आज एक दुग्ध शर्करा योग अनुभवाला, आला आणि तो साधता आला. दिवाळी, वर्षातला सर्वात महत्वाचा आणि मोठा सण, दिपोत्सव, थंडीची सुरवात आणि कोवळ्या उन्हाची आस, धार्मिक वातावरण, पूजा अर्चा आणि त्यात भर म्हणजे "दिवाळी पहाट" कार्यक्रमांची मेजवानी. अशी मेजवानी ती कि "छप्पन भोग" च्या पल्याड अशी. कुठलीही उपमा देऊच शकत नाही अशी किंबहुना कुठलीही उपमा तय्यार झालीच नाही शब्दकोशात अशी ती ट्रीट कानांना. क्या बात है? काय सुंदर झाला कार्यक्रम, वाह वाह, कित्ती अप्रतिम गायले ते, काय भन्नाट साथ मिळाली वाद्यांची, वादकांची, ई. च्या पल्याड होतं ते, जे आज "ह्याची देही ह्याची डोळा अनुभवलं". संपूर्ण वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मिळाली. इतक्या टाळ्या वाजवल्या, विठ्ठल गजर झाला, काटे आले अनेक वेळा त्या ताना ऐकून, बासुरीचे सूर साठवतांना आणि तबल्याचे खडे बोल अनुभवले वैविध्य वेळी तेव्हा. बासुरी ची साथ, तिची जुगलबंदी तर जगाच्या पलीकडची अनुभूती देऊन गेली. कुठल्याही सूत्र संचालनाशिवाय उत्कृष्ट सादरीकरण मी पहिल्यांदा अनुभवलं, असं हि घडतं ते पहिल्यांदा समजलं. पुरेपूर वेळेचा उपयोग, विश्रांती न घेता सलग गायन, ते देखील तब्बल दहा हजार समुदायासमोर, निःशब्द होणे म्हणजे काय हे स्वानुभवातून कळले आज. सुप्रसिद्ध गायक, असंख्य पारितोषिक विजेते श्री राहुल देशपांडे ह्यांच्या गीताने आज पहाट सजली होती. ती एक पर्वणीच होती सर्वांसाठी. "मोगरा फुलला" हे त्यांनी एक गीत संपल्या संपल्या चटकिनी सुरु केलं आणि संपूर्ण समुदाय त्यांना साथ देऊ लागलं, अर्थात हळू स्वरात, किंवा आवाजात, पण तो जो माहोल तय्यार झाला त्यावर भाष्य करणे अवघड आणि अशक्यच. त्यांचा लवाजमा फार मोठा होता, गायक साथीदार, कदाचित त्यांचे शिष्यगण असतील, वादक ज्यात बासुरी, जगावेगळा तबला वादक, अर्थात पेटी आणि पियानो, ढोल ई. शिवाय खुद्द चौरासियांची पुढील नवतरुण पिढी देखील. आसमंत दुमदुमला, अगदी प्रत्येकाने आनंद उपभोगला हे निश्चित, कोणीही नसेल ज्यांनी अंगावर काटे अनुभवले नाहीत हि प्रासादिक गायकी ऐकून. मंत्रमुग्ध करून सोडले सर्वांनी.
कार्यक्रमाचे आयोजन पण सर्वोत्तमचं. प्रेक्षक आवडीने आलेलं आणि बसलेले, उभे राहिलेले, शिस्त आणि त्या मुळे एकंदरीत उत्कृष्ट जमलेला कार्यक्रम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा