मी पूर्णवेळ जेव्हा शिक्षिका म्हणून कार्यरत होते तेव्हा त्या ठिकाणाला मी आणि मला ते ठिकाण ठाऊक होते, माहिती होते आणि ओळखत होते, अनेक वर्षांपासून. त्यामुळे पेहेराव इतका जास्त महत्वपूर्ण नव्हता. साधा ड्रेस चालून जात होता. पण आता मी पूर्णवेळ कार्यरत नाही एका संस्थेमधे, परंतु, त्या संस्थेने जे भरभरून दिले त्याचा प्रचार, पसार करण्याचे कार्य आता मी हाती घेतले आहे किंबहुना माझ्या पदरात ते पडले आहे. संपूर्ण पुणे दर्शन सध्या होत आहे कारण मी अनेकविध शैक्षणिक संस्थानात जाते आहे आणि संशोधनाबद्दल बोलते आहे. मला ती प्रत्येक संस्था नवी आणि संस्थेला मी. प्रत्येक संस्थेत मी एकटी जात नाही तर माझ्यासोबत ज्यांनी ज्यांनी मला हा प्रचंड अनुभव, अनुभूती दिली, बहाल केली ती प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, संघटना, विद्यापीठ ई. सगळेच असतात. बघणाऱ्यांना फक्त जरी मी दिसत असले तरी मी फक्त एक नाव म्हणून जाते "बोलविता ध्वनी" वेगळाच असतो. त्यामुळे मग मला साधंच पण विचारपूर्वक तय्यार होऊन जावं लागतं आणि अर्थातच मी साडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे माझ्या चार डोळ्यांना सदोदित आताशा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फक्त साड्याच दृष्टीस पडतात. परवाच मी अशी एक सुती साडी विकत घेतली, तिचे पुढील संस्कार करण्यासाठी जेव्हा दिली तेव्हा सहज एक विचार आपोआप मनाला शिवून गेलाच. अगदी विणकारापासून ते साडी विक्रेती, मग इतर संस्कार करणारी सगळी मंडळी ह्यांच्या मनात असा विचार येऊच शकतो कि काय मस्त साडी आहे नाही? मला पण हवी अशीच, किंवा माझ्या आई / बहिणीला / बायकोला पण घ्यावी अशी. ती नेसून गेल्यावर सुद्धा अनेकांना ती आवडू शकते, सहज मनुष्य धर्म आहे हा, काहीच वावगं नाही त्यात. आणि मग ह्या मुळे यत्किंचितही कुठलाही त्रास होऊ नये म्हणून काही करता येईल का? तर सहज सोप्पं आहे. ती साडी दुकानात बघितल्यावर मला आवडली आहे हे मला समजलं / उमगलं म्हणून मनात "त्याचे" आभार माना. ती विकत घेण्याची क्षमता "त्याने" बहाल केली आहे म्हणून धन्यवाद द्या, घरी पोचल्यावर "त्याच्या" समोर ती साडी ठेवून नतमस्तक व्हा, आणि जेव्हा नेसून बाहेर जाल तेव्हा "त्याच्या" कानावर घालून जा, "त्याला" सांगितल्याशिवाय बाहेर पडू नका. बास इतकेच. अगदी सहज जमण्यासारखेच आहे. मग नक्कीच बघणाऱ्याची दृष्टी बदलतेंच, आणि दृष्टिकोन देखील.
आणि हो, मी येथे फक्त साडीचे उदाहरण मांडले आहे, हे सगळ्याच बाबतीत लागू पडतं बरं का.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा