गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

१९६३: एकमेका साह्य करू


आताशा बाजारात इतके विविध प्रकार मिळतात, त्याच्या दूरदर्शन वर जाहिराती बघायला मिळतात, बरेचसे शेफ देखील त्यांच्या व्हिडिओ मध्ये अनेक जिन्नस ठणकावून सांगतात कि ते चांगलेच आहेत. किंवा मोठ्या मॉल मधे गेल्यावर, बऱ्याचश्या ऑनलाईन किंवा दुकानात विविध प्रकार, वेगवेगळ्या किमतींना मिळतांना बघून ते जिन्नस विकत घेणं होतंच. मी देखील अश्या तूरडाळीच्या जाहिराती बघितल्या, पॉलिश केलेल्या, न केलेल्या, आणि इतर अनेक कंपन्यांनी बाजारात आणलेल्या बघून मस्त वाटलं. काही विकत घेतल्या अगदी कमीत कमी वजनाच्या. घरी येऊन बघतो तर काय शिजायला बऱ्याच त्रास दिला त्या डाळींनी.  


नेहेमी प्रमाणे गरम पाणी वापरून बघितले, तेल मीठ घालून पहिले, भिजवून ठेवले काही वेळ, बऱ्याच शिट्ट्या करून बघितल्या, उंच भांडे वापरले म्हणजे डाळींना जरा जास्त जागा मिळेल फुलायला, पण छे. सगळे मुसळ केरात, सगळे प्रयत्न पूर्णपणे वाया गेले. मग जरा म्हटलं अजून वेगळ्या पद्धतीने डोकं चालवूया.  शाळेची आठवण झाली "प्रयोगातून विज्ञान" नावाचा विषय आठवला, आणि मग काय कंबर कसलीच. 


प्रयोग १: भरडा 

प्रयोग २: मिश्र डाळ 


त्या डाळींची काय हिम्मत कि त्या शिजत नाहीत? वा, हे बरोबर नाहीच. त्यामुळे मग तूर डाळीसोबत अगदी थोडी मदत म्हणून मूग डाळ घालून बघितली आणि प्रयोग सफल झाला.  कदाचित मूग डाळीला शिजतांना बघून तुरीला उत्साह आला बहुतेक. मग काय हा प्रयोग सुरूच ठेवला. कधी मसूर डाळ पण थोडक्यात घातली आणि फारच मज्जा आली, तीच ती तूरडाळ का? असा प्रश्न पडला माझा मलाच. मग मूग आणि मसूर दोन्ही कमी प्रमाणात घातले आणि आमटीला तर मिश्र डाळीची चव आली आणि तूरडाळ पण एकदम झकास शिजली. क्या बात है?


काही प्रसिद्ध खाऊ गल्लीत गेले होते तेव्हा जाणवलं माझ्यातल्या शेफ ला कि हे सांबर काही नुसती डाळ शिजवून केले नाही आहे. काही तर गडबड आहे. मग मी पण डोकं चालवलं, आधी त्याच न शिजणाऱ्या, अखडू तुरडाळीचा भरडा केला आणि तो काही अंशी डाळीत घालून शिट्ट्या केल्या, आणि बघते तर काय   इतक्या सहजी ती डाळ शिजली म्हणून सांगते, मस्तच. 


बाकी सख्यांच्या साथ संगतीने तूरडाळ उत्साहाने शिजली. सख्यांची मदत मिळाली, थोड्या प्रमाणात हे फार छान झालं. त्या तुरडाळीला आता कोणी म्हणजे कोणीच नावं ठेवणार नाहीच. ह्याची मला खात्री आहे. 


चला तर मग आपण पण असेच नकळत, न सांगता कोणाची ना कोणाची मदत करत राहुयात. थोडासा आधार / टेकू / एक ते लागणारं पुश देऊन बघुयात, त्यांची गाडी धावणार ह्यात शंकाच नाही. आणि तुमची, अरे दुप्पट शक्तीने, जोमाने, कारण आंतरीक समाधान लाभल्यामुळे. कुठेही सुतवाच्य न करता हे संभव आहेच, अगदी नक्की. चला तर मग "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ".  बघा म्हणजे, इतक्या त्या पिटुकल्या डाळी, प्रचंड प्रोटीन देणाऱ्या, दररोजच्या वापरातल्या पण कित्ती म्हणजे कित्ती शिकवून गेल्या. प्रयोग करत राहा, अजिबात दोष देण्यात वेळ वाया घालवू नका, आणि दुसऱ्यांची मदत नक्की करा कुठल्या न कुठल्या पद्धतीने नेहेमीच / सातत्याने.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...