गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

२२६३: धक्कादायक बदल


अगदी मला समजायला लागले तेव्हा पासून मी हेच बघत मोठी झाले, घरी दारी कि दसरा म्हणजे सर्व घराची साफसफाई, भली मोठी रांगोळी दारात, उत्कृष्ट  तोरण दाराला, भल्या मोठ्या प्रमाणात केलेल्या नारळ वड्या, नैवेद्याला नारळी भात आणि इतर साग्रसंगीत संपूर्ण भरीव थाळी, नवीन कपडे, खूप म्हणजे खूप जणांचे घरी येणे आपटयाची पाने द्यायला, सीमोल्लंघन, देवळात मोठ्या पुरुषांनी, मुलांनी जाणे, लहानांनी आजूबाजूच्या थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, दिवसभर भरभरून असे अनेक कार्यक्रम. घरी असतील तेवढ्या गाड्या धुणे, पुसणे, पूजा करणे, हार घालणे आणि तिला त्या दिवशी संपूर्ण आराम देणे. अगदी तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ऐपतीप्रमाणे सोनं विकत घेणे, किंवा जर प्रत्येक गुरुपुर्ष्यामृताला घेत असल्यास, किंवा दसऱ्यानिमित्य आधीच खरेदी केली असल्यास मग पैसे खर्च न करणे ई. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कुटुंबासमवेत, घरासोबत, गाडी सोबत, अंगणात क्वालिटी वेळ घालवणे असे. येणा जाणाऱ्यांशी पोटभर गप्पा मारणे, विविध पदार्थ खाणे आणि एकंदरीत मज्जाच मज्जा, आरती, प्रसाद, धार्मिक वातावरण. सगळ्यांकडेच असेच वातावरण, सर्वत्र सारखेच, उत्कृष्ट असे, काहीही फरक नाहीच. त्यामुळे अजून मज्जा यायची. कित्ती म्हणजे कित्ती असंख्य आठवणी आहेत माझं मलाच माहिती. आई खास भरतकाम विणकाम करून छोटीशी पिशवी शिवून द्यायची. ती घेऊन सगळ्या घरी जायचं सोनं वाटायला आणि ती पिशवीभर खाऊ आणून द्यायचा आईला, अगदीच काही आवडीचं  मिळालं तर यथेच्छ ताव मारायचा त्यावर. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आम्ही घरी रात्री कोणीच जेवायचं नाहीच इतका प्रसाद खाल्ला जायचा.  


आता मी अगदी अत्यानंदाने अतिशय मनाला भावणारी शांतता अनुभवते आहे आज, खास अशी. गाडी नाही त्यामुळे त्याचं काम नाही. आणि बाकीचे काहीच करावेसे वाटत नाही, म्हणजे निराशेने वगैरे अजिबात नाही, समाधानाने. बाप्पाने इतके आधी करून घेतले आहे कि आता कुठलीही जबरदस्ती नाही, मोजमाप नाही, उणेदुणे नाही त्यामुळे उत्कृष्ट अशी भरभरून शांतता आहे. शाळेत, महाविद्यालयात, नोकरी करत असतांना, आईच्या घरी असतांना सलग अनेक वर्ष सगळं उपभोगलं  अगदी दोन भल्यामोठ्या प्रदर्शन्या देखील, रामनगरची आणि धंतोलीतली. दरवर्षी, न चुकता. तो मसाला पापड, आकाश पाळणा, हसरे चेहेरे, मौत का कुआ आणि इतर छोटे झुले. अहाहा च. काय दिवस होते ते? भन्नाट. मन तृप्त होईपर्यंत सगळं केलं, आता तो अल्बम फक्त बघायचा, सिम्युलेशन म्हणतात ना तसे.  आता बकेट लिस्ट उरलेली नाहीच कारण कधी ती केलीच नाही, माहीतच नव्हती, आणि सगळंच मनात यायच्या आत, काय म्हणतात तसे फोमो वगैरे समजायच्या आत मिळालंच, भरभरून, मग काय उरणार सांगा. इतकं सुंदर आयुष्य कोणाला जगायला मिळतात हो? ते देखील सेल्फी नाही, महागडे फोन नाही, भरमसाठ पैसे नाहीत, महागडी गाडी नाही, उगाचच बाहेर जाऊन खाणे नाही. सगळं कसं शुद्ध सात्विक असं. 


 कुठेही गाजावाजा न करता, पडद्यामागे राहून त्याने प्रीती नावाची,  किंवा ह्या प्रीतीसाठी स्क्रिप्ट लिहिली. ती इतकी भन्नाट होती कि ह्या पेक्षा जास्त त्यात काहीच असू शकत नव्हतं. अगदी शाळकरी वयात खूप सेवा घडली हातून, आपोआप, काहीच करावं लागलं नाही खास, वेगळं, वेगळ्या वाटेने जाऊन वगैरे. मग महाविद्यालयात देखील अजून त्यात वृद्धिगत व्हायला मिळालं आणि खूप वेगळ्या स्तरावर कामे झाली, मदत करता आली, पूजा-अर्चा, व्रत वैकले घडून आली हातून. सत्संग, किंवा त्याच्या सातत्याने सानिध्यात राहायला मिळालं, "त्याच्या" महिमा कानावर पडत राहिल्या आणि मी घडत राहिले. शाळा असो किंवा कॉलेज तेव्हा बहुतांशी प्रत्येक सणाला सुट्टी असायची. ७५% उपस्थिती प्रार्थनीय होती, त्याचा बडगा नव्हता. विविध स्क्रीन्स नव्हती, उत्कृष्ट वातावरण, जेवण होतं, नोकरी सुरु झाली, सासरी पदार्पण झाले तेव्हा सगळं सहज आणि जमेल तेवढं करता आलं कारण सर्वोत्तम सगळं करून झालं होत तोवर, अनेक वेळा, अनेक ठिकाणी.  ते जे करून घेतलं ते इतकं मनःपूर्वक होतं कि समाधानाची परिसीमा म्हणायला हरकत नाहीच. काय आहे ना तो सुप्रीम फोर्स, किंवा तो माझा बाप्पा. मी  तर आज पुन्हा एकदा हे सगळं आठवून, छे छे, मी कोण, माझी काय बिशाद कि मी आठवेंन सगळं हो, त्याने आठवण करून दिली, जसा कि भाला मोठा चित्रपटाचं जणू, आणि परत एकदा त्याच्या पायी नतमस्तक झाले, आभार मानले, परिपूर्ण झाले हे निश्चित. हे असं अद्वितीय आणि अद्भुत किती जणांच्या वाट्याला येत हे मला ठाऊक नाही  पण त्या भाग्यवंतातली एक निश्चित आहे. ह्याचा अर्थ मला आता करायचे नाही, बाकी करतात ते व्यर्थ असे नाहीच मुळी. आज मी हि अशी आहे. बास. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...