मी दररोज हा सुगंध अनुभवतेच पण आज खास काही विशेष जाणवलं. दिवसभर उन्हाने माती कोरडी होते, कुंडीतली झाडे कोमेजू नये म्हणून दररोज सकाळी मी त्यांना पाणी घालण्याच्या निमित्याने त्यांच्याशी संवाद साधते, गप्पा मारते, कृतज्ञ होते आणि सुगंध अनुभवते. मोगरा भरभरून आला आहे बाल्कनीत, कन्हेरी पण बहरली आहेच, तुळस तर विचारू नकाच आणि ह्या शिवाय तो अत्यंत प्रिय, वेगळा, हवाहवासा असणारा मातीचा सुगंध, दिवस बहरून, फुलून असा सुरु होतो. माझ्या ओळखीच्या काही संशोधकांनी हाच मातीचा सुगंध त्यांच्या प्रयोगशाळेत निर्माण केला आहे आणि ते त्याचा उपयोग अनेक वेळा करतात. जेव्हा जेव्हा त्यांना असं दिसून येतं कि प्रयोगशाळेत खूप तास काम करून सगळे दमलेत तेव्हा त्यांना ताज तवाने करण्याचे काम हा मानव-निर्मित मातीचा सुगंध करतो. काही क्षण ते लॅबोरेटरीत मातीचा सुगंध फवारल्यासारखा करतात, न विचारता, अचानक आणि मग सगळेच त्याचा आनंद घेतात.
बाकी बऱ्याच ठिकाणी हा असा सुगंध असलेले रूम फ्रेशनर्स मिळतात हल्ली. मी असं ऐकलं आहे कि ह्या अश्या अनोख्या सुगंधाचा पर्फुम / अत्तर पण तय्यार केलं आहे कोणीतरी आणि ते वापरात पण आहे म्हणे. जेव्हा अश्या प्रकारचे पर्फुम किंवा रूम फ्रेशनर्स तय्यार करतात तेव्हा माणसाच्या कातडीला अपाय होऊ नये म्हणून खूप काळजी घेतली जाते, किंवा जर कोणी कपड्यावर त्याचा प्रयोग केला तर डाग पडू नये म्हणून तसा फॉर्मुला वापरला जातो.
मग सहज माझ्या मनात विचार आला, हा मातीचा अप्रतिम असा सुगंध नक्की आहे कोणा साठी? फक्त माणसांसाठी, त्यांना पुढील कामात ऊर्जा मिळावी म्हणून, का हि एक फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे?
त्याच उत्कृष्ट अश्या सुगंधानेच माझ्याशी संवाद साधत मला उत्तर दिले देखील. तो म्हणाला आणि मला समजलं कि हा सुगंध फक्त माणसासाठी नसून तो झाडांसाठी आहे, मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी पण आहे हो. सर्वांनाच ऊर्जेची, कामे / दैनंदिनी पुढे नेण्याची गरज असते. त्यामुळे हा मातीचा दरवळ खूप जणांसाठी निर्माण केला आहे. मला सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करणाऱ्या सर्वांना आणि लॅब मध्ये देखील काम करणाऱ्या सर्वांना अशी विनंती आहे कि ह्या मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी पण असा एक पर्फुम / फ्रेशनर शोधून काढा म्हणजे अधेमधे तो झाडांवर किंवा मातीवर फवारता येईल आणि अवतीभोवती सर्वांनाच त्याचा लाभ होईल. जशी म्युसिक थेरपी चा वापर सर्रास करतात मुळांसाठी, फळं - पानं - फुलं - पक्षी - जमिनीखालचे कीटक / प्राणी ई. साठी, तसाच ह्याचा पण करावा पण योग्य असा. फळं - फुलं ह्यांचे उत्पन्न वाढवण्याकरता नाही. त्यांना प्रफुल्लित वाटण्यासाठी फक्त. पण तो फॉर्मुला पानांवर, फांद्यांवर सहज सोप्पा असावा, इजा न करता आनंद घेता यावा असा.
तिन्ही पातळीवर असणाऱ्या सर्वांना लाभ होण्यासाठी काय सुंदर नैसर्गिक प्रक्रिया साधली आहे आणि कुठलीही अपेक्षा न करता ते तो सुगंध सर्वांना देत राहतात, जमिनीच्या खाली, झाडांना आणि माणसांना (लहान, थोर, मोठे, गरीब, श्रीमंत सर्वांना), आणि त्यावर फळं - पानं - फुलं - पक्षी ई. ना पण. क्या बात है? "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा