रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

युगानुयुगे


काही दिवसांपूर्वी पंगतीच्या जेवणाचं महत्व नमूद करणारा ब्लॉग लिहिला गेला होता माझ्या हातून. त्यात मुखत्वे मी भावी जोडीदाराची निवड करण्याचा तो चपराख मार्ग आहे असं लिहिलं होतं.


पंगत जेव्हा अस्तित्वात होती किंवा सर्रास आधी घरच्या कर्त्या पुरुषांनी जेवायला बसायचं असा अलिखित नियम होता. मग अंगत-पंगत घरच्या अन्नपूर्णेची आणि इतर मुलींची व्हायची. घराच्या आत हात धुवायची सोय असो नाहीतर बाहेर, किंवा पाऊस पाणी असेल तेव्हा, आधुनिक घरात काय आजकाल बऱ्याच घरात अगदी सोप्पं जावं म्हणून दोन पाउलांवर लगेच बेसिन मांडलं असतंच. त्यामुळे तेथेच हात आणि मनोभावे स्वच्छता म्हणून तोंड देखील धुतलं जातं. हि मध्यम वर्गीय पुरुषांना, मुलांना लागलेली सवय, कदाचित लावलेली किंवा निरीक्षणातून शिकलेली म्हणावं. आता थोडासा, अगदी यत्किंचित बदल झालेला आढळतो. मुलं मुली समान, सर्वार्थाने सारखे हक्क, सगळेच घराबाहेर कामानिमित्य ई. मुळे सगळेच एकत्र जेवायला बसतात. अर्थात मागे पुढेच. आधी पुरुषांना वाढलं जातं, मग कदाचित मुलांना आणि मग मुली / घरच्या अन्नपूर्णा. अन्नपूर्णेचे लक्ष सर्वत्र. कोणाला काय हवं नको ते बघत, थोडेसे सावकाश, कारण उरलेले संपवायला, भांडी ताबडतोब घासायला टाकायला मोकळे म्हणून, आणि अश्या अनेक कारणांनी त्यांचे जेवण संपायला अवधी होतो. पुरुष मंडळी पट्टाकिनी खाऊन हात धुवायला मोकळे आणि ते देखील मोकळे पणाने. स्वतःचे यथेच्छ जेवण झालं म्हणजे झालं. बाकी कुठल्याही खिजगणतीत नाहीतच. बरं कितीही देश विदेशी जा, अंतर्देशीय शाळेत शिका, भल्या मोठ्या हुद्द्यावर काम करा, चांगल्या सवयी अंगीकारणे लक्षात येतंच नाही. बाकी सर्व समाजात, वेळे आधी चार गोष्टी सुनावल्या जातात ह्या २०२४ मध्ये देखील. पण अत्यावश्यक असे, आपल्याच घरच्या लोकांचा प्रत्येक वेळी आदर, मान, त्यांचं अस्तित्व काही म्हणजे काही नाहीच. घरात अनेक ठिकाणी हात + तोंड धुवायची सोय असतांना, दार लावून घेण्याची तसदी, चार पाऊल चालून जाण्याचे कष्ट हे सुधृढ लोक जे अती शिकलेले आणि अती अनुभवी समजतात, मिरवतात आणि दर्शवतात देखील. कुठे जातो ह्यांचा शहाणपणा कोणास ठाऊक. हे साधं सांगायची काही गरज पडावी म्हणजे अहो आश्चर्यम. बरं ह्यांच्या सोबत बसलं नाही तर चालत नाही, त्यावरून सुरु होतं, त्यांच्या नंतर बसावं तर अन्न थंड होतं, उशीर होतो. आधी जेवलं तर शिष्ठपणा (त्यात घरी सासू सासरे असतील तर) आणि खूप बारीक सारीक उरतं. सगळ्याच बाजूने गोची करून ठेवली आहे मुलींची. असो. 


पंगतीत असलेला एक नियम लावणं आता फारच आवश्यक झालाय. सर्वांनी एकत्र वाढल्यावरच सुरु करायचं आणि सर्वांचं झाल्याशिवाय उठायचं नाही, मग काहीही झालं तरी. ह्या नियमामुळे मुली व्यवस्थित जेवतील तरी. 


काही घरात म्हणतात कि रात्रीचे जेवण तरी सर्वांनी एकत्र करावे. मग ते अन्न उपभोगू द्या ना सर्वांनाच. बसा जरा त्यांच्या सोबत. त्यांना वाढा, आग्रह करा, गप्पा मारा, किस्से ऐकवा. आताशा सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत आपण, मग जेवल्या जेवल्या च हात धुवायचे हे पण थोडेसे बाजूला सारा. जेवा आणि जेवू द्या.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...