मी एका सुंदर, बैठ्या, साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात, एका छोट्या ठिकाणी लहानाची मोठी झाले. तिथे सगळेच खूप मराठमोळं, छोट्या प्रमाणावर समाधानाने चालणारं होतं. त्यामुळे मला तिथे दिसलेलं आणि अनुभवलेलं तेवढंच जग होतं. नोकरी करायची, कुटुंबासोबत राहायचं, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवायची, हेच ठाऊक होते. 'उड्या मारणे' (अवास्तव अपेक्षा ठेवणे) कधीच ठाऊक नव्हते. नोकरी करून पगार मिळवायचा, त्यासाठी शिक्षण घ्यायचं आणि मनःपूर्वक, आनंदाने काम करून प्रगती करायची, एवढंच काय ते माहीत होतं.
पण कालांतराने अनेक प्रकारचे अनुभव डोळ्यासमोर उभे ठाकले, नवनवीन गोष्टी घडू लागल्या आणि मी अचंबित झाले. किंबहुना, अनेक प्रश्न पडायला लागले, ज्यांची उत्तरे शोधणे अजूनही अविरत सुरू आहे.
महागाई वाढली आहे, वाढतच आहे; गरजा वाढल्या आहेत; नवीन कल्पनांना उधाण आले आहे, याची मला संपूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नकळत बऱ्याच नवीन गोष्टी कानावर पडत आहेत. प्रत्येकाची एक माफक इच्छा असते की, आपले एक स्वतःचे हक्काचे घर असावे. त्यात मग दुचाकी, चारचाकी यांची भर पडते. उद्योगीकरणामुळे आता समाजात हे सर्व 'असायलाच हवे' असे झाले आहे. एका कुटुंबासाठी एक घर हे मला पूर्णपणे मान्य आहेच.
पण एकापेक्षा जास्त घरे, अनेक ठिकाणी हे समीकरण मला लक्षात आले नाही. मग समजले की, "अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत" म्हणून बरेच जण अशी गुंतवणूक करतात आणि दुसऱ्यांना भाड्याने देतात. काही जणांचा हा एक व्यवसायच आहे म्हणे, अगदी उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण आणि महागड्या गाड्या विकत घेऊन त्याचा व्यवसाय करण्यासारखेच. मी मोठी होऊन नोकरी करेपर्यंत लहान ठिकाणी वास्तव्याला असल्यामुळे, मला अशा व्यवसायांची भनकही नव्हती. त्यामुळे सुरुवातीला खूप त्रास झाला.
खूप कष्ट करून, मेहनतीने मध्यमवर्गीय लोक स्वतःची वास्तू विकत घेतात आणि ती दुसऱ्याला वापरायला देऊन टाकतात, का? हे उमगलेच नाही. माझी गाडी 'एक हाती' (फक्त माझ्या वापरात) होती; ती जेव्हा पहिल्यांदा चालकाला चालवायला दिली, तेव्हा मला इतका प्रचंड त्रास झाला होता की, तो शब्दात मांडता येणार नाही.
सर्व स्तरांवर चित्र बदलले असले तरी, कुठेतरी माझ्या मनाला हा विचार बोचतो की, मुलगी जन्माला आल्यावर तिला दुसऱ्या कुटुंबाला देऊन टाकायचे, जसे हे आधीच ठरलेले असते—तसा भास झाला मला. ते नवीन घर, ती गाडी मालकांची वाट बघत असणार ना? पण ती घेतलेलीच असते देऊन टाकण्याकरता.
हे जरी व्यवसाय असले, आधुनिकीकरणाचा भाग असले, तरी ते मला न पटणारे आहेत. हॉटेल्स आहेत, हॉस्टेल्स आहेत राहण्यासाठी. दुसरे-तिसरे घर घेऊन भाड्याने देणे किंवा नवीन कोरी स्वमालकीची गाडी भाड्याने देणे, हे नसतानाही पूर्वी सर्व सुरळीत सुरू होते ना? मग ते तसेच सुरू राहायला हवे होते. शासनाच्या बस असणे वेगळे आणि स्वकमाईची कोरी गाडी देऊन टाकणे, असा व्यवसाय करणे—हे माझ्यासारख्या व्यक्तीला का कुणास ठाऊक, दुखावणारं आहे.
हे अयोग्य आहे असे माझे म्हणणे नाही, पण माझ्या पटीत बसण्याच्या पल्याड नक्कीच आहे. घर, गाडी हे वैभव आहे, ते 'देण्यासाठी' नक्कीच नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा