आजच एक छोटीशी बातमी वाचली व्हाट्सअँप वर. एक संस्था कार्यरत आहे पुण्यात आणि त्यांचं उद्देश जरा हटके आहे. त्यांच्या संस्थेच्या सिद्धांताप्रमाणे दरदिवशीची एक रोजनिशी हवी, वेळ पाळणे महत्वाचे आणि निसर्ग, आपले पूर्वज, हवा, पाणी, अग्नी, ज्योत, शेतकरी, पिकं ई. सर्वांसमोर सकाळी, संध्याकाळी, रात्री नतमस्तक व्हा. आरती नाही तरी एखादे भावगीत म्हणा रोज, देवळात जा आणि हळुवार घंटानाद करून त्या खाली काही क्षण उभे राहा ई. असे सगळे. आणि हे सगळं करायला दिवसातले साधारण ३-५ मिनिटे लागतात, जास्त नाही. पण वेळ पाळणे महत्वाचे.
माझ्या, आमच्या आदरणीय गुरु डॉ. गौरी मॅडम अगदी न चुकता दर महिन्यात, सणावारी ध्यानाची उजळणी घेतात, आम्हाला त्याचे महत्व विसरू देत नाहीच. खूप मेहेनत घेऊन अप्रतिम अशी मेडिटेशन ची आखणी केलेली असते. त्या नेहेमी सांगतात आणि करून पण घेतात आमच्या सर्वांकडून ते म्हणजे सोनेरी प्रकाशाची महती. तो जो दिव्य, दैविक सोनेरी प्रकाश आहे त्याची किरणे मेडिटेशन च्या वेळी आपल्या शरीरात, प्रत्येक भागात प्रवेश करत आहेत असा अनुभव घ्यायचा. त्याची प्रचिती येतेच, निश्चित. आणि मग आपल्या आजूबाजूला, सर्वत्र जे प्रकाशमय आहे आपण त्याचाच एक भाग आहोत, त्यात समरूप झालो आहोत, आपण जो प्रकाश अनुभवत होतो तो आणि आजूबाजूचा भव्य-दिव्य प्रकाश एकरूप झाला आहे हा देखील टप्पा महत्वाचा ठरतो मेडिटेशन करते वेळी.
आता दिवाळीचे दिवस आहेत, सर्वांनाच त्याचे वेध लागले आहेत, आणि त्या पणतीचा जरी प्रकाश आपण बघितला, अनुभवाला तरी एक लक्षात येतं कि हिवाळ्यात, थंडीच्या दिवसात, तिन्हीसांजेला सर्वांच्या घरी, दारी, तुळशीपाशी पणत्या लावल्या जातात. त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात. उजेड आणि ऊर्जा मिळावी सर्वांनाच ह्या साठी. माती, तेल, वात आणि ऊर्जा हे एक वेगळे समीकरण आहे. इतकी छोटी पणती पण भविष्यरूपी अंधारात आशेचा किरण दाखवत वाट समोर उभी करते. सगळ्या पणत्यांचा एकत्र परिणाम थंडीत सर्व सजीवांना उपयोगी पडतोच.
बुद्धिवान माणसं पणती, दिवा, उजेड आणि ऊर्जा ह्यांना पण सोडत नसेलच, त्यांच्या बद्दल पण उणे-दुणे काढत बसणारच. मग पणती उजेड आणि ऊर्जा द्यायचं थांबवते का? अजिबात नाही. कोणी काहीही म्हणा तो सोनेरी प्रकाश सातत्याने प्रकाशमय राहतो आणि सर्वांपर्यंत पोचत असतोच. त्याच्या कार्यात काहीही फरक पडत नाहीच. मग आपण माणसं का प्रत्येक वेळी सगळं ढवळून टाकतो? आपण जर त्याच प्रकाशाचा एक भाग आहोत, समरूप झालो आहोत मग हळूहळू ध्यानाकडे लक्ष केंद्रित करून, साधना वाढवून सगळं सोडून देता आलं पाहिजे म्हणजे कार्यरत राहता येईल सातत्याने.
म्हणून म्हणते, दररोज त्या सुर्यबाप्पाला दोन हस्तक आणि एक मस्तक जोडून विनन्ती करू यात कि त्याची किंचित ऊर्जा, उजेड, शक्ती, भक्ती, सातत्य, ई. सर्वच गूण आम्हाला लाभू देतं.
एक अंश आहात त्या सोनेरी किरणांचा, आजच्या दिवशी पुढ्यात उभं असलेलं कार्य करा, सद्बुद्धी मिळेल तसे वागा, ध्यान करत राहा आणि सुचवलेल्या मार्गावर चालत राहा, ह्या शिवाय आपण काहीही करत नाही, करू शकत नाही, योग्यता नाहीच, आणि आपलं येथे काहीही नाही. हे ध्यानात असू द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा