सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

२२९९: पद्धत बदला, प्रवाह नाही

 मी अगदी लहानपणीपासून एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सुसंवाद, सुखसंवाद साधतांना बघितलं आहे. तो काळ तसाच होता. पत्रलेखन हे भेटीचं एक महत्त्वाचं माध्यम होतं, त्याकरता वाट बघणं अनिवार्य होतं. पत्रलेखन ही एक कला आहे असं उगाच म्हटलं जात नाही, तर त्यातून माणूस माणसांपर्यंत पोचत असे. वाचतांना असे वाटे की, प्रत्यक्ष तो व्यक्ती समोर बसून सगळं व्यक्त करतो आहे. पुन्हा पुन्हा ते पत्र उघडून वाचत बसावंसं वाटावं असं लेखन असावं, म्हणून त्याला कलेची उपमा दिली गेली आहे. ती बोलकी हस्ताक्षरं, लिहिणाऱ्याचा स्पर्श आणि सुगंध देखील जाणवतो अनेकदा त्या पत्राद्वारे.

त्यानंतरचे साधन म्हणजे साधा फोन. आवाज ऐकता यायला लागला, वाट बघण्याची मर्यादा किंचित कमी झाली. छोटीशी क्रांती झाली आणि घरात फिरत फिरत बोलता येऊ लागलं, हँडसेट वेगळे झाले त्यामुळे अजून वेगळ्या पद्धतीने संवाद साधता आले. अर्थात, मग किंचित भेटी कमी झाल्या. मग काय विचारता, मोबाईल, सोशल मीडिया, रील्स असा भलामोठा प्रवास सुरू झाला.

संभाषणाची शैली संपूर्ण बदलली. ती आता प्रत्यक्षच्या ऐवजी अप्रत्यक्षच झाली आहे. लिखितच पण वेगळ्या पद्धतीने भेटीगाठी होऊ लागल्या आहेत जगाशी आताशा. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आलेख जसा जसा शिगेला पोचला, तसतसा संवादाच्या रेखलेखाला प्रचंड उतरती कळा आली. एक तर आता भेटींना वेळच नाही, कारण मान मोडून काम सुरू आहे, दोन्ही स्तरांवर: एक म्हणजे कचेरीतले बदलत्या स्वरूपाचे काम आणि हे मोबाईलवरचे जगाशी संवाद साधायचे काम.

परंतु ह्यामुळेंना एक खूप मोठा फायदा झाला आहे. सांगते कसा ते.

मी मध्येच माझी नोकरी सोडून संपूर्णवेळ संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता, म्हणजे विद्यावाचस्पती होण्याचे काम लवकर संपवता येईल. तेव्हा जरी हातात संशोधन संबंधी कामे होती, तरी एक मोठी पोकळी निर्माण झाली. नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझा मोबाईल आणि लँडलाईन कचेरीतील नेहमीच खणखणत असायचा, खूप लोकांशी संवाद होत होता. पण तो अचानक बंद झाला आणि त्याने मला खूप वेगळा अनुभव दिला, जसे की मी उपयोगाची नाहीच की काय, असा.

संशोधन संपवून मी पुन्हा नोकरी सुरू केली, ती अनेक वर्ष केली आणि आता स्वेच्छा निवृत्तीनंतर वाटलं की तशी पोकळी पुन्हा निर्माण होते की काय; त्याआधीच एका सुंदर विचारांनी मला तारून धरलं हो.

तो म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या जेन झी (Gen Z) ला अशी उणीव कधीच भासणार नाही, कारण ते सतत ऑनलाईनच आहेत, असतात आणि राहणार, बदल नाहीच. खूप फोन, भेटी, संवाद, सुसंवाद, सुखसंवाद इत्यादी. ते एक दिवस अचानक फोन शांत असे माझ्या बाबतीत झालं, ते ह्या नवीन पिढीत होणे नाही. माझ्यासाठी तरी खूप काही शिकण्यासारखे आहे ह्यातून. संवाद सुरू ठेवा, पण पद्धत बदला, जसे जमेल तेव्हा, जितके जमेल तेव्हा.

माझ्या संवादांमुळे अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, समाधान लाभले ते आठवा आणि वेगळ्या विश्वात रममाण व्हा. तेव्हा संवाद कसा होता, हे जरी आठवले तरी अनेक दिवस निघून जातील. पहिल्या माझ्या कामातून ब्रेकच्या वेळचे माझे वय, प्रगल्भता आणि आता ह्यात देखील जमीन आसमानाचे अंतर आहे. शिवाय सगळं ठरवूनच निवृत्ती घेतली असल्यामुळे तेवढा त्रास झाला नाही. छोटी-मोठी कामे देखील सुरू आहेतच; त्यामुळे संवादाची गती कमी झाली असली, तरी वेग कायम आहे, वेगळ्या पद्धतीने आता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...