मी असं ऐकलं आहे गुरुवर्यांकडून, श्रेष्ठ आणि जेष्ठ साधकांकडून आणि अर्थातच संशोधकांकडून कि एका व्यक्तीने काही खास तास, किंवा दिवस सातत्याने ध्यान केले, जप केला, मंत्रोच्चार केले, मंत्रांचे उच्चार केले, पठण केले तर ते अनेक सजीवांपर्यंत पोचतं, सर्वांनाच उपयोगी पडतं. मला खात्री आहे कि सजीव म्हणजे सगळेच, प्राणी, पक्षी, झाडं, फुलं, वेली, फळं, भाज्या, पिकाऊ जमीन ई. असणारच. "वसुधैव कुटुम्बकम्" प्रमाणे सगळेच सर्वांच्या साथीने पुढे मार्गस्थ होतात. म्हणजे बघा तो रामनामाचा, जपाचा, मंत्रोचारांचा महिमा, अगाध आहे. काही संशोधक तर आकड्यात मांडतात कि बत्तीस हजार जणांना त्या लहरी, तरंग पोचतात. कदाचित हे आधीच्या लोकांना माहिती असल्यामुळे होमहवन आणि बाकी पूजा अर्चा ह्या मंदिराच्या किंवा घराच्या प्रांगणात होत होत्या, म्हणजे अधिकच लवकर त्या सर्वांपर्यंत पोचतील.
जरी आता आपण सर्वच अत्याधुनिक जीवन शैली अंगिकारली असेल तरी देखील दररोज न चुकता एक माळ, मानसपूजा, स्तोत्र पठण असे उपक्रम करावेत, सर्वांनीच, काही थोड्या लोकांनी किंवा समुदायांनी नाही. फक्त आपल्यासाठी नाही, आपण करू शकतो म्हणून, सर्वांसाठी, वातावरणशुद्धी साठी, वातावरण निर्मिती साठी निश्चित करावे.
माझी आई ताक करतांना, खीर किंवा कुठलेही दुधाचे पदार्थ करतांना, घुसळतांना, रवी वापरतांना "राधा कृष्ण गोपाळ कृष्ण" असे सतत म्हणत असायची. ते फक्त बघून आपोआप ती सवय आम्हाला लागलीच, न कळत. आता तर वरण सारखे करतांना सुद्धा सहज मुखातून कृष्णाचे नाव घेतले जातेच. अगदी आधी सकाळी उठल्याउठल्या जात्याच्या ओवी म्हणायच्या, "कराग्रे वसते लक्ष्मी...", भूपाळी, त्या नंतर तुळस पूजन होत असे, मग देवाची पूजा, त्या नंतर असे हे गोपाळ कृष्णाचे नाव, नैवैद्य दाखवतांना मंत्रोच्चार, पानावर बसतांना "वदनिकवळ घेता...", म्हणजे प्रत्येक वेळी त्याचे नामस्मरण होत असे. मुलांची नावे उचारतांना पण त्याचे नाम मुखी येत असे. विविध माध्यमातून, प्रत्येक सणाला, व्रतवैकल्यांना घरोघरी नाम घेतले जायचेच, प्रत्येकाकडून. आता प्रवाहपतित झाल्यामुळे हे सगळं जरी मागे पडलं असलं तरी जमेल तसे, जमेल तेव्हा प्रयत्न कराच. ब्रह्मकुमारी आश्रमाने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक एक तासाने एक मिनिटाचा अवधी हा डोळे बंद करण्याचा ठेवा, बाहेर हिरवळ बघण्यासाठी राखून ठेवा, मिटिंग सुरु असली तरी, पुढील तासात काय साध्य करायचं आहे त्या साठी हा पिटुकला ब्रेक अत्यावश्यक आहे, हवं असल्यास प्रार्थना करा ह्या वेळेत, स्वतःशी कनेक्ट व्हा, "त्याच्याशी" होण्याचा प्रयत्न करा, आठवड्याच्या शेवटी रविवारी हमखास काही क्षण आपल्या धरणीमाते साठी, आपल्या पुढील पिढ्यांसाठी नक्की वापरा. दोन हस्तक एक मस्तक पुरेसे आहे, कुठेही कधीही तर कराच नामस्मरण, पण एक ठिकाण, एक वेळ पाळा आणि तरंग निर्माण करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा