शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

२२९७: सोप्पे केले तर?

 आपल्या पूर्वजांनी त्यांच्या वेळी जे जे उपलब्ध होतं, अगदी घरी किंवा आसपास, त्याचाच उपयोग करून काय काय करता येतं हे सांगितले आहे, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वेळेला साजेसं असं. आता त्यातलंच एक साधं उदाहरण आज मला इथे घ्यावसं वाटलं.

तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावायचा, शुभंकरोती म्हणायची आणि काही घरांमध्ये त्यानंतर आरती पण नित्यनियमाने होते. हे सगळं करत असताना एक तर मांडी घालून खाली जमिनीवर बसायचे किंवा अनवाणी उभे राहायचे, जे सोयीचं असेल ते किंवा जसे देवघर मांडले असेल तसे.

आता हे सगळं का करायचं? हा प्रश्न माझ्या पिढीला पडला, पण तो कधीच ओठांपर्यंत पोचला नाही. आम्ही केलं, सगळंच, आणि बहुतांशी पाठांतरच होतं. पण माझी हीच पिढी पुढील पिढीसोबत प्रश्नांचा भडीमार पण सहन करत मोठी झाली आहे. पुढची पिढी म्हणजे 'का?' ह्याचं उत्तर... जोवर ह्याची उत्तरे मिळत नाहीत, तोवर चिकित्सक वृत्ती जागृतच राहणार. अर्थात हे पण खूप म्हणजे खूप उपयोगी आहेच. तर मी त्या पिढीतली ह्या पिढीतल्या, लहानातील मोठ्यांना उत्तरे समजतील अश्या पद्धतीने देत गेले. तिन्हीसांज म्हणजे? का दिवा लावायचा? खाली बसण्याचे महत्त्व? इत्यादी. आणि असे अनेक प्रश्न सातत्याने उभे ठाकले.

माझी उत्तरे: सर्वश्रुत असलेले उत्तर मी दिले, की भूतकाळ हा निघून गेलेला असतो, तो परत येत नाही. सध्या आपण वर्तमानात आहोत आणि भविष्याकडे वाटचाल आहे. ती वाट अंधारी आहे, म्हणजे कोणालाच ठाऊक नाही पुढे काय उभं ठाकलं आहे; त्यामुळे आपण त्या सुप्रीम पॉवर, किंवा त्या युनिव्हर्सला प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना वाट दाखव. आणि त्याकरता हा दिवा, अश्या वेळी जेव्हा दिवस संपतंच असतो आणि रात्र सुरू व्हायला किंचित अवकाश असतो.

दुसरी गोष्ट, ग्रॉउंडिंग किंवा अर्थिंगचे महत्त्व माहीत नसेल असा व्यक्ती सापडणे कठीण. ते होण्याकरता मांडी घालून किंवा अनवाणी उभे राहणे अत्यावश्यक त्या काही वेळेपुरते.

मागच्या पिढीकडे तेव्हा मातीचे दिवे, तेल आणि कापूस सहज उपलब्ध असल्यामुळे मग तश्या पद्धतीनेच दिवा लावला जातो ही प्रथा पडली. अर्थात दिवाळी किंवा कार्तिक पौर्णिमेला असंख्य असे मातीचे दिवे का लावले जातात, तर थंडीच्या दिवसांत उष्णता निर्माण व्हावी म्हणून.

आता ऋतूचक्र बदलली आहेत. वारा प्रचंड, गगनचुंबी इमारतीत तर विचारू नकाच. किंबहुना गगनचुंबी इमारतीत वरच्या मजला घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे शुद्ध हवा आणि भरपूर हवा. घरांची रचना वेगळी झाली आहे, माणसं पण तशी राहिली नाहीतच जशी आधी होती, इत्यादी. मग माझी लेक तर विचारतेच, पण बाजारात पण खूप बदल झालेत. तंत्रज्ञान बदलतंय, मग सर्वांनीच कात टाकली असं झालंय.

सध्या सर्वत्र फारच उपयोगी असे पिटुकल्या सेलवर चालणाऱ्या पणत्या उपलब्ध आहेत, वापरल्या देखील जातात. तसेच देवापाशी दिवा देखील विविध प्रकारांमध्ये दुकानांमध्ये दिसतो, घरोघरी वापरला जातोच.

सरते शेवटी दोन हस्तक आणि एक मस्तक महत्त्वाचे. ते वापरून "अंधारातून दिशा दाखव" ही प्रार्थना आज देखील तश्याच श्रद्धेने आणि विश्वासाने केली जाते. मग तो दिवा लावण्यासाठी तेल, काडेपेटी उपयोगात येवो किंवा बटन, फरक काहीच नाही. दोन्ही दिवे त्याच वेळी लावले जातात, भूत-वर्तमान-भविष्य हे काळ पण तेच आहेत, प्रार्थना आज देखील होते. सोप्पे केले तर काय हरकत आहे, मी म्हणते? हवं ते साध्य झालं की झालं, नाही का?

तेल सांडायला नको, डाग पडायला नको, वाऱ्याने ज्योत विझायला नको, सतत तेल घालणं नको, मग त्या तेलकट पणत्या सांभाळायला नको; पण उजेड मात्र सातत्याने मिळणारच. अजून काय हवंय! चला तर मग, बाकी सगळे बदल सहज स्वीकारले, तसा हा बदल देखील स्मितहास्य ठेऊन स्वीकारुयात?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...