मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

२३०३: पंचेंद्रिय अनुभव

मला सध्या हातात थोडासा मोकळा वेळ आहे, टीव्ही बघायला आवडतो, काही कलाकारांची कामे खूप आवडतात, ते कलाकार कला सादर करताना आवडतात, इत्यादी. अनेक कारणे आहेत ज्यामुळे मी मस्त एन्जॉय करते आहे. एवढ्यातच एका सिरीयलमध्ये एक दृश्य होतं, त्यात एक मुलगा आणि मुलगी चहा पिताना दाखवले आहेत. ती मुलगी म्हणते, "जेव्हा जमेल तेव्हा बिनधास्त चहा ओरपून प्यायचा, मस्त आवाज करतं." त्याला महद आश्चर्य वाटतं ते ऐकून. किंबहुना चहा पिताना आवाज करायचा नाही असं नेहमी म्हटलं आणि शिकवलं जातं, आणि ही अशी का म्हणते आहे?

त्यावर तिने दिलेले उत्तर किती योग्य आहे ते बघा. तर ती सांगते की आपल्या पंचेंद्रियांपैकी डोळ्यांना दिसतं की चहा किती वाफाळलेला आहे, कारण ते वाफ बघू शकतात. त्या चहाच्या कपाला हात लावला की कातड्याला समजतं की चहा गरमागरम दिला गेला आहे. सुंदर सुगंध येतो ताज्या चहाचा आणि नाकाला कळतं. जीभ चव घेते त्या उत्कृष्ट चहाची. पण कानांचे काय? त्याला तर आपण सामावून घेत नाहीच ह्या सगळ्या सुंदर अनुभवात, असं का? त्याला पण कळू दे ना की हा चहा किती उत्तम आहे, चहा / त्याला उगाच अमृततुल्य असं संबोधत नाहीत. म्हणून जमेल तेव्हा बिनधास्त ओरपून चहाची मजा घ्यायची, म्हणजे कानांना पण समजेल. नाही का?

हे मला खूप म्हणजे खूपच भावलं, कारण मी एक शिक्षिका असल्यामुळे, प्रचंड बडबडी असल्यामुळे घश्याला सतत चहा लागतो, मी त्याची पण भक्त आहे.

सहज एक विचार ह्यावरून मनात डोकावला तो असा की फक्त ओरपून पिणं पुरेसं आहे का? तर नाही. मग काय काय करता येईल? तर मला असं वाटतं की फक्त चहाच नाही, तर "अन्न हे पूर्णब्रह्म" ह्या नियमानुसार प्रत्येक पदार्थ चाखल्यानंतर:

  • तो पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचविणाऱ्यांना धन्यवाद द्या.

  • तो पदार्थ जर तुम्ही केला आहे, तर म्हणा तो मस्त झाला आहे.

  • आवर्जून आई, ताई, मावशी, मुलगी ज्यांनी कोणी हा पदार्थ केला आहे, त्यांना धन्यवाद द्या, अभिप्राय द्या.

  • तो पदार्थ चाखून तुम्ही धन्य झालात हे सांगा.

  • तो पदार्थ सेवन केल्यामुळे तुम्हाला जो फायदा झाला, त्याबद्दल बोला, तुमचे कान तृप्त नक्की होतील. 

आणि असे इतर अनेक मार्ग आहेत ज्यामुळे तुमचा पाचवा इंद्रिय देखील सामील होईल सगळ्यात, नाही का?

नाहीतर नेहमीच आपण फक्त पदार्थ चांगला झाला नाही तरच भाष्य करतो आणि ते देखील आपल्या लोकांसमोर. ते जर आपण सवयीनुसार, आजूबाजूला बघून अनेक वर्ष करत आलो आहोत, तर आता नाण्याची दुसरी बाजू बघा, ती वापरून बघा. समोरच्यात काय बदल होईल का नाही होईल हे मला ठाऊक नाही, तुम्हाला मात्र प्रचंड समाधान मिळणारच.

चला तर मग ओरपायला आणि कौतुकाचे बीज पेरायला सुरुवात करू यात आत्ता पासूनच.

हे वाचून मला खात्री आहे काही जण निश्चित एक प्रश्न विचारतीलच, "जर आम्हाला एखादा पदार्थ आवडलाच नाही, तिखट लागला, मीठ कमी झालं असलं तर? तरी कसं म्हणायचं की मस्त झालंय म्हणून?" त्याची उत्तरं ही अशी: मीठ कमी झालंय, वरून चुपचाप लावून घ्या, प्रत्येकाची चव वेगळी असते. तिखट जास्त झालंय, त्या पदार्थाचा छोटा घास घ्या, इतर पदार्थांवर ताव मारा किंवा वेगळं काही खा, गोड खा मध्ये मध्ये, पाणी प्या, ताक मागवून घ्या. काहीच शक्य नसेल तर स्वतः करा आणि दुसऱ्यांना खाऊ घाला, उपास करा, उपवास तब्येतीला उत्तम असतो, हे लक्षात ठेवा. पदार्थ करण्याची प्रक्रिया, लागणारी सामग्री, शक्ती, वेळ इत्यादीवर लक्ष असू द्या, फक्त चव नाही. चव चांगली नाही ह्यावरून सुनावणे हा पर्याय नाहीच. त्यामुळे काहीच साध्य होत नाही, उलट सगळेच दुरावतात आणि नुकसान होते जे कधीच भरून निघत नाही. त्यामुळे विचारांती वागा मंडळी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...