माझ्या मते, १९९० सालची गोष्ट आहे ही. मी पहिल्यांदाच देशाच्या भल्यामोठ्या राजधानीतल्या एका पिटुकल्या गावात लग्नाला गेले होते. थोडक्यात सांगायचं झालं तर, अक्षरशः एक ट्रक भरून सगळं संसाराला लागणारं सामान दिलं गेलं मुलीसोबत लग्न झाल्यावर. कुठलीही छोटीशी गोष्ट, जिन्नस सुटला नव्हता. अगदी पुढील सहा महिने लागतील एवढे घरचे कपड्यांपासून सगळं म्हणजे सगळंच! माझी दाही बोटं तोंडात, अबब, असं काहीसं झालं मला. अर्थात ही प्रथा मला ठाऊक होती, बघितली होती; आपल्याकडे रुखवत असतं, त्याच भला मोठा भाऊ होता हा.
तेव्हापर्यंत किंबहुना आजपर्यंत मला हेच ठाऊक होतं किंवा मी गृहीत धरलं होतं की हा एक लग्नाचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. त्या मागची कारणमीमांसा मी करण्याच्या भानगडीत पडलेच नव्हते. आज अचानक त्यामागचं कारण आपोआप उलगडलं.
माझ्या किंवा त्या आधीच्या काळच्या लग्नाबद्दल मी ही सांगते आहे, आता सर्वच बदललं आहे. एक तर वय लहान, लग्नानंतरचे बदल प्रचंड, चालीरीतींपासून, खाणं-पिणं सगळंच वेगळं. आव्हानं खूप. त्यात जरी आईच्या घरी स्वयंपाक करणं माहित असलं, तरी मोजमापं सगळी बदललेली, माणसं, त्यांच्या आवडीनिवडी, चवी, शहर... सगळं म्हणजे सगळंच वेगळं. आई सारखी सासू किंवा त्यांच्या घरचं वातावरण असेल तर तगून जायचं, पण नसेल तर? म्हणून हा सगळा घाट.
त्या नववधूला काहीतरी ओळखीचं, आठवणींचं वाटावं, म्हणून सगळ्या जवळच्या नातेवाईकांनी, आईने, आणि इतर सर्वांनी मिळून तो संसार दिला असतो. सगळंच नवखं असण्यापेक्षा थोडं आपलंस असल्यावर, नवीन आयुष्याची सुरुवात करण्यास प्रोत्साहन मिळतं. किती सुंदर विचार आहेत हे! किती विचारपूर्वक ह्या रुखवताची सुरुवात केली आहे!
मी कलाकुसरीशिवाय असलेल्या रुखवताचा भाग म्हणते आहे हो इथे. कलाकुसरीचा भाग पण तितकाच महत्त्वाचा. त्या केलेल्या वस्तू, त्यात सर्वांनी केलेली मदत, ती लाडीगोडी, चिडवाचिडवी इत्यादी. सगळं आठवून दिवस पुढे जाण्यास मदत नक्कीच होते, जर गरज भासली तर, त्या नवीन वातावरणात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा