रविवार, १६ मार्च, २०२५

२१५४: जिवलगा


मी जेव्हा स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्याचे ठरवले तेव्हा सर्वांचा एकच प्रश्न होता, कि मी आता पुढे काय करणार? आणि तो मला सतत विचारला जायचा, अजूनही विचारतात. माझे उत्तर एकच, मला थोडसं काम करायला आवडेल, म्हणजे अर्धवेळ, गरजेनुसार आणि त्या नंतर घरी राहायला मज्जा येईल. जे घर माझं आहे, पाहिलं स्वतःचं असं घर, ज्याने प्रामुख्याने मला धीर दिला, छत दिलं आणि संरक्षण देखील अश्या घरात नोकरीमुळे मी राहूच शकले नाही पूर्णवेळ, किंवा घरासोबत वेळ घालवणं हे झालंच नाही. फक्त घाई, गडबड, घडाळ्याच्या काट्यावर पळापळ आणि अंग टेकायला काय ते घर, बास. त्यामुळे मला आवडतं घरी राहायला जे मी कधीच राहिले नाही, माझं अस्तित्व जाणवेल इतका वेळ नाही घालवला त्यात. स्वच्छता करणे स्वतः, भिंती, छत, जमीन, फर्निचर सोबत भरपूर वेळ घालवून त्याला त्याचं महत्व कधीच जाणवून दिले नाही. नेहेमी खो देत राहिले. 


पण गेली दिड वर्षे आम्हाला दोघांना प्रचंड मज्जा येते आहे. खूप वेळ आहोत आम्ही एकमेकांसोबत. ती साथ आता काहीशी दृढ होतेय. दोघांना मस्त वाटतंय, कधीही न अनुभवलेलं असं काहीसं. मी घरी बहुतांशी वेळ वास्तव्याला असल्यामुळे माझा वावर प्रत्येक खोलीत आहे. स्वतःच्या हस्ते स्वयंपाक होतोय, तो देखील मस्त गाणे किंवा भजनं वगैरे लावून. मग जरा जास्त स्वच्छता राखली जाते आहे कारण वेळ आहे हातात म्हणून. प्रत्येक खोलीकडे लक्ष आहे, अगदी शुल्लक कामं वगळता सगळीच मी हातात घेतली आहेत त्यामुळे अजून मज्जा येतेय, कृतज्ञता वाढली आहे, त्यांचं महत्व जास्त प्रकर्षाने जाणवतं आहे. एकमेकांच्या संपर्कात राहिल्यामुळे तो स्पर्श, कंपन, आवाजाची ओळख, चाल, आणि अश्या बऱ्याच बाबींमुळे वेगळं वाटायला लागलंय. ह्या टोकाला गेले कि चार कामं दिसतात, ती करता करता ह्या टोकाला आले कि ६ कामे नजरेस पडतात. त्यामुळे माझी ये-जा वाढली आहे, घरभर काही ना काही तरी सुरूच असतं माझं सध्या.    


मी गेले तीन दिवस गावाला गेले होते, शेजारी मुंबई ला फक्त. आज जेव्हा घरी आले तर काय सांगू माझं काय दणक्यात स्वागत झालंय ते. हे घर बोलू शकलं असतं तर? त्याने मला अक्षरशः जाणीव करून दिली कि त्याने मला कित्ती म्हणजे कित्ती मिस केलं, त्याला माझी केवढी आठवण आली ते. बाप रे. फक्त तीन दिवस मी नव्हते तर मला इतकं जास्त जाणवलं, कि कल्पने पल्याड. माझ्याशी प्रत्येक भिंत, वस्तू, आणि संपूर्ण वास्तू जशी काही संवाद साधत होती, का गेलीस? कुठे होतीस? असं काहीसं विचारत होती. काय भन्नाट वाटलं म्हणून सांगते. पहिल्यांदा मी असं अनुभवलं आज. इतकी वर्ष मी इथे राहते आहे, पण आज खरंच खूप खास होतं, एक वेगळी आपुलकी जाणवली अजाणतेपणी आणि ती देखील एका (व्यावहारिक दृष्ट्या) निर्जीव घराकडून. त्यामुळे सजीव काय म्हणतात, काय म्हणत नाहीत, मिस करतात, करत नाहीत, ह्या सगळ्यांच्या पल्याड जायला झालं मला अचानक, आपोआप. एखाद्या वयस्कर, अनुभुवी आणि जगावेगळं प्रेम करणाऱ्या माणसाने म्हणावं तसं जाणवलं मला आज. 


फक्त दिड वर्ष मी जरा जास्त वेळ घालवला, स्वच्छतेकडे लक्ष दिलं / केली स्वतः, आणि मनापासून मला ह्या माझ्या वास्तूचं महत्व प्रकर्षाने जाणवू लागलं, ते मी जगू लागले, बास एवढंच काय ते. ह्याचा मला इतका अप्रतिम प्रतिसाद मिळेल हे स्वप्नात देखील कधीच मी विचार केला नव्हता. ह्याच माझ्या वास्तूत जर मी गृहिणी म्हणून सुरवातीपासून राहिले असते, माझ्या पिल्लांची जास्त व्यवस्थित काळजी घेतली असती तर सर्वांचे जास्त भले झालेच असते, कारण तितक्या प्रमाणात वास्तूचा / वास्तू देवतेचा भरभरून आशीर्वाद मिळाला असता, आणि कदाचित वेगळं चित्र उभं ठाकलं असतं, हे आज जाणवलं. खैर, असो. ह्या पुढे मी प्रयत्न पूर्वक संवाद राखीन माझ्या ह्या नव्याने जाणवलेल्या जिवलगाशी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...