साधारण २०१४ सालची गोष्ट आहे. मी संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करत होते आणि एका परदेशी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करायचे होते. ती मशीन लर्निंग या विषयात काहीतरी संशोधन करू इच्छित होती. खूप शोध घेतला, विचार केला, चर्चा केली आणि अखेरीस एक विषय निश्चित झाला. आम्हाला 'Interestingness' हे एक खूप आव्हानात्मक मॅट्रिक्स (Matrix) सापडले आणि मग आमची घोडदौड सुरू झाली.
डेटासेट मिळाला आणि आमचा एक उद्देश होता: जर एखादा वाहन चालक भरधाव आणि बेफिकीरीने गाडी चालवत असेल, तर तो कदाचित संकटात/घाईत असेल किंवा तो त्या गाडीचा मालक नसेल. मालक असला आणि स्वकष्टाने महागडी गाडी घेतली असेल, तर मग एक शिस्त आणि काळजी दिसून येते, स्वतःबद्दलची, गाडीबद्दलची आणि रस्त्यावरच्या इतरांसाठीसुद्धा. आम्ही अशा उद्देशाने डेटा विश्लेषण सुरू केले आणि आम्हाला उत्कृष्ट निष्कर्ष मिळाले.
त्यानंतर नुकताच मी अनेक वर्षांनी प्रवास केला. सर्व पर्याय शोधल्यावर गाडीने रस्त्याने प्रवास करण्याचे निश्चित झाले. सुंदर, नवीन, भलीमोठी गाडी वेळेच्या आधी दारात उभी ठाकली आणि काही वेळातच चालकाच्या सवयीची कल्पना आली.
अर्थात, संपूर्ण प्रवासात मस्त ओळख झाली आणि गाडी चालवण्यासंबंधीच्या अनेक बाजू समजल्या: कधी गती वाढवायची, कधी कमी करायची, प्रवाशांची काळजी घेणे, खड्डे शक्यतो टाळणे, शिस्तीत आणि एका झटक्यात पार्क करणे—एकूणच, गाडी चालवण्याचा आनंद घेत प्रवास करणे, फक्त काम म्हणून नव्हे. काही चालक फक्त दिलेले काम, जबरदस्ती केल्यासारखे किंवा फक्त पैशांसाठी करतात, त्यामुळे चालकामधील हा फरक जाणवला.
खरं सांगायचं तर, तो चालक गाडीचा मालक नाही यावर माझा विश्वास बसत नव्हता. मालकांनी इतकी कोरी स्वतःच्या मालकीची गाडी चालकाच्या हाती दिली, यावरूनच 'शितावरून भाताची परीक्षा' झाली होती. पण मी स्वतः गेली २४-२५ वर्षे असंख्य प्रकारच्या गाड्या चालवल्या असल्यामुळे, हे ओळखायला मला जास्त वेळ लागला नाही.
प्रवासात काही वेळा एकत्र भोजनाचा आनंद घेतला आणि हा प्रवास वेगळेपणाचा ठसा उमटवून नक्कीच गेला. डोक्यात विचार आल्यापासून, नियोजन करण्यापासून, माझ्या काही अडचणी लक्षात घेऊन सगळं पार पडलं; याचे श्रेय चालक आणि मालक दोघांनाही जाते.
चालक वयाने लहान, कष्टाची तयारी असलेला आणि पाच वर्षांचा सर्व प्रकारच्या गाड्या चालवण्याचा अनुभव असलेला होता, म्हणजे विविध व्यक्तिमत्त्वांशी जुळवून घेण्याची क्षमता असलेला. मालकांची काळजी सतत दिसून येत होती; चालकाशी आणि प्रवाशांशी ठेवलेल्या सततच्या संपर्कातून ती व्यक्त होत होती. अर्थात, इतकी नवीन पद्धतीची गाडी आपल्या सेवेत आहे म्हटल्यावर आम्हालाही तिची तेवढीच काळजी होती, त्यामुळे आम्हीही त्यांना वेळोवेळी सूचित करत होतोच.
रस्ते खड्डेमय होते, असंख्य ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू होती, पण ते आमच्या सर्वांच्याच हाताबाहेरचे होते. त्यामुळे आम्ही गप्पांवर भर देत परतीचा प्रवास केला.
अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आंतरदेशीय दर्जाची चारचाकी घेणे आव्हानात्मक असते. अशी गाडी विश्वासाने चालवायला मिळाली, तेव्हा तो विश्वास टिकवणे किती आवश्यक आहे, हे चालकाच्या प्रत्येक कृतीतून दिसत होते. हे 'Interestingness' चे एक खास उदाहरणच होते.
"असे चालक-मालक येती आणिक स्मृती देऊनी जाती", या अविस्मरणीय प्रवासासाठी आणि त्यातील धड्यांसाठी त्यांचे आभार!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा