सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

२३०१: गगनचुंबी कारण

आज मला समजलं, उमगलं की, काही गेल्या वर्षांपासूनच गगनचुंबी इमारती इतक्या का वाढल्या आहेत? बाकी जी ढोबळ मानाने कारणे आहेत, त्याशिवाय एक असं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं कारण आहे. लिफ्टचा वापर करून किंवा जिना चढून आपण उंच मजल्यांवर गेलो आणि चारही बाजूंचे दृश्य बघितले की डोळ्यांचे पारणे फिटतेच. तो निसर्ग, तो टॉप व्युव्ह (bird eye view) बघून काहीतरी वेगळेपण निश्चित नजरेस पडते. जमिनीवरून दिसणारा तो रस्ता किंवा महामार्ग वरच्या मजल्यावरून नागमोडी वळण असलेला असा भासतो, एखाद्या चित्रकाराने जणू उत्कृष्ट चित्रच रेखाटले आहे असे काहीसे. वरून टीपलेला अँगल हा इतका वेगळा असतो की, त्यात एकाच वेळी रस्ता, डोंगर, आजूबाजूच्या इमारती, झाडं, आकाश, पक्षी आणि असं संपूर्ण चित्र दिसतं. इतक्या वर देखील झुळझुळणारा वेगळा वारा, त्याचा बदललेला वेग समजतो. असं म्हटलं जातं की, जितका वरचा मजला तेवढी हवा शुद्ध. वरून झाड बघणं आणि त्याच्या बुंध्यापासून बघणं ह्यात निश्चित फरक आहेच.

अनेक अशा पद्धती मी ऐकल्या, वाचल्या आहेत की, सत्संगतीचे महत्त्व, भरपूर पुस्तके वाचून आत्मसात करण्याचा फायदा, नेहमी सकारात्मक राहण्याचे सुख, नाण्याची दुसरी बाजू टिपण्याची सवय इत्यादी. आणि हे सगळं का करायचं, तर 'स्व' मध्ये बदल घडण्यासाठी, स्वनिर्मितीसाठी, आणि एक जण असा बदलला की, त्याच्या संपर्कात येणारे, त्याला बघणारे, त्याच्यासोबत काम करणारे मग बदलायला लागतातच.

आताशा फक्त वास्तू ही उंच मजल्यांवर नसते, तर दिवसभर देखील कचेरीत आपण वेगळ्या मजल्यावर काम करतो. हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हाचा मजला कदाचित वेगळा असतो. मित्रांकडे जातो, कामाला वेगळ्या कचेरीत जातो, आणि इतर काही कारणांनी विविध मजल्यांवर, विविध ठिकाणी जाणं होतं. आणि आवर्जून जर काही क्षण बाहेरचा नजारा बघण्यासाठी राखून ठेवले, तर मजा, आनंद, अनुभव इत्यादी द्विगुणित नक्कीच होणार. आता ह्यापुढे जेव्हा वेगळ्या मजल्यावर जाल, तेव्हा नक्की बाहेर डोकावून बघाच आणि सांगा कसं वाटलं ते.

आपण जितक्या उंच पदावर जातो, तेवढे पाय घट्ट रोवून उभे राहतो, प्रगल्भ होतो. जितके वय जास्त, तितकी समज जास्त. जितका अनुभव जास्त, तितके समाधान जास्त. जितके आध्यात्मिक ज्ञान जास्त, तितकी स्वच्छ नजर, विचार आणि आचार सुद्धा. मग जर यदाकदाचित सत्संगाला वेळ नाही, नाण्याची दुसरी बाजू बघायला शक्य नाही, पुस्तके वाचून आत्मसात करणे सध्या अवघड, तर मग 'तो' तुम्हाला उंचीवर मुद्दाम नेऊन बसवतो आहे. त्यामुळे अगदी सहज रित्या तुम्ही एकतर त्या उंचीवर आहात हे टिपता, उंचीवर दिसणारे नजारे कसे असतात हे समजतं, आणि कदाचित तसे होण्याचा प्रयत्न आपोआप होतो. उंचीवरच्या गार आणि शुद्ध हवेचं महत्त्व समजतं, आणि मग अशी वैचारिक, आध्यात्मिक, भावनिक, सामाजिक, आणि सर्वच पातळीवर उंची गाठण्याचं महत्त्व समजेल आणि तशी वागणूक होईल, ह्यात शंका नाहीच.

हे खरं कारण असावं माझ्या दृष्टीने. कारण राहतं घर जर उंच मजल्यावर आहे, आणि तेथे आपण रोज किमान ४-५ वर्ष राहिलो, तर किती सुंदर फरक पडेल. असं सातत्य कदाचित वाचनात, सत्संगात, आणि इतर ह्याच्यात येणं अवघड, म्हणून हा सोप्पा मार्ग "त्याने" फक्त दाखवला नाही, तर तो सर्वश्रुत केला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...