आज मला समजलं, उमगलं की, एखादी मुलगी आई होणार असल्याची बातमी आली तज्ज्ञांकडून की कमीतकमी तीन महिने ती सर्वश्रुत होत नाही, होऊ देत नाही. त्याला तांत्रिक कारणे आहेत; तो नवीन गर्भ होणाऱ्या आईच्या पोटात स्थिर होणं आधी जास्त महत्त्वाचं. त्याला शारीरिक नियमांप्रमाणे किंवा बाळाच्या वाढीच्या आखून-राखून दिलेल्या पद्धतींप्रमाणे ९० दिवस लागतातच, कारण एक नवीन शरीर निर्माण होत असते आत, गंमत किंवा खाऊ नाही ना तो. इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया असते ती की ज्याचं नाव ते. सगळं सुरळीत पार पडावं म्हणून हा नियम घालून दिलेला आहे औषधी शास्त्राने, समाजाने, आणि इतर सगळ्या स्तरांवरसुद्धा. किंबहुना, अनेकदा तर ते तीन महिने नकळतसुद्धा निघून जातात असा घाट पण अनेकदा घातलेला दिसतो निसर्गानेच, म्हणजे सांगायलाच नको, 'सुंठी वाचून खोकला...' असं काहीसं.
सांगण्याची सर्वांनाच प्रचंड घाई झालेली असते, कारण कारणंच इतकं गोड असतं, एक नवीन सदस्य येणार असतो घरी. मग अत्यानंदाच्या भरात सर्वांना सांगणे होतेच, पण ते टाळा. मग ती पहिलटकरिण असो नाहीतर दुसरी वेळ; काहीही झालं तरी प्रत्येक वेळी आई होणं, किंवा प्रत्येक वेळी बाळाला जन्माला घालणं हा वेगळाच अनुभव असतो.
अगदी तसेच माझ्या दृष्टीने नोकरीचे देखील आहे. नोकरी लागली रे लागली की सर्वश्रुत करण्यात काय गंमत आहे? हो, सर्वांनाच अत्यानंद झाला असतो, कारण एक नवीन टप्पा सुरू झाला असतो, एक वेगळेपण अनुभवायला सुरुवात झाली असते, आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले असते; पण ह्याला अतोनात कष्ट करावे लागले असतात. मग थोडे थांबा, तेथे आधी रुळण्याचा, रुजण्याचा प्रयत्न करा, आजूबाजूचे वातावरण, लोक समजावून घ्या, तुमचे अस्तित्व निर्माण करा, कामाचा आवाका समजावून घ्या आणि मग सांगा जगाला. थोडं थांबून सांगितले तर काय हरकत आहे?
नवीन नोकरी म्हणजे नवीन बाळासारखेच नाही का? आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शब्दोच्चार नेहमी वापरला जातो, उदाहरणार्थ: "PhD is your baby", "संशोधन किंवा त्या संदर्भातील संशोधन पत्रिका लिखाण is your baby". मग त्यात नोकरी ही पण तुमचेच बाळ आहे आणि त्याला तुम्हाला हळूहळू नर्चर करायचे आहे, पाणी, खत घालून सिंचायचे आहे. त्याला वेळ लागणारच. त्यामुळे जसा नवीन गर्भवतीचा तीन महिन्यांचा नियम आहे, तसा तुमचा स्वतःचा एक नियम ठरावा. तुम्हाला वाटेल तेव्हाच सांगा. लिंक्डइनसारख्या वेबसाइट्सवर पद्धत आहेच सांगण्याची की 'थोडा उशीरच झाला सांगायला, पण माझ्या बाबतीत हे हे घडलं आहे, हे मी साध्य केले आहे' असे. काय हरकत आहे? करून तर बघा प्रयोग म्हणून.
अजून एक म्हणजे, जसा तुम्हाला अत्यानंद होतो नवीन नोकरी मिळाल्यावर, तसाच त्या कंपनीला पण व्हायला हवा ना? कारण त्यांना एक साजेसं, शिकलेलं, तयार, झोकून काम करणारं, हुशार, कंपनीला पुढे नेण्यात मदत करणारं व्यक्तिमत्त्व मिळालेलं आहे. मग ते का नाही हो उड्या मारत सोशल नेटवर्किंग साईट्सवर की 'आम्हाला इतका मस्त हुशार मुलगा/मुलगी मिळाली आहे आणि आम्ही खुश आहोत'. त्याची कारणे वेगळी असतील देखील, त्यांच्या पॉलिसित बसत नसेल, त्यांना गरज वाटत नसेल इत्यादी. काहीही कारणे असू शकतात, मग आपणच का सांगण्याची घाई करायची? काय मिळणार आहे सांगून? काही जणांकडून शाबासकी, बास! इतकंच. पण ते मेसेजेस फक्त नोकरी टिकवून ठेवायला कामी येत नाही; तुमची मेहनत, जिद्द, आत्मविश्वास, भरपूर झोकून वेळेत केलेली कामे, वेगळ्या पद्धतीने केलेली कामे इत्यादी कामास येतात. त्यामुळे तुम्हीच ठरवा, सोशल मीडिया आहे म्हणून सांगणे आवश्यक आहे हे गरजेचे नाहीच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा