अगदी लहानपणापासूनच मला आठवतंय मी एक जगावेगळी भात-प्रिय व्यक्ती. इतकी मोठी भक्त कि भाताशिवाय पान हालयचं माझं. भात म्हणजे जेवण, तो पाहिजेच, तिन्ही त्रिकाळ पण चालेल, इतकी मोठी आवड. साधा भात ते भाताचे सगळे प्रकार मला पाहिजेच असायचे, वैविध्यता मी स्वतः सांभाळली, कारण खूपच लवकर त्या स्वयंपाक घरात प्रयोग करायला मी सुरवात केली. बाकी सगळे पण खूप आवडायचे, पण भात हा सर्वोच्च स्थानी होता. एकंदरीत काय तर जगातली सर्वात मोठी खवैयि म्हटलं तरी चालेल.
कालांतराने मग पोळी-भाजी वर गाड आलं, मोठी झाले आणि डब्ब्यात कोरडी पोळी भाजी जास्त सोप्पी जाऊ लागली. सकाळच्या घाईत फक्त पोळी भाजी होत असे. असो. पण भातावरचे प्रेम काही कमी झाले नाहीच.
त्या नंतर वजनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे भात सोडणे हे समीकरण वाचण्यात आलं, आणि सर्वत्र हि हवा पण होती, कि भाताने वजन वाढते. मग काय तो जो माझ्या स्वयंपाक घरातून बाहेर पडला तो पडलाच. आताशा भातवाढी मला फोन करते कि काय असं वाटायला लागलंय मला, तिचा उपयोगाचं होत नाही अजिबातच. बिच्चारी कुठेच वापरली जात नाहीच. अगदीच कोणी आलं-गेलं तर कुठे तो शिजतो, तो देखील अगदी कमी प्रमाणात.
पण आज भलतंच काही तरी झालं, जगावेगळं, हाताबाहेरचं माझ्या. दुपारच्या जेवणाची वेळ झाली, पोटात कावळे कोकलायला लागले आणि वाढायला घेणार तेव्हा नको वाटलं भाकरी भाजी आमटी असं सगळं खायला. भातचं हवा होता आज, भात म्हणजे भात. मुरमुरे आमटीत घालून "दुधाची तहान ताकावर" असा पर्याय सुचला पण नाही, भात. मग पातळ पोह्याचा चिवडा खावा म्हटलं थोडासा तोंडी लावायला पण नाहीच हो. टस का मस होईना ती भूक, भातावर अडली होती गाडी. आता काय करायचं, भात करायचा नाही, खायचा नाही मग? डोक्यात आयडियाची कल्पना आली. आमटी भाजी मस्त गरम केली. उडिद पापड भाजून घेतला, भाकरीचा मस्त बारीक कुस्करा केला आणि तुकडे करून घास-घास खाण्याऐवजी मस्त कालवून खाल्ले तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. पण काय हे कडक डोहाळे आणि ते देखील ह्या वयात?, छे छे. फार जेरीस आणलं त्याने मला आज. मग माझ्या लक्षात आले कि भात कित्ती महत्वाचा आणि कालवून खाणे म्हणजे अस्सल जेवण. अगदी तृप्ततेची ढेकर दिली, कारण मी मस्त पर्याय शोधून काढला होता, तो वापरला देखील होता आणि भाताला हात न लावता. "असे डोहाळे लागती आणिक स्मृती देऊनी जाती".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा