सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

अतिथी देवो भव


मध्यम वर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात, बहुतांशी सगळ्यांकडेच पूजा अर्चा, नित्यनेमाने पोथी वाचन, स्तोत्र पठण, व्रत वैकले, उपवास ई. अगदी दररोजच्या रोजनिशीत आहेतच. खूप जण अनुग्रह घेतात, गुरु करतात, त्यामुळे त्यांची ठरवलेली साधना होणे अत्यावश्यक असते. आजी, आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी ई. सगळेच तन्मयतेने सगळं करतात. एवढ्यातच मी गावी गेले होते, माझ्या माहेरच्या ठिकाणी, आणि एका खास मैत्रिणीकडे उतरले होते. "त्याच्या" कृपेने तिचं घर अगदी भरलेलं आणि बहरलेलं असं आहे, गेली २६ वर्षे, एक नाही दोन नाही. आपली माणसं सभोवताली, अगदी उत्साहाने सगळे सामील होऊन दिनचर्या करणारे असे. काकू, तिच्या सासूबाई, म्हणजे माझी अजून एक लाभलेली खास मैत्रीण देखील अगदी प्रेमाने पूजाविधी ध्यानमग्न होऊन शास्त्रोक्त पद्धतीने, विधिपूर्वक करते. ज्या दिवशी मी पोचले त्या दिवशी गप्पांच्या नादात त्यांचं काही तरी वाचन राहून गेलं असं त्या म्हणाल्या. आम्हा दोघींना वाईट वाटलंच त्याचं.

 

आपल्या संस्कृतीत पाहुण्याला प्रचंड उच्च स्थान आहे. बरोबर ना? ह्यावरून मी सहज बोलून गेले काकूंना कि "अतिथी देवो भव". आज माझ्याशी मनापासून वैविध्य विषयांवर बोलण्यात वेळ गेल्यामुळे वाचन जरी राहून गेलं असलं तरी ते पोचलं त्याला. कदाचित हेच वाचन होणं असेल आज. आमचे विषय देखील पूर्णपणे आध्यात्मिक नसले तरी त्यावर आधारित होते, अगदी श्री राम आरती, अयोध्या, रामदास स्वामी, आधुनिक संतांची शिकवण, हार, फुले, प्रसाद, वाचन, लिखाण, जुन्याचे नवीन मॅपिंग, नवी पिढी, सवयी असे असंख्य होते. म्हटलं झाली तुमची पूजा / वाचन आजचं. असं देखील बघता येईल ना ह्या म्हणीला कधी तरी जर लागलंच तर, चुकीचे काहीच नाही त्यात. मी कधी रोज जाणार त्यांच्याकडे राहायला. किंवा असं जर कधी झालंच तर दृष्टिकोन बदला म्हणजे अपराधी वाटत नाही, किंवा उगाच मनस्ताप होतं नाही. अतिथीला म्हणजे मला अगदी माहेरपणापेक्षा जास्त काळजी घेतली गेली, खाऊ पिऊ घातलं गेलं, मस्त चक्कर झाली, देवदर्शन झालं, अगदी मला जे जे आवडतं ते ते आठवणीने भरपूर केलं. हे सगळं "त्याच्या" चरणाशी रुजू झालं, त्याची नोंद झाली. मग ह्याच अश्या खास अतिथीशी बोलतांना वाचन राहून गेलं असं म्हणण्यापेक्षा त्या दिवशी संभाषण, वैचारिक देवाण घेवाण झाली जी रोजच्या वाचनामुळे, सातत्यामुळे संभव झाली, नाही का? "असे पाहुणे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". 

२ टिप्पण्या:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...