मला तसा प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा अभिमान वाटतोच, पण खास करून मिडियात काम करणाऱ्यांचे अप्रूप वाटते, कारण त्यांना वैविध्य स्तरावर काम करावे लागते. त्यांचे क्षेत्र माझ्या दृष्टीने फारच वेगळे आहे त्यामुळे असेल कदाचित. आधी खूप अभ्यास, सातत्याने केलेले वाचन - मनन - चिंतन, मग त्यावर विविध ठिकाणी फिरून जमा केलेली माहिती, त्यावर वाचकांना आवडेल, भावेल असे लिखाण, मग ते संपादकांकडून किंवा इतर तत्सम चमू कडून मिळवलेला होकार, नकार किंवा फेरबदल ई. त्यावर पुन्हा कदाचित अगदी कमी वेळेत काम, ई. सगळे खूप पळापळीचे, धावपळीचे आणि फार आव्हानात्मक वाटते, भासते, जाणवते मला. का कुणास ठाऊक? कदाचित मी अगदी न चुकता दररोजचे वर्तमानपत्र वाचक असल्यामुळे असेल कदाचित, गेली अनेक वर्ष, दशकं. पण हे सगळं जरी योग्य असलं, ती वार्ताहर मंडळी जरी खूप दिव्यातून जात असली तरी मी अनेकदा अश्या बातम्या वाचते कि मला गहन प्रश्न उद्भवतात समोर.
अनेक वेळा अश्या बातम्या माझ्या वाचनात येतात ज्या पूर्णपणे अर्धवट असतात. उदाहरणार्थ, आजच एक बातमी छापून आली आहे, ज्यात मथळा आहे, सर्वोत्कृष्ट वस्तूचा नमुना दर्शवणारा फोटो आहे, आणि काही शब्द पेरले आहेत थोडक्यात. एका नवीन वास्तूचे, उद्योगाचे, संकल्पनेचे म्हणे काल उद्घाटणं झाले. त्या नाविन्यपूर्ण संकल्पाने बद्दल, ती कोणाची आहे, ई. बद्दल उहापोह आहे पण ती संस्था कुठे स्थित आहे हे कुठेच दिले नाही. त्या संस्थेला जर भेट द्यायची असली तर त्यांना कुठे संपर्क करायचा हे द्यायचं राहून गेलं आहे, त्या संस्थेच्या कामाच्या वेळा काय आहेत, कोणाशी संपर्क साधायचा, वेब साईटचे नाव काय आहे, व्हाट्सअँप नंबर काही आहे का, ई-मेल काय आहे, अरे काही तर माहिती, किंवा संपूर्ण माहिती तर पुरवा. अर्धवट किंवा अपूर्ण बातमी देऊन काय मिळतं? अशी बातमी छापलीच कशी जाते? ती अनेक लोकांच्या डोळ्याखालून जात नाही का छापण्याच्या आधी? किंवा त्या संस्थेला ह्या बातमीचा मसुदा, ड्राफ्ट दाखवला जात नाही का? काय हे? मला अजिबात आवडत नाही अश्या अर्धवट बातम्या वाचायला आणि मग संपूर्ण वार्ताहर मंडळींच्या कामाबद्दल असलेला आदर किंचित कमी होतोच.
मान्य आहे कि सध्या सर्वत्र सोशल मीडिया चे जाळे पसरले आहे, अनेक ठिकाणी, गूगल बाबाला विचारले कि संपूर्ण माहिती मिळते पण का विचारायचे इथे तिथे, तुम्ही ठरवलं आहे ना तुमच्या प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापायचं, मग संपूर्ण माहितीसहित छापा, नाहीतर नकोच. असो. आपण कोणालाच बदलू शकत नाही पण ह्याला पत्रकारीता म्हणत नाही हे निश्चित. त्यांना स्वतःला हा प्रश्न पडत नसेल कि हि बातमी वाचल्यावर काय प्रश्न मनात उद्भवतील लोकांच्या? आणि मग त्यांनी कुठे जायचं? अर्धवटराव हा शब्दांश अगदी योग्य आहे अश्या बातम्या लिहिणाऱ्यांकरता. आणि हे वाढतं प्रमाण आहे सध्या. नो वंडर सध्याची नवीन पिढी नको म्हणते हातात घेऊन वर्तमानपत्र वाचायला, त्यावर खर्च करायला, कारण संपूर्ण हवी असलेली माहिती त्यांना एका क्लिक वर ऑनलाईन सहज उपलब्ध असते. असो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा