लहानपणापासून मी फक्त जमिनीवर उभी राहून ढग बघितले. मग जेव्हा असंख्य वेळा विमान प्रवास केला तेव्हा घाबरून फक्त डोळे बंद करूनच बसले, किंवा बहुतांशी प्रवास हे अपरात्री होत असल्यामुळे डोळे बंद असल्याचे, बाहेर अंधार असायचा. पण जशी माझी पिल्लं मोठी झाली, किंवा त्या नंतर माझा एकटीचा प्रवास सुरु झाला तेव्हा चार डोळ्यांनी बाहेरचा नजारा फक्त बघतच राहिले, तेव्हा ढगांवरून ढगांचे कुटुंब, वस्ती, पळापळ, धावपळ सगळं म्हणजे सगळं भरभरून टिपलं. तेव्हा का कुणास ठाऊक भीती कशी पळून गेली आणि कुठे गेली, पत्ता देऊन नाही गेली असं काहीसं. त्यामुळे माझी त्या ढगांशी वेगळीच दोस्ती आहे, एक वेगळं नातं आहे. आज मी पुन्हा एकदा जमिनीवरचे ढग अनुभवले. पुन्हा एकदा ह्या करता कारण ह्या आधी पण असा नजारा बघितला होता पण आज त्याला बघण्याचा नजरीया बदलेला आढळला. फक्त विचार करा मंडळी, एक तर जमिनीवर पाय रोवून उभं राहायचं, त्यात सर्वत्र ढगच ढग, आच्छादलेलं सर्वत्र, हे काय कमी होतं म्हणून दिग्गज समोर बसलेले, प्रेक्षक दोन्ही पद्धतीने न्याहाळत असलेले ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा, भन्नाट वाद्यवृंद, हे सगळं असतांना स्पर्धात्मक पद्धतीने गाऊन जिंकायचं प्रचंड मोठ्या कॅमेरांच्या, ड्रोनच्या गर्दीत, बाप रे. हे काय कमी होतं म्हणून गाणं सादर करतांना आपलाच स्वर, सूर, ई. आपल्यालाच ऐकता यावं म्हणून असेल ईअर फोन कानात नीट राहावे म्हणून लावलेल्या चिकटपट्ट्या...
अगदी आत्ताच मी इंडियन आयडल च्या नवीन भागाचे प्रत्यक्ष प्रसारण बघून, आनंद घेऊन उठले. थक्क व्हायला झालं पुन्हा एकदा. काही गायक इतके लहान आहेत वयाने पण सादरीकरण अगदी पहाडी.
ढगात उभे राहणं भलभलत्यानां अशक्य, आणि हे संपूर्ण ताकदीने, आत्मविश्वासाने सादर करतात, त्यात विविधता आणतात, त्यांचे रंग भरतात. नो वंडर ढग जमिनीवर येऊन ते ऐकण्याचा मोह टाळू शकत नाहीत. कमाल आहे, सर्व गायकांना माझा सलाम, ढगाएवढा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा