गुरुवार, १३ मार्च, २०२५

२१५२: व्हॅल्यू ऍड


अचानक परवा आमच्या ग्रुप वर "पुरण पोळी" करून घरपोच मिळतील अशी सुबक सुंदर पद्धतीने मांडलेली माहिती वाचली. माझीच शेजारीण, मैत्रीण करणार होती. म्हटलं चला, लगेच तिला ऑर्डर देऊन टाकली सुद्धा. आणि मग काय वाट बघत होते कधी एकदा ती येते ह्याची. वाट बघणं जरा अवघड होऊ लागलं कारण तिच्या तय्यारीचा फक्त आवाजच नाही तर सुगंध पण माझ्या पर्यंत पोचला अनेकदा. आणि सरते शेवटी ती वेळ आलीच, ती आली, अहो म्हणजे माझी मैत्रीण पुरणपोळी घेऊन आली, असं म्हणायचं होतं मला. गरमागरम, आयत्या पुरणपोळ्या उत्कृष्ट पद्धतीने पॅक करून आणलेल्या माझ्या हाती स्थानापन्न झाल्या. बघते तर काय सुवाच्च अक्षरात, विविध रंगांची शाई वापरून, होळीचा जगावेगळा असा सजवलेला, नटवलेला मस्त वहीचा कागद देखील बघितला. म्हटलं वा, क्या बात है? असं असलं पाहिजे, फक्त पोळ्या नाहीतर सणाच्या शुभेच्छा देखील. ती छोटेखानी कार्ड्स विकत आणून पण चिपकवून देऊ शकली असती पण छे हो, स्वतः करून आणून दिले. म्हणजे तिची तय्यारी कित्ती विचारपूर्वक, जोरदार आणि झोकून देऊन केली होती हे स्पष्ट दिसतंय. असं जर ती नेहेमी करत गेली तर सातत्याने तिला ऑर्डर द्याव्या लागतील, आणि देतील देखील सगळेच जण. मी तिला जितकी ओळखते त्यानुसार तिने प्रत्येकीला विविध चारोळ्यांनी सजवून मग पोळ्या दिल्या असतील, हे निश्चित. काय जबरदस्त व्हॅल्यू ऍड केलंय तिने, ध्यानी मनी नसतांना असं ऑर्डर चं गोड कोणी आणून दिलं कि चार घास नक्कीच जास्त सेवन केले जातातच. फारच भावलं तिचं हे करणं, कौतुकास्पद आहेच अगदी जशी तिच्या पोळ्यांची चव. अहाहा च.  

आणि बरं का मंडळी हे सगळं तिने बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत देऊ केलं, ते देखील घरचं, स्वच्छ, शुद्ध आणि आवडीने केलेलं, फक्त व्यवसाय म्हणून नाही. असा सगळा गोडवा संपूर्णपणे उतरलेली ती पुरणपोळी खाऊन तृप्त व्हायला झालंच आपोआप. 

व्हॅल्यू ऍड हि सॉफ्टवेअर इंजिनीरिंग मधली एक फारच उत्कृष्ट संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय उद्योजक त्यांच्या गरजा नमूद करतात, सांगतात आणि त्यांना जेव्हा मागितल्यापेक्षा जास्त मांडले / दिले जाते तेव्हा ते नेहेमीकरता सॉफ्टवेअर कंपनीलाच धरून राहतात, त्यांनाच सातत्याने काम देतात, कारण त्यांनी खूप विचारपूर्वक हवं ते आणि त्या उपर मनाला भावणारं अजून काही देऊ केलं असतं, न विचारात, न उहापोह करता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...