मला अजूनही तो दिवस, छे छे ते दिवस जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे ठाकले आहेत, जणूकाही आत्ता ह्या क्षणी ते माझ्यासोबत घडत आहे आणि ते मी अनुभवत आहे, ताजेतवाने असे. माझ्या छोट्याश्या मेंदूला आठवते त्याप्रमाणे मी तेव्हा पाचवीत असेन आणि आम्हा सर्वांना एका भन्नाट गुहेत नेण्यात आले. "काय वर्णू तुझे गूण, अल्पमती नारायण" अशी माझी थोडक्यात अवस्था झाली होती तेव्हा. काय ती खोली, काय तो गारवा, काय ती सजावट, म्हणजे सगळंच ह्या विश्वाबाहेरचं होतं जणू. हे मी खरंच अनुभवत होते ह्यावर माझा अजिबात विश्वास बसला नाहीच.
त्यानंतर काय, बहुतांशी रोजच, किंवा आठवड्यातून काही दिवस आम्ही त्या मंदिरात प्रवेश करू लागलो. अगदी बूट, मोजे, किंवा तत्सम सगळं पायताण प्रकार त्या गुहेबाहेर काढूनच आत प्रवेश मिळायचा. त्या ज्या काही जादू आता होत्या त्या बघायला, हाताळायला मिळणार हेच डोक्यात होते, त्यामुळे 'बूटं बाहेर काढा' म्हटलं की काढायचं, बास! एवढंच ठाऊक आम्हाला तेव्हा. 'का? काय होतं नाही काढलं तर?' यासाठी वेळ कोणाला होता हो! काय आमच्या शाळेने आम्हाला खजाना उघडून दिला होता! संगणक लॅब आमच्या शाळेत सर्वप्रथम, राज्यात/शहरात प्रथम असं काहीसं. त्या संगणकाला म्हणे धूळ सहन होत नव्हती तेव्हा, म्हणून हा सगळा द्राविडी प्राणायाम. किंवा तेव्हा संगणक वातानुकूलित यंत्रणेशिवाय चालत नसे म्हणून ती गुहा आणि स्वच्छता इत्यादी.
आता देखील तीच मी, आणि झालेले प्रचंड बदल "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवले आहेत. आता संगणक शहाणा किंवा प्रगल्भ झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीच. कारण गेली कित्येक वर्ष मी बघते आहे की संगणक लॅब "जगी, स्थळी, पाषाणी" सर्वत्र आहे. कुठेही संगणक मांडले आहेत विविध कामांसाठी, व्यवसायासाठी. आणि बिनधास्त झालेत ते सगळे. धूळ, चप्पल, बूट, पंखा, नो-पंखा, आता सगळं म्हणजे सगळं चालतं हो त्याला. धुळीच्या ॲलर्जीवर औषधं घेऊन बरा झालाय पठ्ठा म्हणे! त्याला आता काहीच फरक पडत नाही. हो, काही मोठे बंधू आहेत, ते मात्र वातानुकूलित जागेतच पहुडले आहेत अजून देखील, किंबहुना त्यांना तेच भावतं (सर्व्हर्स हो आपले). पण जर हेच बंधू विविध देशात पहुडले असतील तर (क्लाऊड) मग काय विचारूच नका! आणि आता काय "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती"; कुठेही सापडतात तुकड्यातले संगणक.
बघा तर मग मंडळी, अंतर्बाह्य बदल कराच स्वतःत. काही ॲलर्जी, अटकाव वगैरे असेल तर पट्टाकिनी इलाज करा, "मस्त खा, स्वस्थ राहा" आणि पुढे चला, अगदी आपले अवयव, संगणकासारखे. त्याने पण क्रांती घडवली, मग आपण त्याच्याकडून शिकायला नको? प्रवाहपतित व्हायला नको? त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन मार्गक्रमण करायला नको? फक्त त्यानेच शिकायचे का आपल्याकडून सतत (मशीन लर्निंग)? का? व्हाईस वर्सा इज ट्रू टू. मग पदर खोचा, बाह्या सरसवा आणि लागा कामाला. कात टाकणे आवश्यक हो. तेच जुने धरून चालू शकत नाही ह्या अत्याधुनिक जगात. आणि हे प्रत्येकाला, प्रत्येक ठिकाणी लागू आहेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा