधार. एक वर्तुळ इथेच पूर्ण होतं. काय नियम आहे ना ह्या निसर्गाचा. असो. प्रत्येकालाच ह्यातून जावंच लागणार आहे. मग ह्या दुसऱ्या लहान टप्प्याचा अत्यानंद घेऊया. जमेल तेवढं ह्या विकसीत टप्प्याचा पण उपभोग घेऊयात, सांभाळून, जेवढं जमेल तेवढं. मस्त आणि स्वस्थ राहून. वेळेवर दररोज रोजनिशी पाळून, म्हणजे सगळं मिळवलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा